जीवनरंग
☆ घास ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆
खूप बेचैनीत रात्र संपली. मुश्किलीने सकाळी एक चपाती खाऊन, घरुन आपल्या शोरूमला निघालो. आज कुणाच्या तरी पोटावर पहिल्यांदाच लाथ मारायला निघालोय, हा विचार आतल्या आत टोचत होता.
जीवनात माझी वर्तणूक राहिली आहे, की आपल्या आसपास कुणाला भाकरीसाठी तरसावे लागू नये. पण या वाईट काळात आपल्याच पोटावर मार पडत आहे.
दोन वर्षांपूर्वीच आपली सर्व जमा बचत गुंतवून मी कपड्यांचं शोरुम उघडलं होतं, पण सध्या दुकानातील सामानाची विक्री निम्म्यावर आली आहे. मी आपल्या कपड्यांच्या शोरूममध्ये दोन मुलं आणि दोन मुली कामाला ठेवल्या आहेत, ग्राहकांना कपडे दाखविण्यासाठी.
लेडीज डिपार्टमेंटच्या दोन्ही मुलींना तर काढू नाही शकत. एकतर कपड्यांची विक्री त्यांच्यामुळेच जास्त होते आहे, दुसरं म्हणजे त्या दोघींचीही परिस्थिती खूपच गरीब आहे.
दोन्ही मुलांपैकी एक जुना आहे, आणि तो घरात एकुलता एक कमावता आहे.
जो नवा मुलगा दीपक आहे, मी त्याचाच विचार केला आहे. बहुतेक त्याचा एक भाऊही आहे, जो चांगल्या ठिकाणी नौकरी करत आहे. आणि तो स्वतः हुशार, मनमिळाऊ आणि हसतमुखही आहे. त्याला अजून दुसरीकडे कुठेही काम मिळू शकेल.
या पाच महिन्यात, मी बिलकुल उध्वस्त झालोय. परिस्थिति बघता एक कामगार कमी करण ही माझी मजबूरी आहे, हाच सगळा विचार करत मी दुकानात पोहोचलो.
चारही जण येऊन पोहोचले होते. मी चौघांना बोलावलं व खूप दुःखी होत म्हणालो….
“बघा, दुकानाची आताची परिस्थिति तुम्हा सर्वांना माहीतच आहे, मी तुम्हा सर्वांना कामावर ठेऊ नाही शकत.”
त्या चौघांच्या कपाळावर चिंता स्पष्ट झळकू लागली. मी बाटलीतील पाण्याचा घोट घेत घसा ओला केला. “कुण्या एकाचा… आज हिशोब.. करुन देतो. दीपक, तुला कुठे दूसरीकडे काम शोधावे लागेल.”
“हो काका”. त्याला पहिल्यांदाच इतकं उदास झालेलं बघितलं. बाकीच्यांच्या चेहेऱ्यावरही काही खास प्रसन्नता दिसत नव्हती. एक मुलगी, जी बहुतेक दीपकच्याच घराजवळ रहाते, काही बोलता बोलता थांबली.
“काय आहे, बाळ ? तुला काही म्हणायचं आहे का ?”
“काका, याच्या भावाचं पण काम काही महिन्यांपूर्वीच सुटलं आहे, याची आईही आजारी असते.”
माझी नजर दीपकच्या चेहऱ्यावर गेली. त्याच्या डोळ्यात जबाबदारीचे आँसू होते, जे तो आपल्या हसतमुख चेहऱ्याने लपवत होता.
मी काही बोलणार इतक्यात दुसरी मुलगी बोलली, “काका ! वाईट वाटणार नसेल तर एक बोलू ?”
“हो… हो, बोल ना !”
“कुणाला काढण्यापेक्षा, आमचा पगार कमी करून द्या… बारा हजारांच्या जागी नऊ हजार करून द्या.”
मी बाकीच्यांकडे बघितलं,
“हो साहेब ! आम्ही एवढ्या पगारावरच काम चालवून घेऊ.” मुलांनी माझी अडचण, आपसात वाटून घेण्याच्या विचाराने, माझ्या मनावरील दडपण जरूर कमी केले.
“पण तुम्हा लोकांना हे कमी तर नाही ना पड़णार ?”
“नाही काका ! कोणी साथीदार भूका रहावा… यापेक्षा हे कधीही चांगले की, आम्ही सर्व दोन घास कमी खाऊ.”
माझे डोळे ओले करून, ही मुलं आपापल्या कामास लागली— माझ्या नजरेत, माझ्यापेक्षा कितीतरी मोठे होऊन…!
संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈