श्री सतीश स.कुलकर्णी
☆ जीवनरंग ☆ कथा ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆
आहात कोण तुम्ही? –
आशावादी की निराशावादी…
माणसाची मनोवृत्ती म्हणे त्याच्या बोलण्यावरून ओळखता येते, असं काही तत्त्ववेत्त्यांनी सांगून ठेवलं आहे. जुनंच उदाहरण द्यायचं झालं, तर ‘प्याला अर्धा रिकामा आहे’ असं विधान जो करतो, तो नक्कीच निराशावादी. आणि ‘वा! अर्धा भरलेला आहे की प्याला,’ असं कोणी म्हणत असेल, तर आशावादी तेथेची जाणावा!
अलीकडे एका समितीनं शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं शिक्षणाच्या दर्जाची पाहणी केली. देशात महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षण काय दर्जाचं दिलं जातं (किंवा दिलं जात नाही), याची यथासांग, साद्यंत पाहणी या समितीनं केली. ती करणाऱ्यांमध्ये बरेच तज्ज्ञ होते. हजारो विद्यार्थ्यांशी संपर्क साधून, काही शे प्राध्यापकांशी बोलून आणि अन्य काही शास्त्रीय कसोट्या लावून ही पाहणी करण्यात आली.
या समितीनं आपला अहवाल नुकताच सादर केला. तो स्वीकारायचा की नाही, हे सरकारनं अजून ठरवलं नाही. नेमकं काय करावं, अहवाल जसाच्या तसा स्वीकारावा, अंशतः स्वीकारावा की, पूर्णपणे फेटाळून लावावा, हे ठरविण्यासाठी तज्ज्ञांची आणखी एक समिती नेमण्याचं शिक्षणमंत्र्यांनी ठरवलं आहे म्हणे.
दरम्यानच्या काळात सरकारी सूत्रांमधून अहवाल फुटला. त्यातील काही निरीक्षणं, सूचना सगळीकडे झाल्या. अहवालात काय काय आहे, याच्या बातम्या मग बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या.
सरकारनं न स्वीकारलेल्या या अहवालातलं एक निरीक्षण तर फारच गाजलं. महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल अतिशय स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करताना समितीनं म्हटलं आहे, ‘पाहणी करताना आमच्या असे निदर्शनास आले आहे की, सांप्रत शिक्षणाचा दर्जा अतिशय खालावला आहे. विद्यार्थ्यांना चार वाक्ये व्यवस्थित लिहिता-वाचताही येत नाहीत. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी लेखनाचा व वाचनाचा दर्जा अतिशय खालचा आहे. त्यांचे इंग्रजी संभाषण ऐकले, तर ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे आहे.’
अशा कटू निष्कर्षांमुळे तमाम निराशावादी अधिकच निराश झाले आहेत. त्यातून त्यांनी शिक्षणपद्धती, शिक्षण क्षेत्र, संस्थाचालक, प्राध्यापक, कुलगुरू, सरकार आदी सर्वांवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे.
या उलटही एक प्रतिक्रिया आहे. ‘अरे वा! आपल्याकडची सातवीतली पोरं एकदम ग्रॅज्युएट झालेल्या पोरासारखं लिहितात-वाचतात आणि फाडफाड इंग्रजी बोलतात की!!’
© श्री सतीश स.कुलकर्णी
(मुक्त पत्रकार, ब्लॉगर)
संपर्क – [email protected], [email protected]
(इंटरनेटमुळे छान छान विनोद वाचायला मिळतात. विशेषतः इंग्रजीतले विनोद. त्यातल्याच काही छोट्या विनोदांना मराठी साज किंवा बाज देऊन थो़डं विस्तारानं लिहिलं. एखाद्या धान्याचा दाणा फुलवून त्याची खमंग व कुरकुरीत लाही बनवावी, तसं. ह्या लघुकथा अशाच; वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर दोन-चार स्मितरेषा उमटल्या, तर हेतू साध्य झाला एवढंच!)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
तुमचा हेतू साध्य होतोय.