सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ बुद्धिजीवी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“ यावेळच्या निवडणुकीच्या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे यार .”
“ बोल– काय करूयात ?”
“ अरे आपल्या इथून जो कोणी निवडून येतो, तो फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वापर करून घेतो. नंतर सामान्य जनतेसाठी काही काम करणं तर लांबच, पुढची काही वर्षं त्या माणसाचं तोंडही दिसत नाही आपल्याला. “
“बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आपण करून करून काय करू शकू शकणार आहोत ? “
“ आपण खूप काही करू शकतो रे. आपल्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या सभा आयोजित करून लोकांना याविषयी जागृत करू शकतो. त्यांना समजावून सांगू शकतो की, ‘ नेते मंडळी आपल्याला मोठमोठ्या वचनांचे आमिष दाखवून आपली मते मिळवतात. पण निवडून आल्यानंतर मात्र आपल्या भागाच्या विकासासाठी कधीच काहीच करत नाहीत. आणि सगळ्यांना ही वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून, एकमताने आता असा निर्णय घ्यायला पाहिजे की, यावेळी आपण अशाच उमेदवाराला मत द्यायचं, जो आपल्याला असं वचन देईल की, निवडून आल्यानंतर तो आपल्या या भागाचा विकास आणि प्रगती करण्यासाठी अतिशय मनापासून, निष्ठेने, आणि पूर्ण इमानदारीने प्रयत्न करेल. – आणि तो जर त्याचं हे वचन निभावू शकला नाही, तर त्याला राजीनामा द्यावा लागेल.’ “
“ हे सगळं अगदी बरोबर आहे बाबा, पण अशा सभांचा खर्च करण्यासाठी तेवढे पैसेही हवेत ना ? “
“ हे बघ, पैसे गोळा करणं काही फारसं अवघड नाहीये. आपण लोकांना आव्हान करू, आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करू. शेवटी कुणालातरी पुढाकार घ्यायलाच पाहिजे ना— नुसतं वाटतंय , म्हणून आपोआप काहीच होणार नाही. “
“ ठीक आहे. मग कधीपासून सुरुवात करू या ? “
“ तू म्हणशील तेव्हापासून–”
बोलत बोलत हे दोघे बुद्धिजीवी बसस्टॉपवर पोहोचले. त्यांची चर्चा सुरूच होती. —- इतक्यात बस आली. पळत जाऊन बसमध्ये चढता-चढता पहिल्या बुद्धिजीवीने दुसऱ्याला सांगितलं – “ चल रे— बाय. मी जातो. तुझ्या बसचीही वेळ झालीच आहे. “
“ बाय — पण या विषयी आणखी चर्चा करण्यासाठी पुन्हा कधी भेटूयात ? “
“ अरे सोड ना यार. बसची वाट बघत थांबावं लागतं, तो वेळ घालवण्यापुरता हा विषय ठीक आहे. तसंही आपण पडलो बुद्धिजीवी — त्या राजकारणाशी आपलं काय देणंघेणं आहे ? “
हे उत्तर ऐकून त्या दुसऱ्यालाही ‘ आपण बुद्धिजीवी आहोत ‘ हे एकदम आठवलं, आणि तो गुपचूप त्याच्या बसच्या रांगेत जाऊन उभा राहिला.
मूळ हिंदी कथा – ‘बुद्धिजीवी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈