श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ शिवकळा – भाग-3 ☆ श्री आनंदहरी ☆
मामा- मामी त्यांच्या गावी गेले आणि तिला घर सूनं सूनं वाटायला लागलं.. आई-वडिलांची आठवण येऊ लागली. माहेरी तरी घरात खूप माणसं कुठं होती ? आई-बाबा, धाकटा भाऊ आणि ती अशा चौघेजणांचं चौकोनी कुटुंबच होते…पण तिला ते माहेरचं घर, घरात दुसरं कुणी नसतानाही कधी सूनं सूनं वाटले नव्हते. त्या घरात तिला कधी एकटेपणा जाणवला नव्हता.
लग्नानंतर काही दिवसातच ती सासरच्या घरात रुळूून गेली. त्या घराबद्दल मनात आपलेपणा निर्माण झाला. घराच्या कणाकणाशी एक नाते निर्माण झालं… माहेरच्या, आई-वडिलांच्या घरासारखीच त्या घराशीही तिची नाळ जुळली. घर झोपड़ी का असेना, तिच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत तिचा स्वतःचा असा निवारा होता आणि त्यात ती खूप खुश होती.
नवरीचा नवेपणा नऊ दिवसही नव्हता . लगेचंच नवऱ्याबरोबर कामाला जायला सुरवात झाली. दोघांच्या राबत्या हातांनी काडी काडी जमवत ती आपले घरटे आकाराला आणत होती. साध्याशा झोपडीतही सुखाचं, स्वप्नांचं चांदणे पसरत होती, बरसत होती. लहानपणापासून कष्टणाऱ्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागले होते. स्वतःच्या घरट्यात स्वर्ग निर्माण करण्याचे डोहाळे.
गावच्या शिवारात मिळेल ते काम नवऱ्यासोबत जावून ती करत होतीच पण तिथे काम नसले तर शिवधडीच्या गावांच्या शिवारात काम करायला जाण्यासाठी नवऱ्याला विनवायची, तयार करायची. तो सुरुवातीला कुरकुरायचा पण ती त्याची समजूत घालायची. त्याला तितकासा कामाचा उरक नसला तरी तिला कामाचा उरक असल्यानं आणि तिचं कामही खूपच चांगले, नीटनेटकं असल्याने लोक त्यांना आवर्जून बोलवायला लागले. तिला त्याचा खूप आनंदही व्हायचा.
हळूहळू कधी सहज म्हणून तर कधी रानात भांगलणीला बोलावण्याच्या निमित्ताने तर कधी उसाचं पाचट काढ़ायच्या कामाला बोलवण्यासाठी कुणाकुणाचं घरी येेणं -जाणं वाढलं, तेही नेमकं नवरा घरात नसताना. कधी नवरा येईपर्यंत थांबून राहणं. काहीतरी विषय काढून बोलत राहणं.. ती घरातलें काम करत असताना न्याहाळत राहणं.. हे सुरुच असायचं. तिला हे सारे जाणवत होते, उमगत होते पण तिला काहीच बोलता यायचं नाही. ती मुकाट सारे सोसत राहायची . गरीबाची गरीबी हीच किंमत असते, तीच त्याची ओळख असते. कितीही अन्याय होत असला तरी त्याविरुद्ध बोलायला त्याला तोंड नसते हे तिला लहानपणापासून, अगदी कळायला लागल्यापासूनच ठाऊक होतं.
रानात कामाला गेले, भांगलणीला गेले की भांगलण करताना पातीमागे उभं राहून तर कधी पुढे उभं राहून पातीत तण राहिलंय काय हे पाहण्याचं निमित्त करून तिला न्याहाळत बसणारे, निरखणारे डोळे, कोणतंही काम करतेवेळी आणि एरवीही रोख़ून पाहणाऱ्या, अंगावरुन रेंगाळत फिरणाऱ्या, थबकणाऱ्या भुभुक्षित, लोचट नजरा कुठंही गेलं तरी असायच्याच. कधी काम करत असताना तर कधी काहीही कारण नसताना, काहीतरी कारण काढून सलगी करणारे, उगाचच जाता-येता स्पर्श करायला हपापलेले हातही होतेच.. तिला हे जाणवत होते.. राग ही येत होता पण गरीबाला ना रागावता येते ना चिडता येतं. ती सर्वांशी सारखेच अंतर राखून स्वत:ला सुरक्षित ठेवत होती. ती सारेच मुकाट सोसत होती. नाही म्हणलं तरी नवऱ्याच्या अस्तित्वाचं असणारं कवच अशा लोकांना काहीसा पायबंद घालून तिला काहीसं सुरक्षित ठेवत होतंच.
अक्षरशः डोळ्यांत प्राण आणून ती नवऱ्याची वाट पहात होती पण जावून खूप दिवस लोटले तरीही, न सांगता- सवरता गेलेला नवरा परतला नाही .दिसागणिक तिची अस्वस्थता वाढतच होती. तिला काय करावे काही सुचत नव्हते. जरासं कुठं खुट्ट झालं की साऱ्या गावाला कळत असते. कुणी काही तिच्यासमोर बोलत नसले, तिला विचारत नसले तरी तो घरात नाही आणि ती एकटीच आहे हे कळायला कितीसा वेळ लागणार ? साऱ्या गावाला ते ठाऊक झालं होते.
तिला कामाला बोलावण्याच्या निमित्ताने घरी येणे, ठाऊक नसल्यासारखं त्याची चौकशी करणं, तिच्या कामाची स्तुती करणं.. कधी आडून आडून तर कधी थेट तिची, तिच्या रूपाची स्तुती करणं असे प्रकार व्हायचे.. ‘अडनड असल्यावनं हाळी मार.. अनमान करू नगं.. आपुन काय परकं न्हाय..’ असे बोलून जवळीक दाखवायचा , तिच्याबद्दलची काळजी, आपलेपणा दाखवायचा प्रयत्न व्हायचा.
क्रमशः ….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈