सुश्री गायत्री हेर्लेकर
जीवनरंग
☆ तडजोड – भाग – 2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
भाईसाहेबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
“”विकीदादा,निरज,–तुम्ही दोघांनी हे मान्य केलेत याचा खुप आनंद झाला.निरज,कारखान्यात तुमची जबाबदारी वाढली ,आता घराकडे लक्ष द्यायला होणार नाही.अन् सुप्रियाची जबाबदारी तुमच्यावरच आहे.त्यांच्या लग्नाचा विचार केंव्हा करणार?”
त्याचबरोबर, सुप्रिया आणि भाईसाहेबांनी चमकुन एकमेकांकडे पाहिले. वहिनीसाहेबांच्या नजरेने ते बरोबर हेरले.२,३ वर्षे त्या दोघांचे सुरु असलेले प्रकरण त्यांना समजले होते.
नवर्याचे वयाने एवढ्या लहान मुलीबरोबर संबंध —-त्या पार कोलमडल्या होत्या.अगदी जीव द्यायचेही मनात आले.
पण मुळ स्वभाव विचारी असल्याने त्यांनी मनाचा तोल अजिबात ढळु दिला नाही.आपल्या जीव देण्याने ,बंटी पोरका होईल.आपल्या वैयक्तिक सुखदःखासाठी त्याचे आयुष्य वाया घालवणे योग्य नाही.
उच्चशिक्षण घेतले नसले तरी व्यावहारिक अनुभव ,आणि साधकबाधक विचार प्रवृती होती.त्यांची निर्णयक्षमता जेवढी जबरदस्त,,नियोजनही तेवढेच प्रभावी होते.त्यामुळे निर्णयाच्या याबाबत कोणाच्याही मनात शंका नसे..
किंचित हसुन ,””निरज,तुम्ही करु नका निष्कारण विचार.आम्ही केला आहे त्याला हो म्हणा.”
सगळेच त्यांच्याकडे बघु लागले.
भाईसाहेबांना रहावेना ,””काय ठरवलेत ?निरजला न विचारता?'”
वहिनीसाहेब शांतपणे,””हो,ज्यात सगळ्यांचेच हित आहे असेच ठरवले. निरज, विकीदादांना तुम्ही जवळुन पाहता,.त्यांच्यावर आलेल्या संकटातुन बाहेर काढण्यासाठी तुम्ही खुप मदत केलीत.तुमच्या मनात त्यांच्याविषयी चांगल्या भावना आहेत.म्हणुनच, विकीदादांच्या साठी आम्ही सुप्रियाचा हात मागतो.—“
त्यांचे बोलणे ऐकुन एवढा वेळ शांत बसलेले विकीदादा,””पण,वहिनी —-तुम्हाला माहित—-नाही”.
वहिनीसाहेब,हात दाखवुन ,विकीदादांचे बोलणे थांबवून ,धीम्या पण करारी आवाजात,” हो ,आम्हाला सगळ माहित आहे.निरज हे लग्न होणार,.अगदी लवकर चांगला मुहुर्त बघुया,.कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहेच.विकीदादा आणि सुप्रिया, —दोघेजण शेताची,गावाकडची पुर्ण जबाबदारी घेतील,पण त्याआधी ,शेती संबंधी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी दोघेही,२ ,वर्षे परदेशात रहातील .आम्ही त्यासंबंधी चौकशी केली आहे.”
सुप्रियाला कड्यावरून ढकलून दिल्यासारखे वाटले, शब्द तोंडातच थिजले तर डोळ्यातले पाणी लपवणे अवघड झाले.
भाईसाहेबांची अवस्था तर काहीही बोलण्याच्या पलिकडे गेली.”सौदामिनी,एवढे घाई कशाला? त्यांना जरा विचार करु दे”. हे तोंडाशी आलेले शब्द त्यांनी मुकाटपणे गिळले.
एवढा वेळ जाणूनबुजून दुर्लक्षित केलेल्या सुप्रियाचा हात हातात धरुन “”चला,आपण खाली जाऊया,तुम्ही पण सर्व खाली देवघरात या”.वहिनीसाहेब. देवासमोर तिला बसवुन ,चांगली भारीतली साडी ,अन् सोन्याचा नेकलेस देऊन ,पाच फळांनी ओटी भरली, तिच्या डोळ्यातले पाणी पुसत,
“”हे सर्व ठरवणे आम्हालाही सोपे नव्हते.पण पुढील वाताहात टाळण्यासाठी —- हा निर्णय घेतला. लहान वयामुळे तुम्हाला आता मान्य होत नसेल पण स्विकारावे लागेल. –आयुष्याशी करावी लागणारी तडजोड समजुन.”
* समाप्त *
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈