श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-4 ☆ श्री आनंदहरी 

रखमाचा काहीच मागमूस लागला नव्हता. रात्रभर सदाचा डोळा लागला नव्हता. मनातील शंका -कुशंका थांबत नव्हत्या. मनात उलट-सुलट नाना विचार येत होते पण नुसता विचारांचा गोंधळ होत होता. पहाटे दूध तापवून, झोपलेल्या तान्ह्या बाळाला घरात एकटं टाकून, घराचे दार नुसते ओढून घेऊन रखमा कुठे आणि का गेली असेल ? ती स्वतःहून कशी जाईल ? मग..तिला कुणी  जबरदस्तीने नेली  असेल  का ? पण कुणी आणि का ? जर कुणी तिला जबरदस्तीने नेले असे म्हणावे तर त्यावेळी तिने आरडाओरडा का केला नाही ?

पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला सदा गेला. तिथेही याच निरुत्तर करणाऱ्या प्रश्नानंतर पोलिसांचा सदालाच प्रश्न… ‘ रखमा ला का मारलेस ? ”  पोलिसी खाक्याने सदाला सारे विचारून झाले. आधीच रखमाच्या  जाण्याने गलितगात्र झालेल्या सदाला मरणप्राय वेदना झाल्या.  अनेक लोक, अनेक पावसाळे पाहिलेली बायजाआज्जी सोबत आली होती ती सदाचा पुन्हा एकदा आधार झाली होती.

पोलिसांच्या समोर संशयित म्हणून एकमेव नाव होतं ते सदाचे.. त्या दिशेने तपास सुरू झाला.. घराची झडती घेतली, काना- कोपरा तपासला, वस्तू न वस्तू विस्कटून पाहिली.. हाती काहीच लागले नाही.  घरा पासून जाणारा रस्ता चौकात जाणारा.. जवळचा सीसीटीव्ही म्हणजे चौकातला.. त्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये रखमा एकटी किंवा कुणासोबत कुठे जाताना दिसत नव्हती.चौकातून रात्रीपासून सकाळपर्यंत फार तुरळक वाहने जाता-येताना दिसत होती पण त्यात संशयास्पद असे  पोलिसांना काहीही आठळले नव्हते. सदावरचा संशय आता जास्तच दृढ होत होता… पण त्याने रखमाला मारल्याचा कोणताही पुरावा सापडत नव्हता…रखमाचा मृतदेहही सापडत नव्हता..  पोलिसांनी अनेकवेळा  त्यांच्या पद्धतीने सदाची चौकशीही केली पण सदाचे एकच उत्तर होते.. आणि ते खरेही होते.. सदाला रखमाबद्दल काहीही माहिती नव्हते. तो संध्याकाळी सहा वाजता डबा घेऊन रात्रपाळीला कामावर गेला होता व सकाळी आठ च्या दरम्यान परतला होता.

चौकातल्या तसेच त्याच्या कामावर जाण्याच्या मार्गावरच्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये तो जाताना , येताना दिसत होता. त्याच्या कामाच्या ठिकाणच्या कॅमेऱ्याचे  फुटेजही पोलिसांनी तपासले होते. त्यात ही तो रात्रभर कामावर असल्याचे दिसत होते.. दोन -चार मिनीटाहून जास्त तो कॅमेऱ्याच्या बाहेरही नव्हता.. किंवा आवर्जून कॅमेऱ्यात राहण्याचा प्रयत्नही करत असल्याचेही जाणवत नव्हते.. त्याचे फोन रेकॉर्ड तपासायला त्याच्याकडे फोनच नव्हता. पोलिसांनी त्याच्या विषयी गल्लीत, मित्रपरिवारात, कामाच्या ठिकाणी चौकशीही केली..  सदा सरळ, साधा, कष्टाळू, आपण बरे आपले काम बरे अशा वृत्तीचा होता.  जसजशी सदाबद्दलची माहिती मिळत गेली तसतसा सदा पोलिसांच्या संशयितांच्या यादीतून मुक्त होत गेला. सदाने काहीही केलेले नाही याची पोलिसांना खात्री पटली आणि… रखमाचे नेमकं काय झाले ? हा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच राहिला..

रखमा जणू हवेत अदृश्यच झाली होती.. पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूनी कसोशीने तपास करून पाहिला होता. गल्लीत अनेकच्याकडे चौकशी केली होती..तपास केला होता.   पोलिसांनी अगदी रखमाच्या माहेरीं जाऊन, तिच्या लग्नाआधीपासूनचा तिचा भूतकाळ आणि लग्नानंतरचा भूत आणि वर्तमानकाळ अगदी बारकाव्याने, कसोशीने तपासून पाहिला. त्यांना रखमाबद्दल कुठेही वावगा शब्द ऐकायला मिळाला नाही की कुठे कधी शंकास्पद आढळले नाही. पोलिसही चक्रावून गेले होते.. एक व्यक्ती अशी गायब झाली होती की जणू ती कधी अस्तित्वातच नसावी.. कुठलाच मागमूस नव्हता.. कुठलेच धागे-दोरे गवसत नव्हते.. रखमा होती आणि ती गायब झाली होती हे आणि एवढंच मात्र अगदी खरे होते.. पण ती गायब झाली ते नेमके कधी ? नेमकी  कशी ? नेमकी  कुठे ? दिशा गवसत नव्हती.. नेमकेपणाने काही कळत नव्हते.. सांगताही येत नव्हते.. तपासाचा प्रवास जिथून सुरु होत होता तिथंच येऊन थांबत होता… प्रत्येकवेळी.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments