सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

त्या दिवशी नानांच्या दूरच्या नात्यातील कुणी विमलताई आल्या होत्या.त्यांना आक्का सांगत होत्या,

“इथं सगळं चांगलं चाललंय् नानांचं..पावलोपावली काळजी घेणारी माझी सून आहे.ती काहीच कमी पडू देत नाही.कामाचा ऊरक तरी केव्हढा आहे तिला. घरातलं,नोकरी, मुलींचे अभ्यास.. सगळं सांभाळून शिवाय आमचंही आनंदाने करते… पण आक्का घरी आल्या आणि एकच रट लावली.

“तुम्ही सगळे नानांसाठी एव्हढे खपता.त्यांच्या सुखासाठी झटता. पैसा आहे ना त्यांच्याजवळ…आम्हाला बरं बाई कधी दुखणंच येत नाही…”

नानांच्या शेजारच्या रुममधे एक आक्कांच्याच वयाची बाई आजारी होती.तिला डॉक्टरांनी तीन अठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले होते…बाईला मुलंबाळं नसावीत. तिचा नवराच रात्रंदिवस तिच्या ऊशापायथ्याशी असे.खूप प्रेमाने काळजीने करायचे ते…कुणी एक व्यक्ती त्यांचा डबा घेऊन येई… त्यांना भेटायला येणारी ती एकमेव व्यक्ती होती..

एक दिवस आक्का सहज त्यांच्या खोलीत डोकावल्या, तेव्हां ते गृहस्थ हळुवारपणे पत्नीच्या केसांची गुंत सोडवत होते.. मग सकाळपासून आक्कांच्या डोक्यात तोच विषय घोळत होता.

“ती बाई किती भाग्यवान!! पहा..नवरा कशी सेवा करतोय् “

सुनेला वाटायचं, आक्का अशा का कातावलेल्या असतात. त्यांना काय कमी पडतं..?? त्यादिवशी सून स्वत: नानांना सुप भरवत होती.

म्हणाली, “नाना! आज मला वेळ होता म्हणून मीच आले.. आणि आक्कांचं अंग जरा कसकसतंय्…”

“..हो बरोबर आहे. तीही आता थकली आहे. मला समजतं ते. एकत्र कुटुंबात खूप राबली आहे. इतक्या वर्षांचा संसार झाला आमचा.तिनं सुखदु:खांत साथ दिली.ती होती म्हणूनच मी कुटुंबाचे व्यवसाय विस्तारु शकलो. तिनं कधीच गार्‍हाणं केलं नाही. पण आताशा चिडचिड करते. तोडून बोलते.. बदलली आहे ती…”

सुप पिऊन झाल्यावर सुनेनं नानांना मानेखाली आधार देऊन झोपवलं. डोळे मिटून घेतलेल्या नानांचा चेहरा करुण. कष्टी. वेदनामय भासत होता. सुनेला सहज वाटलं, नको असं दुखणं.. आणि नानांनी खूप चांगलं आयुष्य जगलंय्.. त्यापेक्षा..

पण नाना रोज विचारतात.. “मी बरा होईन ना?”

परवा बोलता बोलता आक्का म्हणाल्या, “पाण्यासारखा पैसा चाललाय् ..एरव्ही पैशापैशाचा विचार करतात..तुला ठाऊक आहे ,नानांबरोबर कुठे जावे ना तर पायीपायीच.. ऊन असो पाउस असो.. छत्री घेऊ पण भाड्याची गाडी नको… एकदा मुंबईला गेलो होतो. मला व्हिक्टोरियात बसायचं होतं.. तर दोन आण्यांवरुन ठरलेली घोडागाडी रद्द केली… असे नाना.. जाऊ दे..

आमच्या अंगात सहनशक्ती होती..हट्ट केलाच नाही…ते म्हणतील तसं.. ते ठरवतील तसं… किती विचीत्र नातं हे!!

प्रेम का राग? लोभ की द्वेष..! आक्का नानांच्या सतत तक्रारी करतात.पण दुसर्‍या कोणी नानांबद्दल वेडंवाकडं काही बोललं तर मात्र त्यांना खपायचं नाही… लगेच फटकारायच्या…

“खूपच केलंय् त्यांनी कुटुंबासाठी.. विसरले आता सारे… काके—पुतणे. पुतणसुना. त्यांची मुलं. आले का कुणी भेटायला..? नानांना सगळे लागतात.. वेळ पडली तर आपल्यासाठी कुणी ऊभं राहतं का?..”

मात्र आक्कांची बेचैनी सुनेला जाणवायची…

“आक्का बरं वाटत नाही कां.?”  तेव्हा प्रश्नाला डावलून त्या म्हणाल्या, ” कां ग आम्हाला इथे येऊन पंधरा वार झाले ना… ते हाॅस्पीटल आणि तुमचं हे दोन खणी घर… जीव आक्रसून गेलाय. गावी जाऊन येते.. गाय व्यायली असेल. खळ्यात बाजरी ओसंडली असेल. वडे पापड कुरडया राहतील ना. ऊन्हाळा संपेल…  धाकटीला काही आवरणार नाही सारं….”

यावेळेस मात्र सुन जरा रागातच उत्तरली…

“तुम्हाला जायचं  असेल तर जा…आम्ही नानांचं करु..मी रजा घेईन…”

मग आक्का चपापल्या. सून आफीसला निघून गेली. आक्का खिडकीतून तिला वळणापर्यंत पहात राहिल्या. त्यांचे डोळे झाकोळले…

हे असं काय होतय् आपल्याला? त्यांना खूप एकटेपणा जाणवू लागला..नानांजवळ जावं.. सांगावं त्यांना. “तुम्ही लवकर बरे व्हा.. तुमच्याशिवाय कोण आहे हो मला…?”

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments