सौ. नीला देवल
शिक्षा – एम ए, बी एड
अनेक प्रसिध्द मासिकातून बक्षिस पात्र कथा प्रसिध्द झल्या आहेत.
‘परीसस्पर्श ‘ हा कथा संग्रह प्रकाशित.
☆ जीवनरंग ☆ || मानस कन्या || ☆ सौ. नीला देवल ☆
आज सरलाचे सुखदाच्या मानस कन्येचे लग्न लावून, तिची पाठवणी करून शांत तृप्त समाधानाने सुखदा घरी परतली पण एकटेपणाच्या जाणिवेने; सरला शिवाय हे घर, या विचारानेच सारे मोठ घर तिला खायला उठल.
दोन वर्षांपूर्वी दुपारी अखंड कर्कश्श वाजणाऱ्या बेलने सुखदाची वामकुक्षी भंग पावली, दार उघडताच “आजी मला आसरा द्या, मला वाचवा. मी निराधार आहे मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही”. त्या वीस बावीस वर्षाच्या मुलीने सुखदाचे पाय घट्ट धरले. मुली थांब म्हणत सुखदाने फोन लावला.
“पोलीस दादा तुम्ही आलात बर झाले, यांना सांगा माझी तक्रार तुम्हाला माहीतच आहे, निराधार आवास योजनेतून फुकट घर, गॅस, जनधन योजना फुकट मिळाला, पैसा नवऱ्याने जुगार, दारुमधे सारं फूंकून टाकल. डोक्यावरलं छप्पर गुंडांनी ताब्यात घेतलं, त्याच्या व्यसनाच्या कर्जापाई फुकट मिळाल्याची किंमत नाही म्हणून फुकापासरी फुंकून मला निराधार करून नवरा कुठे उलथला त्याचा पत्ता नाही. मला आसरा देऊन गुंडांपासून वाचवा. मी तुमचे सारे काम करीन, कामाला मी वाघ आहे. तुम्हाला तोशिष नाही लावू देणार.
निराधार योजनेतून फुकट मिळणारं काही नको मला, मला स्वतः राबून कष्ट करून जे मिळेल त्यात स्वाभिमानाने जगायचयं, माझ्या हाताला काम द्या, आसरा द्या, साऱ्याच चीज करेन मी, माझी एवढी नड काढा आजी”.
पोलीसांच्या मध्यस्थीने सरलाला सुखदाने ठेऊन घेतले. चाळीस वर्षाच्या सहजीवनानंतर इथला धागा तुटला गेला बाकी पुढील नात्यांचे बंध परदेशी बांधले गेले होते. सुखदाच्या एकाकी जीवनात आता सरलेच्या अस्तित्वाने नवेच अतूट नात्याचे बंध निर्माण झाले, दोघींनी एकमेकीस आधार दिला. सुखदाच्या घरचे सारे करून फिरून इतर बिल्डिंगमधे कामे करून सरला महिन्याला पंधरा वीस हजार मिळवू लागली.
पण आपल्यासाठी या तरुण मुलीचे आयुष्य असे खर्ची पडून उपयोगी नाही. तिलाही तिचे आयुष्य, हौस, उत्तम भविष्यकाळांतील उत्तम जोडीदार मिळायला हवा या विचाराने सुखदाच्या मनाने उचल खाल्ली. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सालस सत्वशील सुरेशशी तिचे लग्न लावून दिले. आता तिचा उज्वल भविष्यकाळ व सुखी संसाराचे चित्र सुखदाच्या दृष्टीपुढे स्पष्टपणे तरळू लागले.
© सौ. नीला देवल
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈