श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ रंगभुलैय्या…. भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र-इथे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियरची पोस्ट क्रिएट होणाराय हे सौरभनं मला पूर्वीच सांगितलेलं होतं. आपल्या संपूर्ण टीममधे आपल्या दोघांचेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच ॲपरेझल्स चांगले होते.टीमलिडर म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता प्रमोशन मलाच मिळणार हे मी गृहित धरलेलं होतं. ते तुला मिळालं याचा आनंद आहेच अश्विनी.पण फरक पडला आहे तो माझ्या आईच्या कॅन्सर डिटेक्शनमुळे…” बोलता-बोलता समीरचा आवाज आणि डोळे भरून आले. तो बोलायचा थांबला. अश्विनी तो सावरायची वाट पाहत राहिली.)
“….. तुला माहित आहे अश्विनी, माझ्या दादा-वहिनीनी स्वतः काटकसरीत राहून माझं शिक्षण केलेय. बाबा हयात नसल्याची उणीव दोघांनीही मला कधीच भासून दिली नव्हती.पण मग माझं म्हणून कांही कर्तव्य आहेच ना? अगं,इथं आग्रहानं मला माझ्यासाठी फ्लॅट बुक करायला लावताना सुरुवातीच्या रकमेची मदत दादाने स्वतः कर्ज काढून केलीय. स्वतः मात्र अजून ते सर्वजण भाड्याच्या तुटपुंज्या घरातच रहात आहेत. या अशा परिस्थितीत आईच्या ट्रीटमेंटचा खर्च ते कुठून करणार ? कांहीही झालं तरी तो मीच करायला हवा ना? या क्षणी तू मघाशी म्हणालीस तसं ‘ हे प्रमोशन इज अ रुटीन मॅटर फाॅर यू. ‘ पण माझ्यासाठी ते तसं नाहीय.ती आज माझी निकडीची गरज आहे. प्रमोशन नंतरच्या हायर पॅकेजमधून मी आईच्या ट्रीटमेंटचा खर्च भागवू शकेन. आणि म्हणूनच खूप आॅकवर्ड वाटत असूनही मी तुला ही रिक्वेस्ट करतोय.आणि तसंही माझ्या प्रमोशननंतर तू माझ्या टीममधेच असशील आणि त्यामुळे तुमच्या संसारातल्या अडचणींसाठी तुला लागणारी कन्सेशनस् मी तुला सहजपणे देऊ शकेन.सो इट्स अ प्रॅक्टिकल डील फाॅर यू ऑल्सो..”
समीरचं सगळंच बोलणं कन्व्हिन्सिंग होतं पण शेवटच्या ‘डील’ या शब्दातली लालूच अश्विनीला रूचणारी नव्हती.
“तू हे सौरभसरांना बोललायस सगळं?”
“त्याचा काय संबंध?” समीर उखडलाच.”प्रमोशन स्वीकारणारी किंवा नाकारणारी तूच आहेस ना? सौरभला विचारण्याचा प्रश्न येतोच कुठं? सेकंड प्रायाॅरिटीवर माझंच नांव आहे हे सौरभनंच मला सांगितलंय. सो यू नीड नाॅट वरी फाॅर दॅट..”
समीरचं बोलणं खटकलं तरी अश्विनी शांत राहिली.या परिस्थितीत समीरच्या मन:स्थितीचा विचार करता त्याला सगळं माफ होतं तिच्या दृष्टीनं.ती गप्प बसलेली पाहून समीर बावचळला.
“अश्विनी,माझ्या या व्यक्तिगत अडचणीत तू आणि अभिखेरीज मला कुणाचेही उपकार नकोयत. होय. अगदी सौरभचेसुद्धा.ही इज एक बीग फ्रॉड…!”
” शट अप समीर. तू काय बोलतोयस समजतंय कां तुला?”
“होs मी खरं तेच बोलतोय. मी चांगलाच ओळखून आहे त्याला. तू एरवी दाद देत नाहीस ना म्हणून तुला पटवायला हे प्रमोशनचं गाजर त्यानं तुझ्या पारड्यात टाकलंय. तू सरळ स्वभावाची आहेस गं, पण सगळं जग तसं नसतं हे लक्षात ठेव..”
“बास समीर. इनफ. सौरभ सर काय विचार करत असतील ते त्यांचं त्यांच्याबरोबर. पण निदान हे मला ऐकवताना तरी तू दहादा विचार करायला हवा होतास. हे सगळं बोलून तू माझाही अपमान केलायस समीर..” अश्विनीचे डोळे भरूनच आले एकदम.
“हे बघ अश्विनी, तू शांत हो. माझी गरज म्हणून मी तुला प्रमोशन नाकारायची गळ घातली होती. मला गरज नसती तरीही सौरभबद्दल मी हे तुला सांगितलंच असतं. एक मित्र म्हणून तुला जागं करणं हे माझं कर्तव्यच होतं. प्रमोशन नाकारणं किंवा स्वीकारणं हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल अश्विनी. आणि तो मला मान्य करावाच लागेल. तुझं सहकार्य असो किंवा नसो यापुढची माझी लढाई मलाच लढावी लागेल आणि मी ती अखेरपर्यंत लढेन. मी हार मानणार नाही हे नक्की.”
तो बोलला आणि ताडकन् उठून निघून गेला. अश्विनी सून्न होऊन बसून राहिली कितीतरी वेळ.तिला कुणाचा तरी आधार हवा होता… आणि त्यासाठी तिचं वेड मन अर्थातच अभिकडे धाव घेत होतं…..!
————
“अभिs…”
” हं “
“ऐक ना. आज समीर म्हणत होता….”
टीव्हीवरुन लक्ष काढून घेत अभि तिच्याकडे पहात राहिला.
“काय म्हणालीस?”
“तू टीव्ही म्यूट कर बघू आधी. मला शांतपणाने बोलायचंय तुझ्याशी.”
“ठीक आहे.बोल.”
“मी काय करू रे प्रमोशनचं?”
“कमाल आहे. हे तू मला का विचारतेस? तुला झेपणार नाही असं वाटतंय कां? तसं असेल तर घेऊ नकोस ना..”
अश्विनी उघडलीच एकदम.
“न झोपायला काय झालं? पण…समीर..”
“समीरचं काय?”
“त्याने त्याच्या फिनान्शियल प्रॉब्लेमसाठी मला प्रमोशन रिफ्यूज करायची गळ घातलीय. आणि…”
“आय नो.समीर बोललाय माझ्याशी”
“तुझ्याशी ? कधी ?”
“दुपारी तुमचं बोलणं झालं त्यानंतर लगेच त्याचा फोन आला होता”
अश्विनी सावध झाली.
“आणखी काय सांगितलंय त्यानं ?”
” आणखी काहीच नाही. हे एवढंच. खरंतर मीही तेव्हा खूप बिझी होतो. तसं त्याला सांगितलं तर म्हणाला,अश्विनी तुझ्याशी बोलेल सगळं. आणि तिने प्रमोशन रिफ्यूज नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही दोघं माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका असं म्हणाला.”
“अभि, मला खरंच वाटतंय, त्यानंं कधी नव्हे ते माझ्याकडे कांही मागितलं आणि मी नाही म्हंटलं असं नको ना व्हायला ?अभि, माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस?”
अभि हसलाच एकदम. आणि एकाएकी गंभीर झाला.
“तुझ्या जागी मी असतो तर समीरनं मला हे असं विचारलंच नसतं “
“कां?”
“कां काय? कारण त्याच्या इतकाच मीही अॅंबिशिअस आहे हे त्याला ठाऊक आहे”
“आणि मी ? मी नाहीये?”
“आहेस ना? मग विचारात कां पडलीयस? निर्णय घे आणि मोकळी हो.”
“हो.मला निर्णय घ्यावाच लागेल. पण तूही त्यासाठी मदत कर ना मला. तू या प्रश्नापासून इतका अलिप्त कां रहातोयस?”
अश्विनी काकुळतीनं म्हणाली. अभिने तिला थोपटलं. तिने मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिलं.
“अश्विनी, हा प्रश्न तुझा आहे. तो तूच सोडवायला हवा “
“अभि…?तू..तू बोलतोयस हे? अरे, आपल्या संसारात असा एखादा प्रश्न फक्त माझा किंवा तुझा असूच कसा शकतो? तो आपलाच असायला हवा ना ? “
अभि स्वतःशीच हसला.
“बरोबर आहे तुझं. पण हा प्रश्न आपल्या संसारातला नाहीये. तो तुझ्या ऑफिसमधला आणि फक्त तुझ्याशीच संबंधित आहे. आणि म्हणूनच त्याचे उत्तरही तूच शोधायला हवं असं मला वाटतं”
त्या एका क्षणापुरतं का होईना तिला वाटलं,अभिनं आपल्याला एकटं सोडलंय. दुसर्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती जागची उठली.
“अश्विनी..”ती थबकली. तिचे डोळे भरून आले एकदम.
“बैस अशी” तो गंभीर होता. अलगद डोळे पुसत ती अंग चोरून बसली.
“तू कधी विचार केलायस?…म्हणजे या प्रमोशनसाठी सौरभने तुलाच एवढं स्ट्राॅंग रेकमेंड का केलं असावं याचा?”
“हे असे प्रश्न तुला आणि समीरलाच पडू शकतात.मला नाही. कारण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे”
“प्रश्न विश्वासाचा नाहीये. विश्वास तर माझाही तुझ्यावर आहेच. पण मला सांग, समीर तुझ्याइतकाच कॉंम्पिटंट असताना आणि तो सौरभचा खास मित्र असतानाही समीरला डावलून त्यानं तुलाच रेकमेंड करावं याचं आश्चर्य नाही वाटत तुला?”
“तुला नेमकं काय म्हणायचंय अभि?”
“मला काहीच म्हणायचं नाहीये.तुझ्या समोरच्या प्रश्नाचा तू एकांगी विचार करतेयस. म्हणून प्रत्येक प्रश्नाला इतरही अनेक कंगोरे असू शकतात हे फक्त तुला सुचवावं असं वाटतं.”
“सौरभ सर तसे नाहीयेत अभि.इतके दिवस मी त्यांच्याबरोबर काम करतेय. ही बीहेव्ज व्हेरी डीसेंटली”
“मे बी यू आर ट्रू. कॅन बी अदरवाइज आॅल्सो. डिसेन्सी ही एखाद्याची बिव्हेविंग-स्ट्रॅटेजीही असू शकते. माणसांचे वरवर दिसणारे रंग पक्के असतातच असे नाही. ते विरूनही जाऊ शकतात. तुला अनोळखी असला तरी आपल्या इंडस्ट्रीत हा ‘रंगभुलैया’ थोडा अधिकच फसवा आहे. तेव्हा तुझी गृहितं तू एकदा नीट तपासून बघ. तरच पुढची गणितं बरोबर येतील.”
अभिशी बोलून गुंता सुटेल असं तिला वाटलं होतं. पण गुंता अधिकच वाढला.
क्रमशः……
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈