श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ रिकामा देव्हारा… भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- बेल वाजवली तेव्हा बरीच वाट पाहिल्यानंतर दार उघडलं गेलं. दारात आजोबा नव्हते. आजी होत्या. त्या हसून ‘या’ म्हणाल्या. पण ते नेहमीचे आनंदी,प्रसन्न हसू आज मात्र थोडे थकल्यासारखे वाटत होते.)

“हे काय?आजोबा नाहीयेत?”

“आहेत ना. हे काय. अहोs, बघितलं का हो कोण आलंय?”

आजोबा नवीन दिवाणावर मांडी घालून एकाग्रतेने जप करीत बसले होते. चेहरा शांत. हसतमुख. नवीन फर्निचरमुळे त्या हाॅलचं सगळं रुपच  आकर्षक अशी नवी झळाळी आल्यासारखं बदलून गेलं होतं. आजोबांनी अलगद डोळे उघडले. माझ्याकडे पाहून समाधानाने हसले.

“अरे. . तुम्ही? कसे आहात?”

“मजेत. आजोबा, फर्निचर खरंच खूप छान झालंय”  

आजोबांनी हसर्‍या चेहर्‍याने मान डोलावली.

“बसा. चहा करते.” म्हणत आजी उठू लागल्या. उठताना त्यांना होणारा त्रास आणि वेदना मला पहावेनात.

“आजी,मी चहाला पुन्हा येईन. नक्की येईन पण आता नको. तुम्हाला आधीच बरं नाहीये असं दिसतंय. थकलहात तुम्ही.” मी अतिशय आपुलकीने म्हणालो.

आजी अगतिकपणे आजोबांकडे पहात राहिल्या. आजींचे डोळे भरून आले.

“आजी, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची?”

” माझ्या तब्येतीचं काय हो? पण यांची काय दशा झालीय पाहिलंत का?”

“असं का म्हणताय? काय झालंय आजोबांना?”

आजोबा एवढंसं हसले. आजी मात्र मनात साठून राहिलेलं सगळं आवेगाने सांगू लागल्या. ऐकून मी हादरलोच. सगळं ऐकताना अंगावर शहाराच आला एकदम. आजोबांनी चटके देणारं हे दुःख कसं सहन केलं असेल या कल्पनेनेच मी कासावीस झालो. ‘इतकं होऊनही स्थितप्रज्ञासारखे इतके शांत राहूच कसे शकतात हे?’ मला  प्रश्न पडला.

ती सकाळ उजाडली होती तीच मुळी एखाद्या काळरात्रीसारखी. सकाळची आठ-साडेआठ वेळ असेल. आजोबा पूजा करीत बसले होते. जेमतेम दहा बाय दहाच्या त्या किचनमधल्या नव्या फर्निचरबरोबरच आवर्जून करून घेतलेल्या त्या छोट्याशा सुबक देवघरातल्या देवांची ती पहिलीच पूजा होती ! कारण आदल्या संध्याकाळीच फर्निचरचं काम पूर्ण झालेलं होतं. दिवाणाच्या मापाच्या ऑर्डर दिलेल्या नव्या गाद्या,उशा,बेड-कव्हर्स सगळं घेऊन त्याच वेळी नेमकी डिलिव्हरीला माणसं आली म्हणून आजी त्यांच्या उस्तवारीत. तोवर पूजा आवरत आली होती. ती माणसं गाद्या उशा वगैरे ठेवून निघून जाताच आजी आत आल्या. तेव्हाच नेमके लाईट गेले. किचन मधली कामं करायला स्पष्ट कांही दिसेना तसं प्रकाश यावा म्हणून किचनमधली छोटी खिडकी आजीनी उघडली. पण बाहेर आभाळ भरून आल्यामुळे प्रकाश जेमतेमच आत आला. त्याबरोबर घोंगावणार्‍या वाऱ्याचे झोत मात्र आक्रमण केल्यासारखे आत घुसले. आजोबांनी चाचपडत काडेपेटी उचलली. निरांजन लावायला काडी ओढल्याचं निमित्त झालं आणि स्वयंपाकघरात आगीचे लोळ उठले. वाऱ्याच्या झोताबरोबर ते देवघराच्या दिशेने झेपावले. आजोबा पाठमोरे बसलेले. सकाळच्या गडबडीत बदललेला गॅस सिलेंडर लिक होता. भडकलेल्या ज्वाळांनी  आजोबांची उघडी पाठ भरताच्या वांग्यासारखी भाजून काढली. आजोबा आक्रोश करु लागले. आजी भांबावून रडू लागल्या. आजोबांचा आक्रोश,आजींचं रडणं आणि दार ठोठावणाऱ्या शेजाऱ्यांचा आवाज या गदारोळात एखादंच मिनिट गेलं असेल. आजी भानावर आल्या न् रडत रडत दार उघडायला बाहेर धावल्या. दार उघडताच शेजारी आत घुसले. गॅसचा वास जाणवताच परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. एकाने गॅसशेगडीची बटणं बंद आहेत ना याची खात्री करुन घेतली. आणि रेग्युलेटर काढून बाजूला ठेवला. दुसऱ्याने तत्परतेने हाताला लागेल ते रग,कांबळं,सतरंज्या घेऊन आजोबांना पांघरेस्तोवर आजोबा अर्धमेल्या अवस्थेला पोचले होते. मग तातडीने मुला-सूनांना फोन, हॉस्पिटलायझेशन, तेथून कालच मिळालेला डिस्चार्ज आणि आजपासून हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं सर्वांचं रुटीन !

ऐकता ऐकता तो प्रसंग स्वतःच अनुभवत असल्यासारखा मी शहारलो होतो. अपार करुणेने मी आजोबांकडे पाहिले. ते नेहमीसारखेच शांत आणि हसतमुख ! या माणसाच्या स्थितप्रज्ञतेपर्यंत आगीच्या त्या झळा पोचल्याच नव्हत्या जशा काही. . . !!

“खूप भाजलंय ना?” आजोबांजवळ बसून त्यांचा हात हातात घेत मी कळवळून विचारलं.  आजोबांनी होकारार्थी मान हलवली.

“पहायचंय?”

मी मानेनेच नको म्हटल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नसावं बहुतेक. कारण त्यांनी दोन्ही खांद्यांवर घेतलेल्या धोतराच्या एकेरी तलम वस्त्राची टोकं अलगद दूर करीत दुसऱ्या हातानं पाठीवरचे ते मऊसूत वस्त्राचे आवरण अलगद बाजूला केले. पाठभर पसरलेल्या त्या तांबूस ओल्या जखमा मला पहावेचनात. नजरेला चटका बसावा तशी मी नजर फिरवली.

“कसं सहन केलंत हो सगळं?” आजोबांची नजर शून्यात हरवली.

“परमेश्वराने दिलेली शिक्षाच होती ती. सोसायचं बळही त्यानेच दिलं.”

“शिक्षा? तुम्हाला? कशाबद्दल?” मला कांही समजेचना. त्यांची नजर मात्र स्वतःच्याच मनाचा तळ शोधत चाचपडत राहिली.

“तुमच्या लक्षात येतंय का ? हे सगळं ज्या दिवशी घडलं ना, त्या रात्री पहिल्यांदाच मी त्या नव्या कोऱ्या बेडवरच्या मऊसूत गादीवर प्रथमच पाठ टेकून शांत झोपणार होतो. पण देव ‘नाहीs. . ‘ म्हणाला.”

त्यांनी आवंढा गिळला. मी ते पुढे बोलायची वाट पहात त्यांचा प्रत्येक शब्द असोशीने कानात साठवायचा प्रयत्न करीत राहिलो.

” माझ्या मुलं-सुना- नातवंडांनी अपार प्रेमानं देऊ केलेलं ते सुख मी निर्लेप वृत्तीने कुठं स्वीकारलं होतं ? मनात कुठेतरी त्या सगळ्यांना वरकरणी ‘नको. . कशाला?’ असं म्हणत होतो खरा पण या ऐश्वर्याचा क्षणिक मोह मला पडलाच होता ! उमेदीच्या वयापासून कांबळ्याच्या चौघडीवरही शांत झोपणारा मी मग मला हा मोह का पडावा? पण तो पडला होता हे नक्की. आयुष्यात कधीच कसलेच उपभोग हव्यासाने न घेतलेलं हे शरीर मऊ मुलायम बेडवर पाठ टेकायला मात्र आसुसलेलं होतं. मग देवानेच मला बजावलं,

‘ विरक्त मनानं वानप्रस्थ स्वीकारलाय अशी मिजास मारत होतास ना? मग मोह आवरायचा. मोह आणि हव्यास मनातून हद्दपार होईपर्यंत अंथरुणाला पाठ टेकायची नाहीs. ‘ तुम्ही पहाताय ना? करपलेल्या जखमांनी भरलेली ही पाठ घेऊन असा बसून असतो  रात्रंदिवस. आज पंधरा दिवस आणि पंधरा रात्री होतील,याच नव्हे कुठल्याच अंथरुणावर मी पाठ टेकून झोपून शकलेलो नाहीये.”

ऐकून मी थक्क झालो.

———–

त्यांना भेटून मी आत्ताच बाहेर पडलोय. खूप अस्वस्थ आहे. खरंतर  अस्वस्थ त्यांनी असायला हवं. पण ते नेहमीसारखेच शांत आणि स्थितप्रज्ञ !

माझी अस्वस्थता आजोबांबद्दलच्या करुणेपोटीच निर्माण झालीय असं वाटलं होतं. पण नाही. आज त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दातून झिरपत राहिलेलं त्यांचं ‘अध्यात्म’ मला अस्वस्थ करतंय. स्वतःच्या अंतर्मनातच आपल्या परमेश्वराची प्रतिष्ठापना केलेल्या त्यांना त्या परमेश्वराच्या मनातला ‘आतला आवाज’ किती स्पष्ट ऐकू आलाय !  कोणत्याही कर्मकांडांत अडकून न पडता,  स्वतःच्या आस्तिकतेचे स्तोम न माजवताही परमेश्वराचं बोट धरून प्रतिकूल परिस्थितीतही किती समाधानाने जगता येते याचं आजोबा म्हणजे एक मूर्तीमंत उदाहरण होते आणि मी. . ?

स्वत:ला आस्तिक म्हणवण्यातच आजपर्यंत धन्यता मानणाऱ्या माझ्या मनातला देव्हारा मात्र रिकामाच असल्याचा भास मला असा अकल्पितपणे  झाला न् त्यामुळेच खरं तर मी खूप अस्वस्थ आहे !!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments