श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ रखमाचं काय झालं ? – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆
बायजा म्हातारी सकाळीच हातगाड्यावर भाजीची पहिली पाटी ठेवत असतानाच तिला सदाच्या घरातून त्याच्या पोराच्या रडण्याचा आवाज आला पण सगळ्या पाट्या ठेवून हातगाडी सकाळी लवकरच मंडईच्या कोपऱ्यावर उभी केली तरच भाजीचा खप चांगला होत असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले . शिवाय लहान पोर झोपेतून उठल्यावर जवळ आई नाही म्हणल्यावर रडायचंच ,असाही तिने विचार केला होता. ,घरातल्या बाईची सकाळी किती तारांबळ उडते हे तिला ठाऊकच होते.. आणि रखमा, सदाची बायको त्याच तारांबळीत असणार हे ही ती जाणून होती.
हातगाडीवर भाजीच्या सगळ्या पाट्या, कोथिंबिरीचं पोतं, वजनकाटा सारं व्यवस्थित ठेवेपर्यंत नाही म्हणलं तरी अर्ध्या तासाहून जास्त वेळ गेलाच.. त्या गडबडीत पोराचं रडणे थांबले – नाही थांबले याकडे तिचे लक्षही नव्हते पण जसे सारे आवरले आणि मंडईत जाण्यासाठी ती हातगाडी ढकलणार इतक्यात सदाचं पोर अजूनही रडत असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिला आश्चर्य वाटले. तिने हातगाडी ढकलायची म्हणून काढून हातगाडीवरच ठेवलेली चाकाची घूण्याची दगडे परत चाकांना लावली आणि ‘ रखमा s ए रखमा ss !’ अशी हाळी मारत सदाच्या घराकडे निघाली. पुढे लोटलेले दार उघडून ती आत आली तर वाकळंवर पोर रडत होते. घरात कुणाचीच चाहूल लागेना. तिने बाहेर येऊन रखमाला हाका मारल्या.. सदालाही हाका मारल्या. पण कुणाचेच प्रत्युत्तर आले नाही तशी बायजा म्हातारी परत घरात गेली. पोराला उचलले. पोर भुकेलेलं आहे हे जाणवताच तिने चुलीकडे पाहिले. चुलीपुढे निखाऱ्यावर दुधाचे पातेले होते. अजून दूध जरासे कोमटच आहे हे लक्षात येताच तिने वाटीत दूध काढले आणि पोराला मांडीवर घेऊन चमच्याने पाजायला सुरवात केली. दूध पोटात जाऊ लागले तसे पोर रडायचे थांबले. तिने त्याला पोटभर दूध पाजताच पोर पूर्ण शांत झाले.. तिने त्याला परत वाकळंवर ठेवताच पोर हातपाय हलवत खेळू लागले. तिने वाटी-चमचा चुलीजवळ ठेवला. पोर शांत झाले तसे तिच्या मनात परत रखमाचा, सदाचा विचार आला..
‘ येवढ्याशा पोराला घरात ठिवून दोगंबी कुणीकडं गेलं आस्तिली ? ‘
तिच्या मनात प्रश्नाचे, विचारांचे आणि काळजीचं वादळ उगाचंच भिरभिरु लागले होते. तिने पोराकडे नजर टाकली. पोर आपल्याच नादात खेळत होते. ती दाराशी आली अन तिची नजर तिच्या भाजीच्या गाड्याकडे गेली तशी तिच्या काळजीत आणखीनच भर पडली. ‘आधीच भाजी विकायला जायला उशीर झाला होता.. आणखी उशीर झाला तर भाजी विकली जाणार नव्हती.. पालेभाजी नाशवंत माल.. विकली गेली नाही तर त्याचे पैसे अंगावर पडणार होते. आधीच भाजी विकून कशीतरी हाता-तोंडाची गाठ पडत होती.. त्यात भाजीचे पैसे अंगावर पडले तर मग काही बोलायलाच नको.. ‘ तिच्या मनात विचार आला. तिला भाजी विकायला जावेच लागणार होते पण पोराला एकटं टाकून ती जाऊ शकत नव्हती.. त्यात रखमाचा, सदाचा पत्ताच नव्हता.. पोराला असे एकटं टाकून तिचा पायच निघाला नसता. वस्तीतील शेजारपाजारच्या घरातील बाया-माणसे येरवाळीच कामाला जात असल्याने घरांना कुलपंच होती.. एखादं -दुसरे पोर गल्लीत खेळत असले तरी पोरा-ठोरांच्या ताब्यात इवल्याशा पोराला देऊन ती जाऊ शकत नव्हती..गल्लीत टोकाच्या घरात एक म्हातारा होता पण तो स्वतःलाच सांभाळू शकत नव्हता. तो त्या इवल्याशा पोराला काय सांभाळणार ?
मनातल्या मनात ती वस्तीतल्या सगळ्या घरातून डोकावून, घर न् घर पाहून आली होती. काय करावे ते तिला सुचेनासे झाले होते.. ‘ आत्ता रखमा येईल, सदा येईल ,ते आले की आपण जाऊ.. भाजी कमी विकली जाईल पण जेवढी विकली जाईल तेवढंच नुकसान कमी..तेवढाच डोईवरला बोजा कमी.. ‘ असा विचार तिच्या मनात येत होता.. ती आतुरतेने रखमाची, सदाची वाट पहात होती. हळूहळू तिची सहनशक्ती कमी होत चालली होती..
” येवढ्या येरवाळचं कुनीकडं उलथलीत दोगंबी..? येवंडंसं प्वार घरात ठेवलंय..आय-बा हायती का कोण ? आसं कोण प्वार घरात ठिवून जातं व्हय ? कुणीकडं जायाचं हुतं तर पोराला संगं न्ह्याचं.. “
बायजा म्हातारी स्वतःशीच बडबडत अस्वस्थतेने आत-बाहेर फेऱ्या घालत होती. खेळता खेळता पोर परत झोपी गेले होते..
‘प्वार झोपलंय, दार वडून घिऊन जावं का बाजारात ? ‘
तिच्या मनात विचार आला..
‘ बायजे, येवड्याश्या पोराला येकलं टाकून जायाचा इचार करतीस, माणूस हायस का कोन ? प्वार पुन्यानदा उठलं म्हंजी ? ‘
‘आगं, पर आज भाजी न्हाय इकली तर नासुन जाईल, त्येचा पैसा अंगावं पडंल.. समदी नुक्सानीच की..’
‘ व्हय पर माणुसकी हाय का न्हाय काय ? आन तशीबी दोन दिस उपाशी ऱ्हायलीस तर काय मरत न्हाईस .. ‘
ती अस्वस्थतेत स्वतःशीच बोलत होती.. इतक्यात पोराची झोप चाळवल्याचे तिला जाणवले.
” प्वार उठतंय का काय ? “
ती पोराजवळ वाकळंवर येऊन बसली.. आणि त्याला थोपटू लागली..
‘ रखमा-सदाचं काय वाईट-वंगाळ तर झालं नसंल न्हवका ? ‘
पोराला थोपटता थोपटता मनात आलेल्या विचाराने ती दचकली.
क्रमशः ….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈