श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ शिवकळा – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆
ती लग्न होऊन या घरात येऊन तीन-चार महिनेच झाले होते आणि एके दिवशी रानात कामाला गेलेला तो रात्री घरी परत आलाच नाही. खूपच उशीर झाला तसं ती अस्वस्थ झाली. मनात नाना विचार येऊ लागले. तिला रडू येऊ लागलं. घरात ती एकटीच आणि गावातही तशी ती नवीनच होती. ‘काय करावं ?…’ तिला तर काहीच सुचेना. शेवटी न राहवून ती शेजारच्यांकडे गेली.
शेजारच्या म्हातारीने मायेनं तिला जवळ बसवून घेतलं. धीर देत राहिली. म्हातारीने घरातल्या बापयगड्याना त्याची चौकशी करायला, त्याला शोधायला गावात धाडलं. गावात कुठं त्याचा पत्ता लागला नाही. शेजार- पाजाऱ्यांना तरी तसं त्याच्याबद्दल फारसं काय माहीत असणार? लहानपणापासून तो मामाकडे असल्याने त्यांनाही तसा नवखाच होता आणि तसंही जाणाऱ्याची एक वाट असते आणि शोधणाऱ्याच्या दहा वाटा असतात. ते तरी त्याला कुठे कुठे शोधणार? तरीही त्यांनी शेजारधर्म पाळला होता. दोन दिवस त्याला शक्य तिथे, सगळीकडे शोधत होते.
पहिल्या दिवशी रात्रभर ती नुसती रडत होती. तिला समजवायला, सावरायला, सोबतीला शेजारची म्हातारी आली होती..पण कितीही झालं तरी शेजाऱ्यांनाही काही मर्यादा असतात. कुणीतरी त्याला शोधायला, चौकशी करायला म्हणून त्याच्या मामांकडे गेले होतं. तो गायब झालाय हे कळताच मामा-मामी लगेच आले होते. ते आल्यावर तिला काहीसं हायसं वाटलं होतं, तरीही मनात शंका-कुशंकांच वावटळ भिरभिरत होतंच. अचानक मनात संशयाच्या भुतानेही जन्म घेतला होता. त्याचं बाहेर कुठं काही असेल काय? ही शंका लाकडातल्या किड्यासारखी तिचं मन पोखरू लागली होती. ती आपले मन कुणाजवळ मोकळं करणार ? मनातली शंका कुणाला विचारणार? कुणाशी बोलणार ? नाना विचार मनात येऊन ती अस्वस्थ होत होती. आतल्या आत सोसत होती, जळत होती.
दोन दिवसांनी रात्री उशीरा, तो जसा गेला होता तसाच परत आला होता. ‘ कुठं गेलावता?’ म्हणून विचारलं तर त्यानं ‘असंच फिरत फिरत गेलोतो..’ असे सांगितले होते. मामांना त्याचे असे वागणे माहीत होते. त्यांनी पुढं फारसा विषय वाढवला नाही. मामा- मामीं दोघांनीही त्याला खूप समजावून सांगितले. तिलाही काळजी घ्यायला सांगितली. दोन दिवस राहून ते निघून गेले .
काही काळाने पुन्हा तो तसाच गेला तेव्हा मात्र तिने फारसे कुणाला सांगितलेच नाही. ‘ मामा-मामींना तरी या वयात कशाला उगाच त्रास द्यायचा ? ’ असा विचार करून त्यांनाही कळवले नाही. अस्वस्थतेत दिवस आणि रात्री काढल्या. स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत- खडत त्याच्या येण्याची वाट पाहिली. चार दिवसांनी त्याचा तो आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला होता. ती त्याला खूप बोलली, त्याच्याशी भांडलीही होती. त्याच्यावाचून तिची होणारी अवस्था तिने त्याला सांगितलीही होती पण आपलं सारं बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावरचं पाणी आहे हे तिलाही जाणवलं होते, ठाऊक झाले होते.
आता तो पुन्हा कुठंतरी गेला होता. तिला त्याचं असे वागणे, अचानक जाणे ठाऊक झालं होतं तरीही तिने त्याची वाट पाहिली. महिना होत आला तरी तो परतला नाही तशी ती जास्तच अस्वस्थ झाली. मनात एकटेपणाच्या भीतीनं घर केलेलं होतंच. तिला खूप असुरक्षितही वाटू लागलं होतं. आधीचं बाईपण, त्यात तारूण्य आणि देवाने दिलेले सौंदर्य. जाता येता खाऊ की गिळू करणाऱ्या लोचट नजरांनी जीव नकोसा व्हायचा पण मोलमजुरी केल्याशिवाय दोन वेळची भाकर मिळणार नाही अशी श्रीमंती. रोज कुणा ना कुणाचं वावर पूजायला जायला लागायचंच..
गरीबाला सौंदर्य हा शापच असतो.. कळत्या वयापासूनच तिला हा शाप भोगावा लागत होता. आईबापाची पांघर होती पण तिला गरीबीची ठिगळं होती. तरीही ती पांघर खुपच बरी असं वाटण्यासारखी सासरची अवस्था होती. लग्न होऊन ती नांदायला आली ते गवताने शाकारलेल्या, पांढऱ्या मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या झोपड़ीवजा घरात.. सासरी घरात ना कोणी मोठं होते ना धाकटं. आई-बापामागे मामानं सांभाळ करून मोठा केलेला नवरा आणि ती.. झाले कुटुंब. लहानपणापासून सांभाळलेल्या आपल्या भाच्याचं लग्न करून देवून त्याच्या गावी त्याचा संसार थाटून दिला आणि लगेचच मामा-मामी स्वतःच्या गावाला गेले.
क्रमशः ….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈