श्री अमोल अनंत केळकर
जीवनरंग
☆ टाईमपास ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना टीव्हीवरच्या मालिकांची. त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.
“जोशा, लेका तुला ना काही छंद , ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू ?”
जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं.
“तुला कालचीच गोष्ट सांगतो,” काकांनी शंकासमाधानाला सुरुवात केली. “मी आणि बायको गेलो होतो पु ना गाडगीळमध्ये. पाचच मिनिटे दुकानात डोकावलो. बाहेर येऊन बघतो, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन ऊभा – हातात पावतीपुस्तक.
आम्ही दोघेही कावरेबावरे होत त्याच्याकडे गेलो आणि अजीजीने त्याला सांगू लागलो – “बाबा रे, मोजून पाचच मिनिटे गेलो होतो रे. एक वेळ सोडून दे.”
तशी तो म्हणू लागला, “सगळेजण दर वेळी असंच म्हणतात. आपली चूक कबूल कोणीच करत नाही. हजार रुपयांची पावती फाडावी लागेल. एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही.”
“तसे नाही, आमची चूक समजली आम्हाला. पुन्हा नाही होणार असं. आणि हजार रुपये म्हणजे फार होतात हो. आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत हो. आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा.”
“लाखांच्या गाड्या फिरवता, पु ना गाडगीळमध्ये खरेद्या करता, कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होतात होय ? बरं चला, तुम्ही वयस्कर आहात, म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला या वेळी.”
” ‘त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना ?’ माझा निरागस प्रश्न” – जोशी काका सांगत होते.” तशी वस्सकन अंगावरच आला तो हवालदार.”—
“ओ, पावती हवी असेल तर हजारचीच होईल. दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही.”
“असं कसं ? पैसे दिल्यावर पावती नको ? सगळं कसं नियमानुसार व्हायला नको का ? सरळ सांग ना, तुला लाच खायची आहे म्हणून.”
माझ्या या बोलण्याने तो एकदम भडकलाच. आणि मग माझंच वाक्य धरून बसला.
“अस्सं म्हणताय काय ? सगळं नियमानुसार व्हायला पाहिजेल काय ? मग होऊनच जाऊ दे. मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत, जरा सबुरीने घेऊ, तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय ! चला, सगळे नियमच काढतो तुमचे आता.” हवालदाराने रौद्र रूप धारण केले.
आणि मग तो हात धुऊन गाडीच्या मागे लागला. एक आरसाच तुटलेला आहे, मागची नंबर प्लेटच नीट नाहीये, PUC संपलेलं आहे “ – तीन चार हजार रुपयांपर्यंत मामला गेला.
हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं -” तू सांगून बघ, तुझं ऐकतोय का तो ते.”
ती त्याला म्हणाली, “अरे बाळा, तू असं रागावू नकोस. हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. सोडून दे. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. हे घे दोनशे रुपये.”
पण आता तो हवालदार काहीही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता.
“नको मला तुमचे ते दोनशे रुपये. आता पावतीच फाडणार मी.”
मग पुढे पाच दहा मिनिटे हे असंच चाललं, ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो, पावत्या फाडल्याशिवाय थांबणार नव्हता.” जोशी काका सांगत होते.
“अरे बाप रे ! दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं. मग काय केलं काय तुम्ही शेवटी ?” – मित्राची पृच्छा.
“मग काही नाही, आमची बस आली, आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो.”
“आं ? मग गाडी ? तिच्या पावत्या ? दंड ? आणि तो हवालदार ?” मित्राला काहीच उमगेना.
“काय संबंध ? ती गाडी आमची नव्हतीच रे. आम्ही तर बसने आलेलो—
तू मला विचारलंस – मी टाईमपास कसा करतो, ते मी तुला सांगत होतो. आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पहाण्यासारखे होते – आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना, तसेच होते अगदी ! “
जोशीकाका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिऱ्हाईक शोधू लागले——
संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com