श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ वाट चुकलेलं माकड… भाग-3 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडेही भुईसपाट झाली. आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्या सारखी उदास होऊन गेलेली लेकुरवाळी केळ..! तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!)
हे जे काही घडलं त्यात बेकायदेशीर काहीच नव्हतं.तरीही स्वतःचं हक्काचं काहीतरी कुणी हिसकावून घ्यावं तसं माझं मन उदास,अधू होऊन गेलं. त्या अधू मनाचा ‘कार्पेट एरिया’ या उदास मनस्थितीत थोडा आक्रसत चाललाय हे जाणवत होतं!
अर्थात याला इलाज नव्हता.काळ हेच याच्यावरचं औषध होतं..!
त्या औषधानेच आक्रसून गेलेलं मन पुन्हा प्रसरण पावलं. आपली स्वतःची सदनिकासुद्धा अशाच भुईसपाट केलेल्या फळा- फुलांच्या झाडांवरच उभी आहे याची जाणीव होताच ते प्रसरण पावलेलं मन उदासवाणं का होईना थोडसं हसलंसुद्धा..!
त्या परसदारी मग सिमेंटची झाडं रोवली गेली. कामं आपापल्या वेगाने सुरू झाली आणि आपला वेग वाढवत राहिली. निसर्गाशी नातं तोडणाऱ्या भिंती उंची वाढवत उभ्या राहू लागल्या.अगदी डेरेदार वृक्षांपेक्षाही उंच वाढू लागल्या.
एक दिवस देवाची पूजा झाल्यानंतर जाणवलं की एरवी पूर्वेकडच्या खिडकीतून आत येऊन थेट माझ्या देवघरातल्या देवांचे पाय धुणारा कोवळा सूर्यकिरण आज आलाच नव्हता.पलिकडे उभ्या राहिलेल्या भिंतीवर धडकून तो जायबंदी होऊन तिथेच पडलेला होता !
त्यादिवशी साग्रसंगीत पूजा होऊनही मनातले देव मात्र असे पारोसेच राहिले होते. अस्वस्थ मनातली ही मरगळ मग स्वतःच कंटाळून कधीतरी खालमानेने निघून गेली..!
माझ्या सदनिकेतला अवकाश अंधारला तरी मन कुठेतरी उजेड,हुरुप,उत्साह शोधत राहिलं.जमेल तसं हळूहळू फुलत राहिलं. मागचं सगळं विसरून गेलं.
पण ते हिरमुसणं जसं तात्कालिक होतं तसं ते विसरूणंही क्षणभंगुरच ठरलं. गंमत म्हणजे ते विसरणं क्षणभंगुर ठरवायला निमित्त झालं एका माकडाचंच..!
त्या सकाळी आमच्या पूर्वेकडच्या कंपाऊंडच्या रुंद भिंतीवर ते माकड बसलेलं होतं. सैरभैर होऊन इकडे तिकडे पहात होतं.वाट चुकल्यासारखं केविलवाणं दिसत होतं. त्याच्या अस्वस्थ येरझारा माझ्यावर गारूड करीत होत्या. ट्रॅक्टरखाली पिल्लू चिरडून मेल्याने वेडीपिशी झालेली माकडीण आणि नुकताच सर्वांचे चावे घेऊन हैदोस घालत अखेर जेरबंद झालेलं ते माकड या सर्वांच्यातलाच एक समान धागा माझ्या नजरेसमोर अधिक ठळक केला तो लहानपणी बिरबलाच्या गोष्टीत भेटलेल्या, आपल्या पिलाला पाण्याने भरलेल्या पिंपात पायाखाली घेऊन ठार मारून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या माकडीणीने ! तिच्या त्या कृतीतून हुशार बिरबलाने भला स्वतःच्या सोयीचा अर्थ काढून त्यातच धन्यता मानली असेल, पण क्रूर आप्पलपोट्या माणसांच्या जंगलात एकट्या पिल्लाला मागे ठेवण्यापेक्षा काळजावर दगड ठेवून त्याचाच बळी घेणार्या त्या माकडीणीचं अपत्यप्रेम निश्चितच निर्विवाद होतं हे या माकडाच्या अस्वस्थ येरझारा मला आग्रहाने सांगत होत्या.
मला त्या माकडाची मनापासून कींव वाटली. पण त्याच्यात गुंतून पडायला मला वेळ नव्हता. ब्रश करून मी आत आलो. तोंड धुवून चहा घेतला. पेपर वाचला. आंघोळीला जाण्यापूर्वी पूजेला कुंड्यातल्या झाडांची फुलं आणायला मी टेरेसवर गेलो. फुलं काढली.परत फिरताना सहज माझी नजर खाली गेली. वाट चुकलेलं ते माकड अद्यापही खाली तिथेच होतं. रस्त्यापलीकडे एकटक रोखून पहात केविलवाण्या नजरेने ते काहीतरी सांगू पहात होतं. रस्त्यालगतच्या घराच्या उंच छपरावर माकडांचा एक कळप बसलेला होता. कळपातल्या सर्व माकडांच्या आशाळभूत नजरा या माकडावरच खिळलेल्या होत्या!
कित्येक दिवसांपूर्वी मनात ठाण मांडून धुमाकूळ घालणाऱ्या माकडामुळे आधीच हळवं झालेलं माझं मन अंतर्बाह्य शहारलं..!
माकडांच्या नि:शब्द अशा त्या हालचालींमध्ये एक आर्त दडून बसलेलं माझ्या लक्षात आलं..!
आंब्याचा मोहोर यायच्या या दिवसात माकडांचा एक कळप दरवर्षी परसातल्या त्या आम्रवृक्षावर मुक्कामाला यायचा. आंब्याचा मोहोर खुडून मेजवानी झोडायचा. तृप्त होऊन त्या आम्रवृक्षाचा कृतज्ञतेने निरोप घेऊन जायचा.
आज.. तोच कळप नेहमीच्याच वाटेने इथवर आला होता. त्याच कळपातलं ते माकड वाट शोधत नेमकं इथं आलं होतं. म्हणजे त्यांची वाट चुकलेलीच नव्हती. सुगंधी मोहराने फुललेलं ते शोधत होते ते आंब्याचं झाड मात्र माझ्या सोनचाफ्याच्या झाडासारखंच हरवलेलं होतं !
ही माकडं वाट चुकलेली नव्हती तर स्वतःच्या तथाकथित सुखासाठी सगळ्यांच्याच सुखाचा आंबेमोहोर आतयायीपणाने ओरबाडून घेणारा आणि निसर्गाने मोठ्या विश्वासाने दिलेलं तेजोमय बुद्धिमत्तेचं कोलीत हातात येताच उन्मत्तपणाने थैमान घालंत सारा निसर्गच जाळत सुटलेला माणूसच खरंतर वाट चुकला होता..!
माणसाच्या रूपातलं हे ‘वाट चुकलेलं माकड’ अंशरूपाने कां होईना माझ्यातही अस्तित्वात आहे याची जाणीव मला सैरभैर करतेय. स्वतःच्या उत्कर्षाच्या सगळ्याच वाटांना पारखा होत चाललेला प्रत्येक माणूसही आज त्यामुळेच अस्वस्थ आहे !
माणसाच्या रूपातल्या या वाट चुकलेल्या माकडाला जेरबंद कसं करायचं या विवंचनेत माझ्या मनातला निसर्ग मात्र दिवसेंदिवस सुकत चालला आहे..!!
समाप्त
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈