श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-5 ☆ श्री आनंदहरी 

पोलिसांना रखमाचा तपास लागलाच नाही. या साऱ्या प्रकणात कितीतरी वेळा सदाला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या.  त्याला कामावर जाता आले नव्हते. या साऱ्यामुळे त्याची नोकरी सुटली होती.. पोराची जबाबदारी पडू नये म्हणून रखमाच्या भावाने, आईने कधीच पाठ फिरवली होती. सदा दिवसभर  हताश, उदास, विचारात गढून गेलेल्या अवस्थेत आढ्याकडे बघत बसून राहू लागला होता. बायजाला त्याची ही अवस्था पाहवत नव्हती.. ती त्याला सांगायची, समजवायची…  त्याच्या पोटाला दोन घास करून घालायची ..तान्ह्या पोराला सांभाळायची.. पोर संगती घेऊन भाजीपाला विकायला जायची. गल्लीतला प्रत्येकजण सदाची अवस्था पाहून हळहळत होता.

शेजाऱ्या-पाजाऱ्यांची सहानुभूती हळूहळू ओसरत गेली होती. शेवटी प्रत्येकाचे हातावर पोट होतं.. स्वतःसाठीही बसून राहणे परवडणार नव्हते.. प्रत्येकाची दिनचर्या पूर्ववत सुरू झाली होती.. बायजाम्हातारी, नात्याची ना गोत्याची पण मागल्या जन्मीचे काहीतरी सोयर असल्यासारखी सदाची, त्याच्या पोराची काळजी घेत होती. सदाला या साऱ्यातून बाहेर काढायला हवं, सावरायला हवं असे तिला वाटायचे.. सदाला सांगून -समजावून ती  स्वतःबरोबर भाजी विकायला बाजारात घेऊन जाऊ लागली होती. चार लोकांत वावरत राहिल्याने सदामध्ये बदल होईल असे बायजाला वाटत होते.. तसाच बदल सदामध्ये होऊ लागला होता. 

काळ कधी कुणासाठी, कशासाठी थांबत नाही.. तो पुढे सरकतच असतो आणि काळ हेच सगळ्यावरचे औषध असते. सदाचे पोर काळाबरोबर बायजाच्या मायेत वाढत होते. सदा पूर्ण सावरून घरातली बरीचशी कामे करू लागला होता. बायजाम्हातारीबरोबर बाजारात बसून व्यापारात तयार झाला होता. पोटापूरते मिळत होते. दुःखावर खपली धरली होती.  सदाचा कामात बदल एवढे एक सोडलं तर सारे पूर्ववत चाललंय असे वाटत होते.

रखमा जणू काळाच्या पडद्यावरून पुसून गेली होती. लोकांच्या विस्मरणात गेली होती. सदाही तिला विसरून गेला असेल असे लोकांना वाटू लागले असावे.

‘असे एकट्याने कसं जगता ईल ? त्यात लहान पोर आहे.. संसाराचा गाडा सांभाळायला कुणीतरी बाईमाणूस पाहिजेच ‘ कुणीतरी सदाच्या लग्नाचा विषय बायजाजवळ काढला होता. खरेतर बायजाच्याही मनात अधून मधून हाच विचार येत होता पण तिने सदाजवळ कधी विषय काढला नव्हता.  हळू हळू कुणी थेट, कुणी आडून आडून सदाला सुचवू लागले.

” पोरा, तुझं काय वय झाल्याले न्हाय, परपंचाचा गाडा  कुठंवर एकटा वडशील. पोटाला पोर हाय तुझ्या. वरीस झालं.. आता तरी लगीन करायचा इचार कर. “

एके दिवशी रात्रीची जेवणं झाल्यावर बायजाने सदाला लग्नाबद्दल सांगितलेच. सदा आधी काहीच बोलला नाही. नंतर म्हणाला,

“आज्जे, समद्यांनी पाठ फिरीवली पर तू आई हून हुबा ऱ्हायलीस ..पयल्या दिसापासनं पोराला पोटाशी धरलंस…माज्या पोटाला करून घातलंस.. “

“आरं, माजे म्हातारीचं आसं किस्तं दिस ऱ्हायल्यात पोरा. आरं, मी काय जन्माला पुरणार हाय व्हय ? “

” कोण कुणाच्या जन्माला पुरतं आज्जे ? माझी रखमी कुठं पुरली  ? “

” आरं, पोरा, जाउंदेल , सोड त्यो इशय..”

” कसा सोडू ? माणूस मेल्याव ‘मेलं ‘ म्हणून रडून मोकळं हुता येतं..त्यो कुठं गेलाय हे ठावं असतं.. गेलेला आता कवाच माघारी येणार न्हाय ह्येबी ठावं असतं. पर रखमी ?  रखमी हाय.. पर कुठं , कशी ? काय बी ठावं न्हाय ? आज्जे, ती हात धरून कुणासंगं पळून जाणाऱ्यातली बाय न्हाय ही ठावं हाय मला. मग ती गेली कुठं ? पोटच्या तान्ह्या पोराला टाकून जाईलच कशी ती ?  ती कुठं गेली न्हाय मग मला सांग.. माझ्या रखमाचे काय झालं ? “

सदाच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागले होते.. साचलेला बांध फुटला होता. बापाला रडताना पाहून पोर घाबरून बायजाज्जीला बिलगले होते. त्याला घट्ट जवळ घेऊन बायजाने डोळ्यांना पदर लावला..

सदाच्या, बायजाच्या डोळ्यांतील एकेक थेंब जणू अवघ्या भवतालाला, ज्याचे उत्तर मिळत नव्हतं असा एकच प्रश्न विचारत होता..

‘ रखमाचं काय झालं … ?’

‘रखमाचं काय झालं…?’

‘रखमाचं काय झालं…?

समाप्त 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments