श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ हार्मोनिअमचे सूर – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
कित्येक दिवस सकाळी जाताना नाही पण येतांना ते हार्मोनिअमचे जादुई सूर कानावर पडत होते. एकदा कधी तरी त्यांच्याशी बोलून त्यांची चौकशी करावी असे वाटत असे पण धीर होत नव्हता. कुठे रहात असतील. त्यांच्या घरी कोण असेल. अशा म्हातारपणी त्यांना असे स्टेशनच्या बाहेर उभे राहून का बरे पेटी वाजवावी लागते.? त्यांचे अंधत्व हे लहानपणी पासूनचे साथीला आहे, का काही कारणाने नंतर आले आहे. असे अनेक प्रश्न मनाला भेडसावत होते पण ते कायम मनातच रहात असत आणि मी ठरविले, दोन दिवसांनी माझी सेवानिवृत्ती आहे त्या नंतर स्टेशनला परत येणे जाणे होईल का नाही ह्याची शाश्वती नाही तर त्या दिवशी घरी जातांना काही वेळ थांबून त्यांची विचारपूस करायची.
त्या दिवशी लंच टाइममध्ये ऑफिसमधला माझा सेवानिवृत्ती समारंभ माझ्या अपेक्षेपेक्षा जरा जोरातच झाला. आमच्या ४०० जणांच्या ऑफिसमधील प्रत्येकाने काही पैसे काढून माझ्या ३८ वर्षाच्या नोकरीच्या कारकिर्दीचा उल्लेख करून, माझी प्रशंसा करून मला खूप चांगली अशी एक हार्मोनिअम दिली. त्या समारंभाचे सगळे नियोजन नालासोपाऱ्याला रहाणाऱ्या माझा असिस्टंट रुपेश काळे ने केले होते. माझी गाण्याची आवड त्याला माहित असल्याने त्याने माझ्यासाठी योग्य अश्या भेटीची निवड केली होती. खरंच त्या भेटीने मी मनापासून खुश झालो होतो. ऑफिस सुटल्यावर आधीच पैसे देऊन माझ्यासाठी ठाण्यापर्यंत उबेर कॅब ची सोय केली होती. ती हार्मोनिअम घेऊन मी डायरेक्ट घरी आल्याने त्या स्टेशनवरच्या पेटी वाजवणाऱ्या म्हाताऱ्याला भेटायचे राहून गेले.
दुसऱ्या दिवशी मी दुपारचे जेवण झाले तसा बाहेर पडलो आणि ठाणे स्टेशनला पोहचलो. ते हार्मोनिअमवाले आजोबा ठरलेल्या जागेवर काही दिसले नाहीत. बाजूला चौकशी केली तेंव्हा कळले ते दुपारी २.३० वाजता येतात. मी तेथेच जरा वेळ काढून त्यांची वाट बघत थांबलो. बरोबर २.३० वाजता ते हातात पांढरी काठी, गळ्यात हार्मोनिअम घेऊन आले. नेहमी सारखी डोक्यावर पांढरी कॅप आणि डोळ्यांवर गॉगल होताच. ते नेहमीच्या जागी स्थिरस्थावर झाले तसे मी पुढे येऊन त्यांच्याशी संवाद चालू केला, ” नमस्कार आजोबा…. आजोबा मी रोज तुमची हार्मोनिअम ऐकतो आणि तुमच्या बोटांमधली अद्भुत अशी जादू मला प्रकर्षाने तुमच्या विषयी कुतूहल निर्माण करते. तुमच्या कपड्यांवरून तुम्ही चांगल्या घरातले दिसत आहात तरी असे स्टेशनवर उभे राहून पैसे गोळा करण्यामागे काही परिस्थिती किंवा काही अडचण असेल तर मला सांगा. मला जमेल तेवढी मी तुम्हाला मदत करीन. “
त्यांनी पहिले डोळ्यावरचा गॉगल काढला. त्यांच्या निस्तेज डोळ्यांतून पाणी ओघळत होते. त्यांना मी आलोक हॉटेल मध्ये नेले. दोघांसाठी चहाची ऑर्डर दिली. चहा पिता पिता त्यांनी बोलायला सुरवात केली, ” मी शांताराम काळे, नालासोपारात राहतो. जन्मल्यापासूनच देवाने दृष्टी दिली नाही पण सुराचे ज्ञान दिले होते. अनाथाश्रमातच लहानाचा मोठा झालो. लहानपणीपासून अभ्यासापेक्षा जास्त वेळ हार्मोनिअमवर घालवत होतो. सुरांचे ज्ञान जरी होते तरी आवाजाची साथ नव्हती म्हणून कुठे ना कुठे हार्मोनिअम वाजवून मिळकत होत होती. भाड्याने रूम घेण्याएवढे पैसे जमले आणि मी नालासोपारात भाड्याने एक रूम घेतली. काही दिवसानी निर्मला भेटली. ती ही दृष्टीहीन होती. माझ्या वयाच्या ४० व्या वर्षी आमचे लग्न होऊन गोंडस असा मुलगा माझ्या झोळीत देऊन ती देवाघरी गेली. छोट्याला सांभाळणे माझ्या एकट्यासाठी कठीण होते म्हणून मी त्याला एका हॉस्टेलमध्ये शिकायला ठेवले. पैसा कमविण्यासाठी मी ऑर्केस्ट्रा आणि काही गायकांच्या साथीला पेटी वाजवत होतो. मुलाला चांगले शिक्षण दिले आणि एका चांगल्या कंपनीत त्याला सर्व्हिस मिळाली. नालासोपाऱ्यातच मोठा नाही पण एक बेडरूमचा फ्लॅट त्याने घेऊन आम्ही एकत्र रहायला गेलो. योग्य वेळेला घरात सुनबाई आली आणि काही दिवसातच मी आजोबाही झालो. सगळे आमचे आयुष्य हे व्यवस्थित चालले होते पण माझे अंधत्व माझ्या मुलाच्या संसारात आड येत होते. माझा घरात तसा काहीच उपयोग होत नव्हता आणि दिवसभर घरात हार्मोनिअम वाजविण्याचा माझ्या सुनेला त्रास व्हायला लागला. ऑर्केस्ट्रा आणि गायकांच्या साथीला हार्मोनिअम वाजविण्याचे काम ही बंद झाले. घरात खर्चाला काहीच पैसे देता येत नव्हते. तशातच एक दोनदा सुनबाईनी महागाई किती वाढली ह्याची चांगल्या शब्दात आठवण करून दिली. मुलाचे माझ्यावर प्रेम आहे पण तो सकाळी मुंबईला सर्विसला जाई तो रात्री उशिरा येई त्यामुळे सुनबाईचे बोलणे त्याला कळत नसे आणि मी ही कधी ते त्याच्या कानावर टाकले नाही. त्यांच्या संसारात काही विघ्न यायला नको म्हणून मीच माझा मार्ग निवडला.
क्रमशः…
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈