सौ. दीपा नारायण पुजारी
जीवनरंग
☆ महत्वाकांक्षा….. भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
सीमा लगबगीनं बसस्टॉपवर आली. आज नेहमीची फुलेवाडीची बस सोडून ती शिवाजी विद्यापीठाच्या बसमध्ये चढली. सीमाला आज रमाकाकूंना भेटायला जायचं होतं. गेले काही दिवस त्या फोन करून तिला ‘येऊन जा ग’, म्हणून बोलवत होत्या. आज शनिवार असल्यानं तिला हाफ डे होता. सकाळी घरातून निघतानाच तिनं सुधीरला आणि माईंना तसं सांगितलं होतं. घरी जायला थोडा उशीर झाला तरी चालणार होता आज. चिनू , तिची मुलगी, माईंना दत्ताच्या देवळात सोडेल संध्याकाळी आणि ती जीमला जाईल. सुधीर ऑफीस झाल्यावर घरी जाता जाता त्यांना पिकअप करेल, असं सगळं ठरवूनच सीमा सकाळी घरातून बाहेर पडली होती. अर्थातच ती रमाकाकूंना निवांत वेळ देऊ शकणार होती. आजची संध्याकाळ रमाकाकूंसाठी !!
रमाकाकूंच्या सोबत राहण्याची सीमाची ही काही पहिलीच वेळ नव्हती. रमाकाकूंचं काय काम असावं बरं? खिडकीतून बाहेर बघत ती विचार करत होती. रमाकाकूंची सुषमा तिची शाळेपासूनची मैत्रीण. रमाकाकू आणि सीमाची आई दोघीही पद्माराजे हायस्कूलला शिक्षिका. सुषमा आणि ती त्याच शाळेत, एकाच वर्गात, एकाच बाकावर बसत. त्यांच्या मैत्रीचं सगळ्यांना खूप नवल वाटे. अभ्यासाची आवड सोडली तर बाकी काहीच साम्य नव्हतं दोघीत. सीमा उंच, काळी सावळी, सुषमा गिड्डी, गोरीगोबरी. सुषमाचा बॉयकट,सीमा जाडजूड केसांच्या दोन लांब शेपट्या घाले. सुषमा वक्तृत्व, निबंध स्पर्धेत माहीर, तर सीमा चित्रकला, पेंटिंग, क्राफ्ट यात रमणारी. पण मैत्रीला कुठले नियम नसतात. त्या दोघींचे मेतकूट चांगलेच जमत असे. अगदी सुट्टीच्या दिवशीही त्या एकत्र असत. दहावी नंतर दोघींनी सायन्स साईड घेतली. न्यू कॉलेजचे ते अभ्यासाचे दिवस सीमाच्या डोळ्यासमोर आले. खूप अभ्यास करूनही मेडिकलला ऍडमिशन मिळण्यासारखे मार्क दोघींनाही मिळाले नव्हते.
सीमानं आपली सीमा ओळखून न्यू कॉलेज मध्येच एफ्.वाय.बी.एस्सीला ऍडमिशन घेतली. सुषमा शेवटपर्यंत कोणत्यातरी मेडिकल कॉलेजमध्ये मिळेल प्रवेश, निदान बी. ए. एम्. एस.तरी, अशा आशेत वाट बघत राहिली. तेव्हाही रमाकाकू सीमाला सुषमाची समजूत काढायला सांगत. ती मात्र ऐकत नसे कोणाचंच. नाईलाजानं सुषमानं ऑगस्ट एन्ड ला एफ्. वाय. जॉईन केलं. जून ते ऑगस्ट, तीन महिन्यांत झालेला सगळा अभ्यास सीमानं आनंदानं समजावून सांगितला. गेले तीन महिने सुषमाशिवाय वर्गात बसणं तिला फारच कंटाळवाणं वाटत होतं. आता पुन्हा एकदा मैत्रीचं फुलपाखरू हसू लागलं होतं. अभ्यास, स्पर्धा, प्रॅक्टिकल्स, स्टडीटूर्स यात पाच वर्षे हातात हात घालून पळाली. एम्. एस्सीच्या कॉन्व्होकेशन नंतर दोघींच्या घरच्यांनी त्यांची डिग्री आणि मैत्री दोन्ही सेलिब्रेट केलं. किती आनंदात होती सीमा ! पण हा आनंद काही काळच टिकला.
सीमाला गावातील एका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नोकरी मिळाली. तशी ती बॅंकेच्या परीक्षा देत होती. रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षाही द्यायच्या होत्या. तोपर्यंत रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून ही नोकरी धरली तिनं. मनातील ही दोलायमान स्थिती सुषमाला सांगायची होती. कॉलेज नसल्याने दोघींची भेट होत नव्हती. सुषमा मोबाईल ही उचलत नव्हती. बरेच दिवस तिचा पत्ताच नव्हता. तो मैत्री संपवणारा दिवस सीमा कधीच विसरू शकत नाही. आजच्या सारखीच शनिवारची संध्याकाळ होती. सीमा तिच्या आईबरोबर गप्पा मारत बसली होती. अचानक सुषमा आली. सीमाची कळी खुलली.
“सीमा, चल ना गं, रंकाळ्यावर जाऊ. किती दिवस झाले भेळ खाल्ली नाही आपण.”
सीमानं आईकडं पाहिलं. ” या गं जाऊन. मनसोक्त भेळ खा. गप्पाही मारा पोटभर.” आई म्हणाली.
सीमा पटकन आवरायला पळाली. घरी परत यायला थोडा उशीर झाला. पण आज छान वाटत होतं. सुषमा भेटली एवढ्यावरच ती खूष होती.
रात्री झोपताना आईनं तिला विचारलं,” काय गं? सुषमाचा नवरा काय करतो? तारीख ठरली का लग्नाची?”
“लग्न? आणि सुषमाचं? नाही. मला काही बोलली नाही ती? तुला फोन आला होता का तिच्या आईचा?”
“नाही गं. फोन कुठं? सुषमाच म्हणाली तू आवरायला गेली होतीस तेव्हा.”
आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला.
क्रमशः….
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
मो.नं. ९६६५६६९१४८
Email: [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈