सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ मारुती – भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(कथासूत्र : दगड्याच्या अंगात मारुती आला, म्हणून म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्या घाबरला, म्हातारी म्येलीबिली का काय?…..)
पण तेवढ्यात म्हातारी उठून बसली आणि पुन्हा डोळे विस्फारून दगड्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांत नेहमीसारखा राग, तिरस्कार नव्हता. तिचे डोळे भक्तीने तुडुंब भरलेले होते. आणि हात जोडलेले होते.
‘आर तिच्या! आयेबी ढोसाया लागली का काय?’ दगड्याच्या मनात आलं,’येका परीन बरंच हुईल की ते. आपल्या मागची ‘पिऊ नगस’ची कटकट तरी टळंल. पयशे मागत बसाया नको.तीच भरंल.’
म्हातारीच्या चेहऱ्यावरून भक्तीभाव तसाच वाहत होता. आणि ती हात जोडून उभी होती.
“आये, काय गं?”
“मारुतीरायाss, माज्या घरात आलास तू. क्येवढी किरपा झाली रं तुझी. तुझ्यापुढे साखर ठिवते थोडी.”
तिने मारुतीरायाला साखरेचा निवेद दाखवला.
शेजारी कळण्याचा अवकाश, बघताबघता हीs गर्दी गोळा झाली. कोणीतरी समई आणली, कोणी तेल आणलं, कोणी फुलं आणली. म्हातारीच्या घराचं देऊळ झालं.
मग प्रत्येकजण मारुतीपुढे लोटांगण घालून रुपया -दोन रुपये ठेवू लागला.. कोणी नैवेद्याला दूध आणलं. कोणी साखर आणली. कोणी केळी आणली. चिमी खुश झाली. पटापटा सगळं भांड्यात ओतून वाट्या परत करू लागली.
दगड्याला दूध आणि साखरेत रस नव्हता. तो पैसे मोजत होता. दोन -पाच -दहा…… पन्नासपर्यंत मोजले. पुढे जमेना झालं. ‘आयला, त्ये मास्तूर शिकवत होतं साळंत, तेव्हा लक्ष द्याया हवं होतं.’
दादल्याने सगळे पैसे उचलून बाजूला ठेवले.
काल संध्याकाळपासून म्हादेवाची म्हैस सापडत नव्हती. त्याने मारुतीला दंडवत घालून साकडं घातलं, “द्येवा, म्हस गावू दे. दोन नारळ फोडीन तुझ्या पायाशी.”
काय बोलावं, ते दगड्याला सुचेना. तो टकामका बघत राहिला.
गर्दीतलं कोणीतरी बोललं, “म्हादेवा, तुजा सौदा मान्ने नाय द्येवाला. दोन नारळावर पैसं बी दे.”
“बरं, बरं. दोन नारळ फोडीन, वर धा रूपे दीन.”
तेवढ्यात दगड्याला सुचलं. मग मोठ्यांदा श्वास घेत, धापा टाकत तो बोलायला लागला, “म्हस बांधतुयास, त्यो खुंट गोठ्यातून भायेर काढ. अंगणात हुबा कर. ज्या दिशेला पडंल, त्या दिशंला म्हस गेलीया.”
म्हादेवाचं समाधान झालं. तो गेला.
तेवढ्यात नाम्या आला पुढे. “मारुतीराया, माझा पोर शिकलाय थोडाफार. तुला ठाऊकच असेल. पर त्येला नोकरी लागत न्हाय.आज ग्येलाय एका ठिकाणी…..”
“लागंल,लागंल,”दगड्याने उगीचच उत्तर दिलं.
नाम्याने खुश होऊन पाच रुपये ठेवले.
दगड्याला एकदम मस्त आयडिया सुचली, ‘गावातली समदी लोकं येतायत. गुत्तंवाला म्हमद्या बी यील. त्येला सांगायचं -माज्या भक्ताला, या दगड्याला जलमभर फुकटमंदी पियायला द्ये. तुज्या धंद्यात बरकत हुईल.’
जसजसा दिवस उतरत चालला, तसं दगड्याला गरगरायला लागलं. उभा राहिला होता, तो होडीत असल्यासारखा डुलायला लागला. दादल्याच्या लक्षात आल्याबरोबर त्याने लगेचच दगड्याला धरून खाली बसवलं. “द्येवा, सकाळपासून हुबंच हायेसा, जरा खाली बसा.” मग त्याने चिमीला लिंबूसरबत बनवायला सांगितलं आणि स्वतःच्या हाताने दगड्याला पाजलं.
क्रमश: ….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈