श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ शिवकळा – भाग-1☆ श्री आनंदहरी ☆
नेहमीप्रमाणे कोंबड्याच्या पहिल्या आरवण्याला तिला जाग आली. नवरा ढाराढूर घोरत पडला होता. तिने काही त्याला उठवलं नाही. पटापट स्वतःचं सारं आवरलं आणि चुलीवर चहा ठेवून भाकरीचं पीठ मळायला घेतलं आणि त्याला हाक मारली. दोन तीन हाका मारल्या तेव्हा तो उठला. दारातल्या रांजणातून डिचकीभर पाणी घेऊन तोंड धुतलं आणि चुलीपाशी येवून बसला.तिने वैलावरचा चहा उतरून पुढयातली कपबशी भरली आणि त्याच्यापुढे ठेवत त्याला म्हणाली,
“ येरवाळीच पाळकातल्या सदानानाकडं कोळपाय जायाचं हाय… ध्येनात हाय न्हवं ?”
“ व्हय. हाय की ध्येनात. “
“ आवरा बिगीबिगी. तंवर भाकरी बांदून द्येत्ये.” तो आवरुन भाकरी घेऊन सदानानाकडे कोळपायला निघुन गेला. तिने स्वतःचे सारं आवरलं. आपली भाकरी बांधून घेतली आणि घराचे दार लावलं. बाहेरच्या बाजूला दिवळीत ठेवलेले खुरपं घेवून, भांगलायला उशीर होऊ नये म्हणून ती लगबगीनं निघून गेली.
घरी येईपर्यन्त दिवेलागण झाली होती. तो परत आल्याचं काहीच चिन्ह दिसेना. तिला आश्चर्य वाटलं. ‘ कोणीतरी भेटलं असेल, बसलं असतील बाण्या हाणत ..’ असा विचार करून तिने हातपाय धुवून चूल पेटवली. चहाचं भुगूनं चुलीवर ठेवलं आणि ती घरातली इकडची-तिकडची आवराआवर करायला लागली. चहाला चांगली उकळी आल्यावर चुलीजवळ बसून चांगला कपभर चहा प्याल्यावर तिला जरा बरं वाटलं. चांगली तरतरी आल्यासारखी वाटली. ‘आता ईतीलच ही..कुटंसं ऱ्हायल्यात कुणास ठावं ? आतापातूर याला पायजेल हुतं .’ असे मनोमन म्हणत ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
भाकरी झाल्या, कालवण झालं तरी त्याचा पत्ताच नव्हता. तो अजून आला कसा नाही ? या विचाराने ती मनोमन अस्वस्थ झाली. काय करावं ते तिला सुचेना. एकदा वाटलं सदानानाकडं जावून चौकशी करून यावं… पण एवढ्या रात्रीचं एवढ्या लांब पाळकात जाणे शक्य नव्हते. ती त्याची वाट पहात बसून राहिली.
मनात नाना विचार येत होते. काळजी वाटत होती. दिवसभरच्या कामानं अंग आंबून गेलेलं होते. दोन घास खाऊन केव्हा एकदा पाठ भुईला टेकतोय असे तिला झालेलं होते पण तिला काही खावंसं वाटेना. सारा स्वयंपाक तसाच होता. ती दाराकडे नजर लावून विचार करत, काळजी करत भिंतीला टेकून बसून राहिली होती.
तिला बसल्या जागीच बऱ्याच वेळाने कधीतरी डोळा लागला होता. जाग आली तेंव्हा चांगलेच फटफटलं होते. तो परत आलेलाच नव्हता. ‘ मागल्यावानी कूटंतरी ग्येलं नसतीली न्हवं ? ‘ तिच्या मनात आलं आणि तिला रडूच आलं .
मनाला कसंबसं सावरत तिने पटकन स्वतःचं आवरलं. कुणाकडे जावून अशी चौकशी करणे तिला बरे वाटत नव्हतं पण दूसरा पर्याय नव्हता. ती झपाझप चालत पाळकात सदानानाकडं गेली. सदानानांनी जे सांगितले ते ऐकून तिने डोक्यावर हातंच मारून घेतला. तिचा नवरा सदानानांनी बोलावूनही आणि तिने सांगूनही सदानानाकडं कोळपायला गेलाच नव्हता.
तिच्या मनातली भीती खरी ठरली होती. तिचा नवरा पुन्हा एकदा तिला एकटीला सोडून कुठेतरी गेला होता, परागंदा झाला होता. तिला ते जाणवले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तिच्या कुवतीनुसार शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे तिलाही चांगलंच ठावूक होते.
पहिल्यापासून तसा तो चंचलच होता. एके ठिकाणी फार काळ रमायचाच नाही. आपण कुठं जातोय? कशासाठी जातोय? हे घरात कुणालातरी सांगावं, आपल्यामागे कुणीतरी आपली काळजी करत बसतील हे कधीच त्याच्या गावीही नव्हतं. कापलेल्या पतंगासारखा तो कुठंतरी भरकटायचा. निदान लग्न झाल्यावर तरी त्याच्या वागण्यात सुधारणा व्हायला हवी होती, जबाबदारीची जाणिव यायला हवी होती पण तसं काहीच घडलं नव्हतं.
तो कितीतरी वेळा असाच अचानक, न सांगता-सवरता कुठंतरी गेला होता आणि कधी दोन-चार दिवसांनी, कधी आठ-दहा दिवसांनी आला होता. एकदा तर चक्क महिन्याभराने आपला आपण परत आला होता. तिने प्रत्येकवेळी त्याला सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला होता. तो ही समजून घ्यायचा, ‘चूक झाली..’ असे म्हणायचा. ‘ पुन्हा कधी असे जाणार नाही..’ असे आश्वासन द्यायचा.. पण ते तेवढ्यापुरतंच असायचं.
क्रमशः ….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈