जीवनरंग
☆ मास्तर साहेबांची स्कूटर ☆ सुश्री मृदुला अभंग ☆
(चांगले केले तर चांगलेच होते याचे छान उदाहरण)
प्रवीण भारती नावाचे एक शिक्षक होते. ते प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा गावापासून सात किलोमीटर दूर होती. शाळेच्या आसपासची जागा ही पूर्णपणे निर्जन होती.
त्यांच्या गावातून शाळेपर्यंत जाण्यासाठी क्वचितच वाहन मिळत असे, त्यामुळे ते बरेचदा कुणाकडून तरी लिफ्ट मागत असत. कधी जर लिफ्ट मिळाली नाही, तर असा विचार करत पायीच जात असत की, “देवाने मला दोन पाय दिले आहेत, तर त्यांचा उपयोग कधी होणार.”
जेव्हा प्रवीणजी रोज लिफ्ट मागण्यासाठी उभे राहत तेव्हा विचार करत की, “सरकारने कुठल्या निर्जन ठिकाणी शाळा उघडली आहे, त्यापेक्षा गावातच मी किराणा मालाचं दुकान उघडलं असतं तर बरं झालं असतं.”
रोजच्या कटकटीतून सुटका मिळण्यासाठी प्रवीणजीनी थोडे थोडे पैसे जमा करून, चेतक कंपनीची एक नवीन कोरी करकरीत स्कूटर विकत घेतली. स्वतःचे वाहन नसल्यामुळे जो त्रास प्रवीणजींनी सहन केला होता, त्यामुळे त्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधली की कोणालाही लिफ्टसाठी नाही म्हणायचं नाही.—
—-कारण, त्यांना हे माहीत होतं की कोणी आपल्याला लिफ्ट नाकारली की किती ओशाळल्यासारखं होतं ते. आता प्रवीणजी रोज स्वतःच्या कोऱ्या करकरीत स्कूटरवरून शाळेत जात असत आणि रस्त्यात कोणी ना कोणी रोज त्यांच्याकडे लिफ्ट मागत असे आणि त्यांच्याबरोबर जात असे. परत येताना सुद्धा कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर असे.
एक दिवस, जेव्हा प्रवीणजी शाळेतून परत येत होते तेव्हा रस्त्यात, एक व्यक्ती हताश होऊन लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत होती. आपल्या सवयीनुसार प्रवीणजींनी आपली स्कूटर थांबवली आणि ती व्यक्ती काहीही न बोलता त्यांच्या स्कूटरवर मागे बसली. थोडं पुढे गेल्यावर त्या व्यक्तीने चाकू काढला आणि प्रवीणजींच्या पाठीवर टेकवून म्हणाला, “असतील तितके सगळे पैसे आणि ही स्कूटर माझ्या हवाली कर.”
ही धमकी ऐकून प्रवीणजी खूप घाबरले आणि त्यांनी लगेच स्कूटर थांबवली. त्यांच्याजवळ जास्त पैसे नव्हतेच. पण ही स्कूटर तर होतीच, जिच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. स्कूटरची किल्ली त्याला देत प्रवीणजी म्हणाले, “एक विनंती आहे.”
“काय ?” त्या व्यक्तीने खेकसून म्हटले.
प्रवीणजी विनंतीच्या सुरात त्याला म्हणाले, “तू कधीही कोणाला हे सांगू नकोस की ही स्कूटर तू कुठून आणि कशी चोरलीस. विश्वास ठेव मी पण पोलिसात तक्रार करणार नाही.”
त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले, “का?”
मनामध्ये असलेली भीती आणि चेहऱ्यावर असलेल्या औदासीन्याने प्रवीणजी म्हणाले, “ हा रस्ता खूप उबड-खाबड आणि निर्जन आहे. इथे क्वचितच वाहन मिळते. त्यात या रस्त्यावर जर अशा घटना घडल्या तर जे थोडेथोडके लोक लिफ्ट देतात, तेसुद्धा लिफ्ट देणे बंद करतील.”
प्रवीणजींची ही भावपूर्ण गोष्ट ऐकून ती व्यक्ती हळवी झाली. त्याला प्रवीणजी एक चांगली व्यक्ती वाटली, पण त्यालाही तर स्वत:चे पोट भरायचे होते. ” ठीक आहे ” असं म्हणून तो स्कूटर घेऊन तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणजी जेव्हा वर्तमानपत्र घेण्यासाठी दरवाजाजवळ आले व त्यांनी दरवाजा उघडला, तर त्यांना त्यांची स्कूटर समोर उभी असलेली दिसली. प्रवीणजींचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते पळत पळत स्कूटर जवळ गेले आणि आपल्या स्कूटरवर प्रेमाने हात फिरवू लागले, जणूकाही ते त्यांचे मूल होते. त्यांना तिथे एक कागद चिकटवलेला दिसला.
त्यावर लिहिले होते :
“मास्टर साहेब, असं समजू नका की तुमच्या बोलण्याने माझे हृदय द्रवले. काल मी तुमची स्कूटर चोरी करुन गावी गेलो. वाटलं भंगारवाल्याला ती विकून टाकावी. पण ज्याक्षणी भंगारवाल्याने ती स्कूटर पाहिली, मी काही बोलायच्या आधीच तो उद्गारला, ” अरे ही तर मास्तरसाहेबांची स्कूटर आहे.”
स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात मी त्याला म्हणालो, ” हो ! मास्तर साहेबांनी मला बाजारात काही कामानिमित्त पाठवल आहे.” कदाचित त्याला माझा संशय आला होता.
तिथून सूटून मी एका बेकरीत गेलो. मला खूप भूक लागली होती व काहीतरी खाण्याचा मी विचार केला. बेकरीवाल्याची नजर स्कूटरवर पडताच तो म्हणाला, ” अरे ही तर मास्तर साहेबांची स्कूटर आहे.” हे ऐकून मी घाबरून गेलो आणि गडबडून म्हणालो, “होय, या गोष्टी मी त्यांच्यासाठीच घेतोय, कारण त्यांच्या घरी काही पाहुणे आले आहेत.” कसंतरी करून मी तिथूनही निसटलो.
मग मी विचार केला की गावाबाहेर जाऊन कुठेतरी तिला विकून येतो. मी थोड्याच दूरपर्यंत गेलो होतो, की नाक्यावरील पोलिसाने मला पकडलं आणि रागाने विचारलं की, ” कुठे चालला आहेस? आणि ही मास्तरसाहेबांची स्कूटर तुझ्याकडे कशी आली? ” मग काहीतरी बहाणा करून, मी तिथून ही पळालो. पळून पळून मी आता दमलो आहे ! मास्तर साहेब मला सांगा, ही तुमची स्कूटर आहे की अमिताभ बच्चन?? सगळेच तिला ओळखतात. तुमची अमानत मी तुमच्या स्वाधीन करत आहे. तिला विकण्याची ना माझ्यात हिंमत आहे, ना ताकद. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्रास दिल्याच्या बदल्यात, मी तुमच्या स्कूटरची टाकी पूर्ण भरून दिली आहे. ”
हे पत्र वाचून प्रवीणजींना हसू आले आणि ते म्हणाले, ” कर भला तो हो भला.”
—-जर तुम्ही उदात्त अंतःकरणाचे असाल, तर तुमच्या आसपासच्या लोकांना नक्कीच आनंद जाणवेल. म्हणून जीवनात कधीही कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहू नका —–
—संग्राहक – सुश्री मृदुला अभंग
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈