? जीवनरंग ?

☆ वयोवृद्ध वटवृक्ष ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

सकाळचे साडेआठ वाजले होते. मोबाईल चाळत बसलो होतो.फेसबुकवर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून मेसेज करत होतो. बायकोला ऑफिसला जायचे होते, त्यामुळे तिची आवरा- आवर चालू होती.आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. अण्णा (माझे वडील) आणि रेवती (माझी सहा वर्षांची मुलगी) सकाळी सकाळी फिरायला सोसायटीच्या बागेमध्ये गेले होते.

“अरे आनंदा आंघोळ करून घे- पाणी तापलंय ” 

असा आईचा आवाज आला. तसा मी बोललो “ हो आलो पाच मिनिटात.” 

 “काय मेलं त्या मोबाईल मध्ये असतं– दिवसभर मोबाईल हातात धरून बसलेला असतो, “

आईची बडबड चालू होती. 

तेवढ्यात बाहेर रेवतीचा आवाज आला, ” पप्पा अण्णांनी बघा तिथं पडलेले आंबे उचलून आणलेत ” हे ऐकताच माझ्या कपाळावर आठ्या पडल्या.

दोन महिन्यांपूर्वीच मी स्वतःच्या फ्लॅटवर राहायला आलो होतो. त्याआधी अण्णा आणि आई गावी राहत होते. मी, रेवती आणि माझी बायको इथे पुण्यातच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. रेवतीने बाहेरून बेल दाबली आणि मी पटकन उठून दरवाजा उघडला.

अण्णा आणि रेवती आत आले आणि दरवाजा लावून घेतला. मी अण्णांकडे वळलो. अण्णांनी पंधरा ते वीस आंबे आणले होते.झाडावरून पडलेले असल्यामुळे त्यातले काही आंबे फुटले पण होते.

“अण्णा कळत नाही का तुम्हाला– पडलेले आंबे उचलून आणलेत.   “

‘अरे पोरा कोणी टाकून दिलेले आंबे नाहीत ते.  झाडाचेच खाली पडलेले आंबे आहेत. “ अण्णा म्हणाले.

” ते काही असू द्या.  आपण आता फ्लॅटमध्ये राहतो.  असल्या भिकार सवयी सोडा, नाहीतर रेवतीला पण त्या सवयी लागतील.” 

 अण्णा काही न बोलता पिशवीतून आंबे काढत होते.

” आणि हो आता इस्त्री केलेले कपडेच घालायचे.  चुरगळलेले कपडे घालायचे नाहीत.  “.

” ते भोकं पडलेलं बनियन आधी टाकून द्या.  दरिद्री पणाचे लक्षण सोडा, आणि जरा चांगले वागा. “

“ बरं बाबा.  आता तुझ्या घरात रहायचे म्हटल्यावर तुझंच ऐकावं लागेल. “ 

” अण्णा अहो तुम्ही तीस वर्षात कमावला नसेल एवढा पैसा मी एका वर्षात कमावतो. त्यामुळे ही असली फालतू काटकसर करू नका. आणि हो, अजून एक, तुम्ही सारखं सारखं खाली गेटवर वॉचमनशी गप्पा मारत बसत जाऊ नका.  सोसायटीतली माणसं तुमच्याकडे बघतात, बरं दिसत नाही ते. किती झालं तरी ते आपले नोकर. त्यांच्याशी एवढी सलगी ठेवायची नाही.” 

 माझा तोंडाचा पट्टा चालू होता.आणि अण्णा ते आणलेले आंबे आतमध्ये धुवायला घेऊन गेले. 

आई माझं सगळं बोललेलं  ऐकत होती, पण काही न बोलता तिचं काम चालू होतं.

  थोड्याच वेळात बायको ऑफिसला निघून गेली. आता घरात मी,आई,अण्णा आणि रेवती, आम्ही चौघेच होतो.अशाच गरमागरमीच्या वातावरणात दुपारचे दोन वाजले. जेवण वगैरे उरकल्यावर मी पुन्हा मोबाईल हातात घेऊन बसलो.आई पलीकडे चटईवर बसली होती. रेवती तिची खेळणी मांडून तिच्या बाहुलीसोबत खेळत होती.अण्णा खुर्चीतून उठले आणि सकाळी आणलेले आंबे घेऊन आले. त्यांनी सगळे आंबे एका पोत्यावर टाकले. मी आपलं बघून न बघितल्यासारखं केलं.  आंबे बघून रेवती अण्णांजवळ जवळ गेली. खरं तर तिला पण आंबा खायचा होता. पण मी रागवणार म्हणून गप्प बसली होती. अण्णांनी एक आंबा तिला दिला, तसा तिने आंबा खायला सुरुवात केली.

” वाव, किती गोड आंबे आहेत, ” रेवती बोलली आणि माझं लक्ष तिकडे गेलं.

“ खरंच एवढा गोड आहे का आंबा ? “ मी सहज बोललो.

” हो पप्पा. आपण मागच्या आठवड्यात आणलेल्या पेटीतल्या आंब्यापेक्षा गोड आहे. “

 मी तिचा आंबा खात असतानाचा फोटो मोबाईलवर काढायला लागलो, तसं मला अण्णांनी आवाज दिला– “ पोरा तुला पण लहानपणी पाडाचे आंबे फार आवडायचे,म्हणून तू शाळा सुटली की मुद्दाम पाटलाच्या आमराईतून घरी यायचास, आणि आमराईत पडलेले आंबे तुझ्या शाळेच्या दप्तरात भरून आणायचास. पडलेले आंबे उचलले तर पाटील पण कोणाला काही बोलत नसायचा. झाडाचे आंबे पाडले की मग मात्र पाटलाचं  नुकसान व्हायचं.”

 मी अण्णा बोलत असल्याचं पाहून मोबाईल बाजूला ठेवला.

“ तू लहानपणी आणलेल्या त्या आंब्यांना  माती लागलेली असायची, नाहीतर ते आंबे पाखरांनी खाल्लेले तरी असायचे.  तरीपण तुला ते आंबे आवडायचे. आता तुझ्याकडे  पैसे आलेत म्हणून तुला ते सगळं नकोसं वाटायला लागलंय. आमची चुरगळलेली फाटकी कापडं तुला नकोशी वाटायला लागलेत.  गावाला दुष्काळ पडला होता तेव्हा फक्त तीन टाईमच्या जेवणावर मार्केट यार्डात रात्रीच्या पाळीला वाचमेन होतो मी. रात्रीचं वाचमन काम आणि दिवसा हमाली केली त्या टायमाला. तुझ्या आईनी चार घरची धुणीभांडी केली.  पर कधी कुणासमोर हात पसरला नाही.अरे, आपल्या सोसायटीचा वॉचमन पण माणूसच आहे की. आणि त्याच्या पोरानी नशीब काढलं तर तुझ्यासारखा साहेब होईलच की. अरे माणसानं माणसासारखं राहिलं पाहिजे एवढंच कळतं बघ आम्हाला. म्हणून तर त्या वॉचमन बरोबर गप्पा मारत असतो. आणि  पहिल्यापासून असंच आहे आम्ही.

 पर एक मातुर छाती ठोकून सांगतो, तुला धरून सहा पोरं वाढवली.  पर कधी एक रुपयाची सुद्धा लबाडी केली नाही बघ. कालच्या वादळवाऱ्याच्या पावसात हे पिकलेले आंबे जसे गळून खाली पडले, तशी ही म्हातारी पाखरंसुद्धा तुमच्या आयुष्यातून उडून जातील.  आता आम्हा म्हातार्‍यांचे असे किती दिवस राहिलेत. “ 

मी मान खाली घालून सगळे ऐकत होतो.

मध्येच आईकडे लक्ष गेलं. ती पदराने डोळे पुसत होती.

माझ्या डोळ्यातही पाणी आलं,तसा मी आण्णांच्या पुढे हात केला आणि अण्णांना म्हणालो —

 “अण्णा, एक गोड बघून आंबा मला पण द्या की “–

अण्णांच्या चेहऱ्यावर हसू फुललं तसा सुरकुतलेला त्यांचा चेहरा टवटवीत दिसायला लागला.

प्रत्येकाच्या घरात असा वयोवृद्ध वटवृक्ष असतो. कुटुंबाची काळजी घेता घेता खंगून गेलेला असतो. घरातल्या अशा म्हाताऱ्या आजी आजोबा किंवा आई-वडिलांना थोडं त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा जगू द्या,कारण आयुष्यभर ते मन मारून जगलेले असतात– फक्त तुमच्यासाठी.

प्रस्तुती:-  संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments