श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ शिवकळा – भाग-4 ☆ श्री आनंदहरी ☆
ती सारंकाही मनोमन ओळखून होती पण कुणाला थेट झिडकारता, तोडता येत नाही गरिबाला. अशावेळी त्या माणसांना न बोलून किंवा गोड बोलून दूर कसं ठेवायचं याचं बाळकडू तिला आईकडून मिळालेलं होतं.. तरीही लांडग्यांच्या जंगलात राहून त्यांच्या कळपापासून आपण किती काळ स्वतःला वाचवू शकू ? ह्या प्रश्नानं तिच्या काळजाचा थरकाप होत असे. भीतीने तिची झोप उडाली होती. मामा-मामींना सांगावा धाडावा, त्यांना सारं सांगावं आणि सोबतीला बोलवावं असे कितीतरी वेळा तिच्या मनात येऊन गेले होतं..पण त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या जीवांना उगाच कशाला ताप ? आणि हे सारे नित्याचेच झाले होते, ते तरी किती काळ आयुष्याला पुरणार ? असा विचार करून ती गप्प राहिली होती.
मामा-मामी सारखेच तिचे आई-वडीलही वयस्करच. तिने त्यांना कधीच, काहीच सांगितले नव्हतं. त्यांना जरा जरी कळलं असते तरी काळजी वाटून ते बिचारे सगळं सोडून धावत आले असते आणि तिला माहेरी घेऊन गेले असते. तिला त्यांना कुणालाच तापही द्यायचा नव्हता आणि स्वतःचं घर सोडून दुसरीकडं कुठं जायचंही नव्हतं. आपण गेलो आणि इकडे नवरा आला तर.. ? असाही विचार तिच्या मनात येत होता. ती नवऱ्याची वाट पहात, सारं काही देवाच्या हवाली सोडून देऊनही, मनातून घाबरत घाबरतच दिवस कंठत होती.
भांगलणीची पात उरकून घरी परतायला रोजच्यासारखाच उशीर झाल्याने ती झपाझप चालत घरी येत होती. चांगलंच अंधारुन आलं होतं पण वाट पायाखालची होती त्यामुळे अदमास घेत चालायची गरज भासत नव्हती. चालता चालता, अचानक कुणीतरी वाटेत आडवे आल्याचं तिला जाणवल्यानं ती दचकली… थबकली… दोन पावलं मागे सरकली. ती मागे सरकताच आडवी येणारी व्यक्ती एक पाऊल पुढे आली… मग मात्र ती गडबडली, घाबरली.
“ कोन हाय ? वाटत कशापाय हूबाय ? सरा बाजूला..”
मनात दाटून आलेली भीति स्वरात डोकावू नये म्हणून तिने थोडे दरडावणीच्या सूरात म्हणाली.
समोरच्या व्यक्तीने तिच्या दरडावणीला भीक न घालता, काहीही न बोलता तिचा हात धरला . हात धरल्याने ती जास्तच घाबरली.
‘हात सोडा आदी..’ म्हणत ती हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तशी हातावरची पकड आणखी घट्ट होऊ लागली.
“ कोन हायसा ती सांगाय काय हुतंय ?”
हात सोडवण्याची धडपड थांबवत ती म्हणाली. तिने सुटण्याची धडपड थांबवल्याने, ती तिची शरणागतता वाटून तिच्या हातावरची पकड सैलावली आणि याच क्षणाची वाट पाहत असल्यासारखी, सारे बळ एकवटून हाताला हिसडा देवून स्वतःचा हात सोडवून घेत ती जी पळत सुटली ते घरात आल्यावरच तिने सुटकेचा श्वास सोडला आणि पटकन घराचं दार लावले. अगदी आतून कडी लावून दार घट्ट लावले. लावलेल्या दाराला पाठमोरे टेकत पायातले त्राण गेल्यासारखी ती खाली बसली आणि तिला रड़ू कोसळले. ती दैवाला आणि देवाला कोसत होती. तिला नवऱ्याचा आणि स्वत:चाही राग आला होता. ती तशीच बसून राहिली. ना तिला जेवावे वाटले ना तिला झोप आली.
रात्रीच्या प्रकारापासून ती मनोमन खूप घाबरली होती. आपण आपल्या गावातच नव्हे तर घरातही सुरक्षित नाही याची खात्रीच तिला वाटू लागली होती. नवऱ्याची आठवणही आली आणि असं एकटं टाकून गेल्याबद्दल प्रचंड रागही आला होता. तिला एकटे, एकाकी, हताश वाटू लागलं होतं. तिला सारं सोडून देऊन आईकडे जावं असं वाटू लागलं होते. आईच्या कुशीत शिरून रडावं असे वाटत होते.
तिला आईची, माहेरची आठवण आली तशी तिला गोदामावशी आठवली. गोदामावशींच्या अंगात शिवकळा म्हणजे देवीचं वारे यायचे. अंगात शिवकळा आल्यावर गोदामावशीला लोक त्यांच्या अडचणी, समस्या सांगत, काही हरवले, पडले तर त्याबद्दल विचारत असत. गोदामावशीच्या तोंडून देवीच कारण, उपाय सांगत असते असा लोकांचा विश्वास होता. लोक श्रद्धा ठेवून ते उपाय करत असत. देवीस्वरूप मानून तिच्या पाया पडत. गोदामावशी त्यांची देवी बनली होती, त्यांचं श्रद्धास्थान झाली होती हें तिने पाहिलं होतं, तिला ते चांगलंच ठाऊक होतं आणि चांगलं आठवतही होतं.
क्रमशः ….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈