श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ हार्मोनिअमचे  सूर  – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

मुलगा कामावर निघाला की सुनबाईच्या हातावर काही पैसे ठेवतो आणि मी ही तयार होऊन गळयात पेटी घालून आमच्या जवळच्या झोपडपट्टीत जातो. तिकडच्या काही मुलांना मी हार्मोनिअम वाजवायला शिकवतो. त्यांच्या बरोबरच माझ्या पैशाने त्यांना जेवायला घालतो आणि ट्रेनचा प्रवास करून ठाण्याला येतो. पाच तास येथे हार्मोनिअम वाजवतो. इथे जे पैसे मिळतात, त्यातले काही सुनेला घरासाठी देतो आणि काही माझ्या शिष्यांसाठी ठेवतो. यात माझी हार्मोनिअम वाजवण्याची खाज ही भागते.     

नालासोपाऱ्यावरून ठाण्याला येण्याचे कारण म्हणजे मला कोणी ओळखीचं भेटू नये. तसे मी जे काही करतोय त्याची मला लाज वाटत नाही पण माझ्या मुलाला जर हे कळले तर त्याला खूप वाईट वाटेल. कोणी ओळखीचे भेटू नये यासाठीच मी कायम डोक्यावर कॅप आणि गॉगल घालून एवढ्या लांबचा प्रवास करून येतो. “

आजोबांनी सांगितलेला त्यांचा जीवनप्रवास विलक्षण वाटला.

आयुष्यात आलेल्या अडचणींवर त्यांनी त्यांना योग्य वाटेल असा मार्ग शोधला होता. त्यांच्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी आपलाही काही हातभार लावावा म्हणून मी खूप विचार करून माझ्या सेवानिवृत्तीची भेट आलेली ती नवीन हार्मोनिअम दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांना ती माझ्याकडून भेट दिली आणि त्यांच्या चांगल्या कार्याला हातभार लावला. त्यांना तुमची जुनी हार्मोनिअम तुम्ही झोपडपट्टीत कायमची ठेवा आणि ही नवीन हार्मोनिअम तुम्ही कायम वापरत जा असे सांगितले. त्यांनी त्या नवीन हार्मोनिअमवर बोटे चालविली  आणि खरंच जादुई सूर त्यामधून बाहेर पडले. आजोबांनी माझा हात हातात घेऊन मला धन्यवाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी माझ्या हृदयापर्यंत पोचली होती. ती हार्मोनिअम चांगल्या कामाकरिता वापरली जाणार ह्याचे मला समाधान मिळाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या ऑफिसमधल्या त्या रुपेश काळेचा फोन आला. ” सर, आम्ही तुम्हाला त्या दिवशी दिलेली हार्मोनिअम चोरीला गेली आहे ना ? सर त्या चोराने तुमची हार्मोनिअम माझ्या अंध वडिलांना विकली आहे. त्यांनी एका अज्ञात माणसाकडून ती विकत घेतली आहे. मी ती उद्या तुम्हाला परत घेऊन येतो. “. मी त्याला कसेबसे समजावून सांगितले की, ” अरे माझ्याकडे माझी एक हार्मोनिअम आहे आणि त्या नवीन चांगल्या हार्मोनियमवर देवानेच तुझ्या वडिलांचे नाव लिहिले असेल म्हणून ती चोरावाटे त्यांच्याकडे पोचली असेल. कृपया करून ती परत आणू नकोस. ती त्यांच्याकडेच असू दे. तुझे वडील डोळ्याने अंध असले तरी त्यांच्यासारखी दृष्टी तुला मला डोळे असूनही नाही. ते महान आहेत. फक्त त्यांना कधीही सांगू नकोस त्या हार्मोनिअमच्या मालकाला तू ओळखत आहेस. ते जर त्यांना कळले तर एक महान कार्य चालू आहे त्याच्यात खंड पडेल. हो आणि एक,  रुपेश, तू कायम तुझे नाव लिहिताना रुपेश शांताराम काळे असे संपूर्ण नाव लिहीत जा. त्या शांताराम नावाशिवाय तुझ्या नावाला पूर्णत्व येणार नाही. “

रुपेशला माझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ नाही कळला पण मी त्याच्या वडिलांची प्रशंसा करत आहे हे मात्र कळले.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments