☆ जीवनरंग ☆ कथा –गोटूचे भावविश्व ☆ सौ.दीपा पुजारी 

संध्याकाळचे पाच वाजले होते. आजोबांच्या बरोबर गोटू बाल्कनीत बसला होता . समोरच्या पिंपळाच्या झाडावरील कावळे एकदम उडाले. “काव काव”, “काव काव” करत सगळे थव्या थव्यांनी ऊडत इकडेतिकडे गेले. गोटूनं आजोबांना विचारलं,

“आजोबा, कित्ती कावळे?” त्याचे इवले हात पसरले होते. भाबडे डोळे मोठे झाले होते.

आजोबा म्हणाले, ” गोटू, शाळा सुटली कावळ्यांची. आता घरी चाललेत ते.”

“घरी?”, गोटूनं विचारलं.” पण आजोबा, कावळ्यांच घर असतं?”

आजोबा  थोडे विचारात पडले. थोड्या वेळानं म्हणाले,”बाळा,कावळीणीला अंडी घालायची असतात ना;  फक्त तेंव्हाच कावळा घरटं बांधतो. कसंही ओबडधोबड, काट्याकुट्या किंवा मिळेल ते साहित्य वापरुन बांधलं जातं.”

गोटू, “हो? आजोबा मला दाखवाल एकदा?”

“दाखवेन हं बाळ.”

गोटू एकदम ऊठला. “आजोबा मला आजीनं काऊ-चिऊची गोष्ट सांगितली आहे.

ती हो s s  ती हो, ती नाही का, पाऊस पडतो

आणि काऊचं घर जातं वाहून. “आजोबा,” तो पुढं म्हणाला ,” हा काऊ एकदमच बुद्दु दिसतोय.”

“का रे बाबा? असं का वाटलं तुला . . . . .

” बघा नं आजोबा; शाळेला जातो तरी  घरटं बांधता येत नाही. चिऊताई मात्र एकदम स्मार्ट . . . . . . .

“ती रे कशी?”

“शाळेला कुठं जाते? तरीही घरटं बांधते. . ते ही पावसात वाहून न जाणारं . . . ”

आजोबा नातवाचा आविर्भाव बघून हसले खरे. पण थोडेसे विचारात पडले. सगळ्याच गोष्टी शिक्षणामुळं, पदवी घेतल्यामुळं मिळतात असं नाही. बर्‍याचशा गोष्टी केवळ निरिक्षणातून, विवेकबुद्धीनं समजून घेता येतात. घरटं बांधणं हे कौशल्य आहे, जे चिमणीकडं आहे; सुगरणींकडं आहे.

कावळा, कबूतर असे काही पक्षी घरटं बांधताना दिसत नाहीत. कावळा वीणीच्या हंगामापुरतं का होईना घरटं बांधतो आणि फसतो. कोकीळकंठी पिल्लांचं गायन सुरु झाल्यावरच जागा होतो. आता काव काव आणि फडफड करत बसण्यापलिकडं काहीच पंखात उरत नाही. कोकीळेच्या रियाजात अंडी उबवण्यामुळं खंड पडत असावा कदाचित. कावळ्यालाही थोडी कमी अक्कल असते हे ही बरच म्हणायचं. तेव्हढ्यात गोटूच्या हाका कानावर आल्या . . .

” आजोबा . . . . आजोबा. . . . . .

कावकाव थांबली होती. पिंपळ शांत ऊभा होता. गोटू आजोबांना बॅट बॉल खेळायला बोलवत होता.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments