सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 3 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

ट्रीपला जायच्या आनंदात तन्वी आवरुन पटकन झोपली सुद्धा. तन्वी ची आई आपल्या खोलीत तन्वी पलीकडच्या कॉटवर. आजीला काही झोप येईना. काय म्हणावं या पोरीला? आता माझी मुलगी म्हणून पोरीला म्हणायचं नाहीतर चाळिशीला आलेली बाईच की ही. सगळं आपलं आपणच ठरवते आणि अंमलातही आणते. विचारणं नाही, परवानगी मागणं दूरच. आपलीच मुलगी पण आपल्यातला बुजरेपणा थोडासा ही तिच्यात नाही. नाहीतर लहानपणापासून ही धीटच. कशाला म्हणून घाबरायचं नाही. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तिच्या या स्वच्छंदी स्वभावाला खतपाणी मिळालं. मुलगी म्हणून मार्दव काही नाहीच. कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्ट मुलांच्या बरोबरीने करायची. इतकं बिनधास्त वागणं तर मला आवडायचं नाही. पण मला विचारतच होती कुठं ती? उलट मलाच ती सुनवायची, “आई, का गं सहन करीत बसतेस? आजी काही बोलते तुला? किती काम करून घेते तुझ्याकडून. करणार नाही म्हणून ठासून सांगत जा ना. बाबा सुद्धा किती गृहीत धरतात तुला. कशाला ऐकतेस सगळ्यांचं?” धाड धाड तोफेतून गोळे सुटल्यासारखी बोलायची. आता कसं समजवायचं हिला? अगं यालाच तर संसार म्हणतात. आजी कामे सांगते पण त्यामुळे तर आपलं घर व्यवस्थित चालतं ना?.. बाबांचं म्हणशील तर त्यांना बाहेर काम करायचं असतं. तिथं काहीतरी मनाविरुद्ध घडलं तर त्याचा राग थोडा वेळ माझ्यावर काढतात. बस्स इतकंच. एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं? पण ही नवी पिढी पुरुषांच्या बरोबर नाही; त्यांच्यापुढे चार पावले टाकण्यात धन्यता मानणारी, इतरांना तुच्छ लेखणारी. कसं व्हायचं हिचं? मला काळजीच होती.

शिक्षण झाल्यावर धडपड धडपड करून कुठलासा कोर्स केला, परीक्षा दिली आणि मनासारखी नोकरी सुद्धा लागली. म्हटलं, “हुश्श, आता हिच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. मी माझ्या परीने हालचाल सुरू केली. मात्र हिनेच आमच्या समोर बाॅम्बस्फोट केला.”

“आई, बाबा, तुम्ही माझ्या लग्नाची खटपट करताय; पण माझा निर्णय मी घेतलाय. मी लग्न करणारच नाहीये. मला तो विचारच पटत नाही. इतकी वर्ष तुमच्याबरोबर राहिले का म्हणून आता दुसऱ्याच्या घरी जाऊ? मला अजिबात मान्य नाही ते. मी तुमच्याबरोबर राहणार, तुमची सेवा करणार. सारखा सारखा लग्नाचा विषय काढला तर मी दुसऱ्या गावाला बदली करून घेईन आणि तिकडे राहीन.” असं तिनं सांगितलं आणि खरोखरच सहा महिन्यांनी तिनं आपली बदली करून घेतली. एकटीच तिकडे जाऊन राहायला लागली.

एकटीच राहते म्हणून कसं व्हायचं हीचं? ही काळजी करण्याचं कारणच नव्हतं. हिच्यामुळं कुणाला त्रास होणार नाही ना? असंच मला वाटायचं. शनिवार-रविवार घरी यायची. आम्हा दोघांना काय काय आणायची. बाबांना बी.पी.चा त्रास सुरू झाला म्हणून बी.पी. चेक करायचे मशीनच घेऊन आली. मला भारीपैकी स्वेटर काय, शेकायची पिशवी काय, काही विचारू नका. एकदा भारीपैकी मोबाईल आणून दिला आम्हाला. त्यावर स्वतःचा नंबर, काही पाहुण्यांचे, ओळखीच्यांचे नंबर फीड करून दिले. तो वापरायचा कसा ते आम्हाला शिकवलं. एक मुलगा काय करेल; तसं आमचं ती करत होती, इतकंच समाधान होतं. पण रुखरुख होतीच होती. आता ठीक आहे. आमच्या माघारी कोण जीव लावणार हिला? लग्न म्हणजे फक्त बंधनच वाटतं हिला? त्या बंधनात सुद्धा आपुलकी असते, चांगली भावना असते हे कसं कळत नाही? याबाबतीत कधी शहाणी होणार? ऑफिसमध्ये कुणी भेटला तर बरं होईल. मला आपली वेडी आशा वाटत होती.

क्रमशः…. 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments