जीवनरंग
☆ रूप्या…भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆
हे पाहून मालकीन म्हणाली,
“असं का वो? पहिलं डोळं पुसा. अन ती भाकरी खावा”
“अगं! जीवापल्याड जपलंय मी रूप्याला. आता तो म्हातारा झालाय म्हणून त्येला ईकायचा. मरू दे की दावणीला त्याला. ईकायचं म्हणजे कसायाला द्याचा. हे बरं वाटतय का तुला?”
“हे सारं खर हाय. पण बापूसाबानां कोण सांगणार? आपलं सारं घरच ते चालवित्यात. कारभारी हायत घरांच. “
“ते भी खरं हाय”
“मग लई इचार करू नका. पहिलं जेवा”
तिनं भाकरी पुढं सारली. थाटीत कालवण दिलं . भाकरीवर खर्डा दिला. उरली भाकर धडप्यावर ठेवली. एरव्ही चवीनं खाणा-या तात्यानं कशीबशी एक भाकर खाल्ली. बाकीची तशीच ठेवली.
एरव्ही चवीनं जेवणारा तात्या पण आज त्याचा जेवणाचा मूडच गेलावता. तरीभी मालकिनीच्या आर्जवांवर त्यानं निम्मं जेवण केलंवत.
त्या दिवशी दुपारी झोपणा-या तात्याची झोप उडाली होती. तो सारखा रूप्याकडे बघत होता.
सायंकाळचा वकूत. तात्याचा थोरला भाऊ बापू एका गि-हाईकाला घेवून गोट्यात आलावता.
“आर्ं शामू!जरा रूप्याला ऊठव. एक गि-हाईक आलय”
हे बोलणं ऐकल्यावर तात्याच्या डोळ्यांत चटकण पाणी आलं.
“बापू माझ्या रूप्याला तेवढं ईकू नका. मी त्येला दावणीवर मरू देणार हाय. त्याचं सारं मी करणार हाय”
“आरं शामू खूळा हायस का काय?हे बघ आता त्येला कामांचं काय जमणार हाय का? आज चालतूय तोवर विकू या. चार-पांचशे रू. तरी येतील. जरा शहाण्यासारखा वाग. “
तात्याला काय बोलावं ते कळंनासं. तात्याचं वडील काटी टेकत आलं. ते भी काय बोललं नाय. त्यात तात्या धाकटा. जनावराचा कारभारी. चोवीस तास घरगड्यासारखा वागणारा. पण त्याच्या हातात कारभार नव्हता.
पाच सहा दिवस असेच निघून गेले. तात्याला वाटलं बहूधा रूप्याला ईकायचा बेत रद्द झालाय. त्याला बरं वाटलं.
आज तात्या दुपारी वैरण आणायला माळाच्या पट्टीकडं गेलावता. जरा ऊन्ह असल्यानं तसा त्याला आज वकूतच झालावता. वैरण आणेपर्यंत दिवस मावळावता. का कुणास ठावं मात्र तात्याला कधी नव्हं तो उशीर झालावता.
तात्या गोट्याकडं आला त्यावेळी सांज झालीवती. त्यानं गोट्यापुढं वैरण टाकली. पण नेहमीप्रमाणं गोटा जागा झाला नाही. म्हसरं ऊटली पण सोन्या काय उटला नाय. तात्यानं पाहिलं रूप्याची दावण रिकामी दिसत होती. हे पाहील्यावर तात्या मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. शेवटी बापूनीं त्याचा शब्द खरा केला होता. बरं त्याला आडवणारं कोण होतं?. घरातली बापूचीच बाजू घेत.
तात्यानं बिंडा सोडला नाय. त्याला तो सोडावा असंही वाटलं नाय. तात्याचं काळीज फाटलं होतं. काळजात रूप्याची सय दाटून आली. तात्याशिवाय तो टाकलेली वैरण खात नव्हता कि पाणी पित नव्हता. तात्याला सारं आठवलं. डोळ्यांत ढग दाटलं.
तात्या वैरण न टाकताच घराकडं आला. बापू सोप्यात बसला होता.
“बापू ईकायचा होता तर माझ्या समोर ईकायचा. मी माझ्या हातानं त्याला भाकरी भरवणार होतो. तू बाकी डाव साधलास बघ!”
तात्या सोप्यात रडू लागला. बापू गप्प होता. एक खरं होतं की तात्या असता तर तात्यानं रूप्याला जाऊच दिलं नसतं . रूप्याही सजागती गेला नसता. त्यामूळं नेमकं बापूला हेच नको होतं. तात्याच्या डोळ्यांत पाणी बघून बापू पण हेलावला.
“आरं शामू एवढं हळवं व्हायचं नसतं. “
त्यानं ऊटून तात्याच्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसलं. तात्याला ऊठवलं. तात्याला लईच उचंबळून आलं.
पण हे बेगडी प्रेम होतं हे तात्याच्या कवाच लक्षात आलं होतं. तसं असतं तर त्यानीं माझ्या रूप्याला केंव्हाच विकला नसता.
तात्या ऊटला. सरळ गोट्याकडं आला. बरचं अंधारलवतं. तात्यानं डोळं पुसलं. वैरणीचा बिंडा सोडला. थोडी थोडी वैरण त्यानं सोन्याला अन म्हसरानां टाकली. माझ्या रूप्याची वैरण म्हणत त्याला उचंबळून आलं. तो ढसाढसा रडू लागला. त्या दिवशी तात्या ना जेवला ना झोपला. मालकिनीनं ,पोरानं मस्त मिनत्या केल्या पण काय उपेग झाला नाय.
तात्या दोन दिवस न जेवल्याचं कळताच वाडीतले रामरावआण्णा तात्याकडं आले. त्यानां पाहताच तात्याला जोरात हुंदका फुटला.
“आरं शामू हे रं काय? असा खुळ्यासारखा का रडतूयस. हे बघ!ही जगरहाटी हाय. आजचा तरणा बैल उद्या म्हातारा होणार. चार महिन्यांनतर का हूईनां शेवटी तो बसणारच हूता. पुन्हा त्येला कोण ऊटवणार? पहिलं दिवस न्यारं हूतं. माणसाला माणूस उभा रहात हूता. असं करू नगस. चार घास खा बघू. “
क्रमश: …..
– मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈