सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-1 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
सव्वा लाख क्यूसेक पाणी!म्हणजे किती कोणास ठाऊक! पुराच्या काळात रोज एवढं पाणी कोसी नदीतून वाहत असतं. एरव्ही मात्र, सप्टेंबर महिन्यात फक्त पाच लाख क्यूसेक एवढंच वाहतं. आणि ऑक्टोबरात किंवा अश्विनात नऊ लाख क्यूसेक.
काही दिवसांपूर्वी निरूपद्रवी असलेल्या ह्या सापाचं दोन दिवसांपूर्वी अजस्र, क्रूर, सगळं गिळंकृत करणाऱ्या ऍनाकोंडात रूपांतर झालं.
आणि आता कोसी थोडी मवाळ झाली आहे .दोन्ही किनाऱ्यांवरून दुथडी भरून भरधाव वेगाने वाहणारं पाणी थोडं निवळलंय. आता कोसी नदी डौलात वाहत आहे.
पानार, लोहनद्रा, महानदी आणि बकरा या तिच्या सर्व उपनद्यांचा पूर्वी नारिंगी असणारा रंग आता गढूळ झाला आहे .हरणाची शिकार करून ते अख्खेच्या अख्खे गिळल्यावर अजगर जसा सुस्तावतो, अगदी तशीच कोसीही अगदी शांत, एखाद्या मुलासारखी सालस झाली आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. रोज, प्रत्येक प्रहराला लोक त्यांच्या कोसीमातेची प्रार्थना करत आहेत, ‘हे कोसीदेवी, आमच्यावर कृपा कर. पुरामुळे झालेल्या या प्रलयापासून आम्हाला वाचव!’
हॅरिसनगंज स्टेशनच्या फलाटावरची गर्दी आज ओसरल्यासारखी वाटतेय. काही लोक आपल्या घरी परतले आहेत. जे जाऊ शकले नाहीत, ते मागेच थांबले आहेत.बहुधा त्यांची घरं राहिलेली नाहीत किंवा त्यांच्या झोपड्या अर्ध्याअधिक चिखलात बुडालेल्या आहेत.नाहीतर एखादं मेलेलं, कुजलेलं जनावर -कुत्रा किंवा म्हैस – तिथे पडलं आहे आणि त्याची एवढी दुर्गंधी आजूबाजूला पसरली आहे, की अंगणातसुद्धा पाय ठेवणं मुश्किल झालं आहे. काहीजण आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना किंवा मुलांना मागे सोडून पुन्हा फलाटावर आले आहेत. पुराने पाण्याबरोबर आणलेली एवढी रेती त्यांच्या शेतात पसरली आहे की ते आता तिथे कसलंच पीक काढू शकत नाहीत. काही लोक तर मजुरी -रोजगारीच्या आशेने गुजरात वा पंजाबसारख्या लांबच्या प्रांतात चालले आहेत.
रेल्वेमंत्री याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांनी जाहीर केलं आहे की सहरसा, अररिया, कटिहार, सुपौल, पूर्णिया आणि मधेपुरा वगैरे ठिकाणाहून लोक विनातिकीट प्रवास करू शकतील. त्यामुळे हॅरिसनगंज स्टेशनजवळचे रेल्वे मार्ग दुरुस्त केले आहेत व त्यावरून गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. लोक गाडीत चढले, तर कोणीही त्यांची तिकिटं तपासायला येणार नाहीत. आणि त्यामुळे तिकडे लोकांची एकच गर्दी झाली आहे. गाडी आतून तर भरलीच आहे, शिवाय टपावरही लोक बसले आहेत. प्रत्येक गाडीत तुफान गर्दी आहे. स्पष्टच सांगायचं, तर माणसं भरून ओतत आहेत.
एका सुक्या खडखडीत हातपंपासमोर बिरोजा विडी ओढत बसलाय. दोन दिवस अन्नाशिवायच गेले. आज दुपारी बहुधा डाळभात वाटतील. नशीब चांगलं असेल, तर एखादा कांदाही मिळेल प्रत्येकाला. तो आता फलाटावर फिरत आहे. ओळखीच्या प्रत्येक माणसाला विचारून याविषयी माहिती काढायचा प्रयत्न करत आहे. आणि जर ही माहिती खरी असेल, तर त्याला बांधावर जाऊन त्याच्या मुलीला -जनकदुलारीला -इकडे घेऊन यायचं आहे. त्याचे मुलगे मुरली आणि माधो दोघेही इथेच आहेत, फलाटावर खेळत आहेत. आणि त्याची बायको कालव्याच्या बांधाजवळ, जनकदुलारीबरोबर त्याची वाट पाहत आहे. सगळ्यात धाकटा छोटू तिच्या मांडीवर झोपला आहे.
क्रमश: ….
मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी
अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈