सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ करवंदं ….. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

शाळा सुटली ,पाटी फुटली,आई मला भूक लागली…

बाळपणीच्या या गंमत गाण्याचा अर्थ आता निराळेपणाने ऊलगडतो…खरंच बाल्य संपतं..जीवनाला निराळे फाटे फुटतात..

वळणं बदलतात..आणि आठवणींची भूक मनांत वाढत जाते..

अशीच अवचित सुधाची आठवण आली.

काय गंमत असते ना? बदलत्या वयाबरोबर अनेक नवी माणसं आपल्या भोवती गोळा होतात. काहींशी नाती जमतात .काही तात्पुरती कामापुरतीच राहतात.

पण या गुंतवळ्यातही दृष्टीआड असल्या तरी मनात घट्ट रूतलेल्या काही व्यक्ती असतातच आपल्या बरोबर!

त्यातलीच सुधा!

माझी बालमैत्रिण. त्या अबोध ,अजाण वयात मी तिच्यावर विलक्षण प्रेम केलं आणि तिनही तेव्हढच!

 एका सुखवस्तु कुटुंबात, लाडाकोडात वाढत असलेल्या मला,आईवडीलच नसलेल्या, म्हातार्‍या आजीबरोबर,पत्र्याचे छप्पर असलेल्या एक खणी घरात राहणार्‍या सुधाबद्दल मला असीम आपुलकी होती!

ती एक निरपेक्ष निरहंकारी निरागस मैत्री होती.

शाळेत एका बाकावर बसून आम्ही चिंचा बोरं खाल्ली.

एकमेकींच्या वह्यांमधे चित्रं काढली.

शाळेतल्या आंब्याच्या पार्‍यावर बसून खूप गप्पा केल्या.गाणी म्हटली, गोष्टी सांगितल्या.

एकत्र शिक्षा भोगल्या. एकत्र रडलो .एकत्र हसलो.

एक दिवस ग्रामदेवीच्या यात्रेत सुधाला मी करवंदं विकताना पाहीलं.

मला कससंच झालं.मी वडीलांना तिच्या टोपलीतील सगळी करवंद. विकत घ्यायला लावली.

संध्याकाळी शुभंकरोती म्हणताना,मी प्रार्थना केली,

“देवा, सुधाला सुखी ठेव..तिला खूप पैसा संपत्ती दे!”

  पण दुसर्‍या दिवशी सुधा शाळेत माझ्याशी बोलली नाही.

मी अबोल्याचं कारण विचारलं तेव्हां ती फटकारुन म्हणाली,”तुला ‘ग’ ची बाधा झाली आहे.पैशाचा तोरा आलाय् .तू स्वत:ला समजतेस काय?

मग लक्षात आले.

मी सुधाचा अभिमान दुखावला.मी मैत्रीच्या भावनेनं केलं, पण सुधा दुखावली.

मी रडले. तिच्या विनवण्या केल्या.पण ही धुम्मस काही दिवस राह्यलीच.

पण नंतर पावसाची सर कोसळुन जावी अन् वातावरण हिरवंगार शीतल व्हावं,तसं आमचं भांडण मिटलं.

आम्ही पुन्हा एक झालो…

कुठल्याच भिंती आमच्या मैत्रीच्या आड आल्या नाहीत.

ज्या गंमतीने माझ्या प्रशस्त सजवलेल्या घरात, आम्ही पत्ते, चौपट, काचापाणी खेळलो, तेव्हढ्याच मजेत तिच्या घरात शेणानं सारवलेल्या जमिनीवर, कोळशानं रेघा मारुन टिक्कर खेळलो. पावसाळ्यात तिच्या एकखखणी घराभोवती गुढघा  गूढघा पाणी साचायचं. त्यात कागदाच्या होड्या सोडायचो..

खूप मज्जा…

 

शाळा संपली.

बाल्य सरले.

वाटा बदलल्या..

नकळत सुधाचा हात सुटला.

पण निरागस मैत्रीचं हे नातं विस्मरणात गेलं नाही.

कारण त्या नात्यानेच संस्कार केले.जडणघडण केली.

जमिनीवर राहण्याचा मंत्र दिला…

अजुनही वाटतं कधीतरी हरवलेली सुधा भेटेल.

आणि माझ्यासाठी पानाच्या द्रोणात आंबट गोड करवंदं घेऊन येईल…….

मी वाट पाहत आहे …

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments