सौ.अस्मिता इनामदार
जीवनरंग
ओंजळभर नाणी… राधिका माजगावकर पंडित प्रस्तुती सौ.अस्मिता इनामदार
‘ओंजळभर नाणी-‘
भल्या मोठ्या जनरल स्टोअर्सचे मालक दादासाहेब आचार्य माझ्या चांगल्याच परिचयाचे झालेले होते. मला बघितल्यावर हिशोबाची वही बाजूला सारत ते म्हणाले, “अलभ्य लाभ, वहिनी बरं झालं तुम्ही आलात ते. मी तुमची वाटच बघत होतो. तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे.” असं म्हणून त्यांनी सांगायला सुरवात केली…..
काल तीन मुले दुकानात आली. अगदी लहान वयाची, बावरलेली, काहीशी बिथरलेली ती मुलं आत येऊन दुकानातील वस्तू शोधक नजरेने, कुतूहलाने बघत होती. दोन भाऊ व बहीण असावेत ते.
वस्तू बघत असता “अरे, ही नको ती घेऊ या” असे संवाद त्यांच्यात चालले होते. दुकानात गर्दी नसल्याने मी लांबूनच त्यांची होणारी गडबड, गोंधळ, बोलणं ऐकत होतो. नोकरांनी त्यांना अनेक वस्तू दाखवल्या, मात्र तिघात एकमत होत नव्हतं.
सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ तिघांची शोध मोहीम चालू होती. अचानक तिघांची नजर एकाच वेळी वीणाधारी सरस्वतीच्या आकर्षक मूर्तीकडे गेली. तिच्याकडे बोट दाखवून तिघेही एकाच वेळी एकाच आवाजात गरजले, ” ही भेटवस्तू आईला खूपच आवडेल.”
त्यांच्यात झालेलं एकमत पाहून मला बरं वाटलं. त्यांना विविध वस्तू दाखवणारा नोकर मात्र अगदी त्रासून गेला होता. तिघांचे ते शब्द कानी पडताच त्याने त्या मूर्तीकडे झेप घेऊन आणि त्यांचे मतपरिवर्तन होणाच्या आत गिफ्टपॅकमध्ये बांधून बालकांच्या हाती सोपवली.
“या पॅकवर नाव कोणाचे घालायचे” असं विचारलं असता तिघेही आनंदान चित्कारली,
” यावर आमच्या तिघांचीही नावे टाकायची आहेत.” मुलांच्या चेहऱ्यावरील मिश्किल हासू व निरागस आनंद न्याहाळताना मला पण हसू आले.
बिलाचा कागद पुढ्यात आल्यावर तो पाहून त्यांना किंमत सांगणार…. तेवढ्यात काउंटरवर ‘खळ.. खळ’ असा आवाज झाला.
काउंटरवरच्या काचेला तडा गेला की काय, असा विचार मनात येऊन मी नोकराकडे रागाने पाहणार, इतक्यात माझं लक्ष मुलांकडं गेलं. पाहतो तर तिथं उभ्या असलेल्या त्या छोटुकल्याने हातातील नाणी भरलेली पिशवी काउंटरवर रिती केली होती.
मुलगी जाणकार होती. आपल्या धाकट्या भावाने केलेल्या कृतीने ती गडबडली. त्यांचा मोठा भाऊ हुशार होता. प्रसंगावधान राखून तो काही बोलणार, एवढ्यात धाकटा भाऊ भडाभडा बोलून गेला, ” हे आम्ही साठवलेले पैसे आहेत,आमच्या आईचा परवा वाढदिवस आहे. आम्हाला तिला भेटवस्तू देऊन चकित करायचे आहे. या पैशातून आम्हाला आवडलेली मूर्ती द्या ना…..! नाणी मोजून घ्या बर का…”
छोटुकल्याचे ते बोलणे ऐकून मी तर अवाक् झालो, गडबडलो. मला काही वेळासाठी काहीच सुचेना. धाकटा परत परत विचारत होता, ” आजोबा… देणार ना ती मूर्ती आम्हाला. पैसे पुरतील ना? आमच्याकडे एवढेच आहेत…”
मी पटकन भानावर आलो. नोकर नाणी मोजायला पुढे धावला. मी त्याला हातानेच थांबवले. न मोजता सारी नाणी गल्ल्यात टाकली. तो अगदी भरगच्च भरला. आज होत असलेली कमाई अनमोल होती, निरागस, निर्मळ. कारण ती झाली होती छोट्या निरागस मातृभक्त बछड्यांकडून…
आज जगातील फार मोठा श्रीमंत माणूस ठरलो होतो. चार आणे, आठ आणे, या सारख्या सर्व प्रकारच्या नाण्यांनी हजेरी लावली होती माझ्या या गल्ल्यांमध्ये.”
दादासाहेब म्हणाले, “एक सांगू वहिनी, या वेळी मला सोमवारची खुलभर दुधाची कहाणी आठवली. म्हाताऱ्या आजीबाईंच्या खुलभर दुधाने गाभारा गच्च भरला होता, तद्वत आज या ओंजळभर नाण्यांनी माझा गल्ला अगदी भरून पावला. माझ्या तिजोरीला जहागिरीचे स्वरूप आले. पांडुरंगावर माझी श्रध्दा आहेच. माझ्या डोळ्यासमोर मातृ- पितृ भक्त पुंडलिक उभा राहिला.”
दादासाहेब आणि आमचा जुना संबंध. मी म्हणाले, “किती सुंदर गुणी मुले होती ती. खरंच त्यांचे आई वडील किती भाग्यवान आहेत. पण दादासाहेब, कोणाची होती ही मुले?”
दादासाहेब खळखळून हसले व म्हणाले, “अहो वहिनी, खरोखर खूप भाग्यवान आहात तुम्ही.”
“अहो, आता इथं माझा काय संबंध बरं !”
माझे वाक्य पुरे होण्याच्या आत ते म्हणाले, “अहो, आहात कुठे तुम्ही. ही गुणी मुले दुसरी तिसरी कोणी नसून तुमची लेकरे आहेत. त्या बॉक्सवर नावे टाकताना त्यांनी टेचात नावे सांगितली होती– ‘राजेश, मीनल, प्रसाद, गोपीनाथ पंडित.'”
हे सारे ऐकल्यावर मी तीन ताड उडाले. आता अचंबित होण्याची पाळी माझी होती. बाप रे… उद्या माझा वाढदिवस, म्हणून गुप्त कट होता वाटतं या तिघांचा. केवढ हे लेकरांचं आपल्या आई- वरचं प्रेम. कधी एकदा घरी जाऊन माझ्या पिल्लांना जवळ घेईन असं झालं होतं.
थोड्याच वेळात वास्तवाचे भान आले. मी दादासाहेबांना विचारले, “किती पैसे झाले हो त्या मूर्तीचे? “
माझे वाक्य अर्धवट तोडत ते म्हणाले, “नाही नाही, ती चूक करु नका. या ओंजळभर नाण्यांमुळं मला लाखावर धन मिळालं आहे. मी जगातील श्रीमंत माणूस ठरलो आहे. हा निरागस ठेवा कायम, अगदी अखेरपर्यंत माझ्या तिजोरीत मी आठवण म्हणून जपून ठेवणार आहे.”
——— मी भारावले आणि दुकानाच्या बाहेर पडले.
©️ सौ राधिका गोपीनाथ (माजगावकर) पंडीत.
8451027554
प्रस्तुती : सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈