श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ रिकामा देव्हारा… भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

मुतालिक आजोबांना भेटून आत्ताच बाहेर पडलोय.खूप अस्वस्थ आहे.खरंतर अस्वस्थ असायला हवं त्यांनी. पण ते मात्र आश्चर्य वाटावं इतके शांत आणि स्थितप्रज्ञ ! इतकं सगळं सोसूनही ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ म्हणत ते इतके नॉर्मल कसे काय राहू शकतात या विचाराने मी अस्वस्थ आहे की त्यांना सोसाव्या लागणाऱ्या वेदनांमुळे ?

त्यांची न् माझी ओळख तशी अगदी अलीकडची. जेमतेम तीन-चार महिन्यांपूर्वीची.या अल्पकाळात आम्ही ‘अपूर्वा अपार्टमेंट’ मधे शेजारी होतो. त्या अल्पकाळातही आमची ओळख दृढ झाली ती या मुतालिक आजी आजोबांच्या स्नेहशील,अगत्यपूर्ण वागणुकीमुळेच.

आज त्यांना भेटायला गेलो होतो ते अगदी सहज. मुद्दाम ठरवलेलं वगैरे नव्हतंच. काही कामानिमित्त टिळक-रोडला आलो होतो.अपेक्षेपेक्षा काम लवकर पूर्ण झालं.वाटलं उभ्या उभ्या का होईना आजोबांच्या घरी डोकावून यावं.त्यांना बरं वाटेल. मुख्य म्हणजे मलाही. पण घडलं वेगळंच.माझ्या जाण्यामुळे त्यांना खूप बरं वाटलं,पण मी भेटून बाहेर पडलो ते मात्र ही अस्वस्थता सोबत घेऊन ! अर्थात या अस्वस्थतेचं कारण त्या घरात असणारी माझी भावनिक गुंतवणूक हेही आहेच!

मला आठवतं, मुतालिक आजी-आजोबांचं वेगळेपण आमच्या पहिल्या भेटीतच मला ठळकपणे जाणवलं होतं. त्यामुळेच तर मी त्यांच्यात हळूहळू गुंतत गेलो होतो ! माझी पुण्यात अनपेक्षित बदली झाली तेव्हा तात्पुरती व्यवस्था म्हणून मी टिळक रोडवरच्या ‘अपूर्व अपार्टमेंट’मधे फर्स्ट फ्लोअरवरचा एक वन-रूम- किचन फ्लॅट भाड्याने घेतला होता.तिथे मी रहाणार होतो एकटाच. तोवर फॅमिली शिफ्टींगपूर्वी प्रशस्त फ्लॅटचा शोध सुरू होताच. मुतालिक आजी-आजोबा समोरच्या फ्लॅटमधे रहायचे. केर-फरशीचं काम करणाऱ्या मोलकरणीच्या सांगण्यावरून ऑफिसला निघताना तिच्यासाठी माझ्या फ्लॅटची किल्ली मुतालिकांकडे  ठेवण्यासाठी मी त्या दिवशी त्यांची डोअरबेल प्रथमच वाजवली. दोघांनी हसतमुखानं माझं स्वागत केलं. ते ‘आत या. बसा.’ म्हणाले. मी आत गेलो. माझी जुजबी ओळख करून दिली आणि त्यांच्याकडे किल्ली सोपवून मी जायला उठलो.

“बसा.घोटभर चहा घेऊन जा” आजीनी आग्रह केला.

“छे छे..आत्ता नको.खरंच नको.पुन्हा येईन ना मी”

“असं कसं ? पहिल्यांदाच येताय.बसा बरं.”आजी मनापासून म्हणाल्या आणि  मी नको म्हणत असतानाही  दुखऱ्या गुडघ्यावर रेटा देत उठल्या न् आत जाऊन चहाचं आधण गॅसवर चढवलंसुध्दा.फ्लॅटसंस्कृतीचा भाग बनलेले असूनही वाडा संस्कृतीतली मूल्यं त्यांनी जाणीवपूर्वक जपलेली असल्याचं पुढेही अनेक प्रसंगी मला ठळकपणे जाणवत गेलं.

त्यांना दोन्ही मुलगेच. पंच्याहत्तरीच्या जवळपासचे हे आजी-आजोबा या अडीचशे स्क्वेअर फुटाच्या छोट्या फ्लॅटमधे आणि त्यांची दोन्ही मुले मात्र आपापल्या प्रशस्त फ्लॅटमधे  वेगळे संसार मांडून मजेत रहातात आणि अधून-मधून वेळ मिळेल तेव्हा या घरी उभ्या उभ्या डोकावून जातात हे या कुटुंबाचं चित्र मला धुरकट रंगांनी   रंगवल्यासारखं उदास वाटत राहिलं होतं. आणि त्याचवेळी थकत  चाललेल्या म्हातारपणातही मुला सुनांना दोष न देता हे दोघे असे हसतमुख, समाधानी कसे राहू शकतात याचं मी आश्चर्य करीत रहायचो. पुढे हळूहळू परिचय वाढला तसं त्यांच्याच गप्पातून मला जेव्हा इतरही बरंच काही समजलं,तेव्हा या मुतालीक कुटुंबाचं पूर्वी उदास रंगहीन वाटणारं चित्र मला खूप आकर्षक, सुंदर वाटू लागलं !

पूर्वी पुण्यातल्या या मध्यवर्ती भागात जुन्या वाड्यातल्या टीचभर दोन खोल्यात त्यांचा संसार होता. मुलांचे जन्म,त्याची शिक्षणं, आई-वडिलांची म्हातारपणं, हे सगळं याच टीचभर जागेत या दोघांनी आनंदाने आणि कर्तव्यभावनेने अतिशय मनापासून निभावलेलं होतं. आपल्या दोन्ही मुलांनाही स्वतः काटकसरीत राहून उच्चशिक्षित केलं होतं. पुढे मुलं मिळवती झाली. त्याच दरम्यान वाड्याच्या जागी अपार्टमेंट उभं करण्याचा व्यवहार आकार घेऊ लागला होता. मग वाड्यात घरीदारी सगळीकडे त्याच्याच चर्चा !

जुन्या भाडेकरूंना ते रहात होती तेवढी जागा नव्या अपार्टमेंटमध्ये मिळणार होती. जास्तीची जागा हवी असेल तर मात्र त्यांना बाजारभावाने जास्तीचे पैसे देऊन घ्यावी लागणार होती.या दोन्हींचा मेळ घालून दोन्ही मुलांनी सर्वांना पुढे एकत्र रहाता येईल असा प्रशस्त फ्लॅट नव्या अपार्टमेंटमधे घ्यायचा निर्णय घेऊन टाकला आणि एक दिवस घरी तो जाहीरही केला. खरं तर मनापासून आनंद व्हावा अशीच ही घटना होती. कारण त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त रकमेसाठीचा सहभाग द्यायला दोन्ही मुले आनंदाने तयार होती. हे ऐकून आजी मनोमन सुखावल्या. आजवर चार भिंती पलीकडचं जगच न पाहिलेली ती माऊली भरल्या घराचे स्वप्न उराशी बाळगून होती.पण ते पूर्ण व्हायचं नव्हतं. कारण मुलांचं मनापासून कौतुक वाटलं तरीही आजोबानी मात्र मुलांचा हा निर्णय स्वीकारण्याची घाई केली नाही. मुलांना न दुखावता आपले विचार योग्य शब्दात त्यांना कसे सांगावेत याचाच ते विचार करीत राहिले.

भोवतालच्या जगातले असंख्य घरांमधले अनेक अनुभव त्यांनी आजवर जवळून पाहिले होते.त्यांचा स्वभाव आजींसारखा भावना प्रमाण मानून निर्णय घेण्याचा नव्हता. त्यामुळे त्यांनी मनोमन स्वतःपुरता घेतलेला निर्णय भावना आणि व्यवहार यांची योग्य सांगड घालणारा होता. जुन्या जागेबदली मिळणाऱ्या छोट्या फ्लॅटमधे हातपाय हलते रहातील तोवर आपण आपला वानप्रस्थाश्रम स्थापायचा आणि मुलांना त्यांच्या ऑफिसमधून जवळ असा आपापला प्रशस्त फ्लॅट आत्ताच बुक करून ठेवायला प्रवृत्त करायचं असा त्यांचा विचार होता !

ते हे सगळं आधी आजींशी बोलले. ऐकून आजी हिरमुसल्या. दोन्ही मुलांनी मात्र वडिलांनी दिलेला हा सल्ला ठामपणे विरोध करीत नाकारला. आईवडिलांना म्हातारपणी एकटं ठेवून आपण वेगळं रहायची कल्पना त्यांना स्वीकारता येईना. तरीही वातावरण थोडं निवळल्यानंतर मुलांच्या कलाने त्यांची समजूत काढत भावना आणि व्यवहार यांची गल्लत न करण्याचे शहाणपणाचे चार शब्द आजोबांनी मुलांच्या गळी उतरवलेच. पुढे भांड्याला भांडे जागून कटुता येण्याऐवजी सुरुवातीलाच भांडी वेगवेगळी लावून द्यायचा त्यांचा मार्ग त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुलांना मोकळा करून दिला.काळाची बदललेली आणि नंतरही वेळोवेळी बदलत जाऊ शकणारी पावलं आधीच ओळखण्याचा आणि आपापल्यापरीने त्यातून मार्ग काढण्याचा सूज्ञपणा आजोबांजवळ होता.आजोबानी या वयातही एकटं रहाण्यामागची आणि त्यांच्या मुलांनी आपापल्या चुली वेगळ्या मांडण्यामागची खरी कुटुंब कथा अशी होती !

क्रमशः….

 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments