श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ गा बेटी गा… भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मधू बागेला पाणी देत होती. गुलबक्षीच्या ताटव्याजवळ आज मे फ्लॉवरचा दांडोरा उमडून आलेला होता. दांडोऱ्यावर हजारभर कळ्यांचं कणीस. काल तर तिथे काहीच नव्हतं. आज पापण्या मिटलेल्या गप्पगप्पशा कळ्या कणसात एकमेकांना बिलगून बसल्याहेत. उद्या बाहेरच्या परिघातल्या कळ्या डोळे उघडतील. लालसर गुलाबी केशरकाड्या दूर होतील. आतल्या वर्तुळातले गुलाबी केसर मुकुटासारखे पिवळे परागकोश माथ्यावर मिरवतील. परवाला त्याच्या आतल्या वर्तुळातल्या कळ्या उमलतील. तेरवाला त्याच्या आतल्या. चार-पाच दिवसात त्या दांडोऱ्यावर गुलाबी रंगाचा फुटबॉल झोकात झुलू लागेल.
आज बाळ पोटात ढुशा देतंय. नंतर लाथा झाडेल, वळेल, फिरेल आणि एक दिवस पोटातलं बाळ कुशीत येईल. गळामिठी घालील. पापे घेईल. ती विलक्षण उत्तेजित झाली.
झाडांना पाणि देऊन झालं. नंतर तिने पाईपमधून पाण्याचा फवारा अंगणावर उडवला. तापलेल्या मातीचा कण न् कण उमलत गेला. त्याच्या गंधाच्या लाटा उसळत उसळत तिच्यापर्यंत पोचल्या. आवेगाने, तिने त्या श्वासातून आपल्या शरीरात सामावून घेतल्या. त्या गंधाने तिची उत्तेजना अधिकच वाढली आणि तिच्या गळ्यातून स्वर पाझरू लागले. स्वर… ताना… स्वरांच्या आवर्तनात तीदेखील झाडाझाडातून फुलपाखरासारखी भिरभिरू लागली. आता त्या स्वरांना शब्द भेटत गेले.
‘केतकी गुलाब जुई चंपक बन फुले’
गात गातच ती आत आली. मागच्या व्हरांड्यात उभी राहून बागेकडे बघत ती गाऊ लागली. आलाप-तानांचे झुले हिंदोळू लागली.
साधना घरी आली. पण, मधूचं लक्षच नव्हतं. ती आपली गातच होती. स्वरांचा झरा अविरतपणे झुळझुळत होता. साधना चकितच झाली. कितीतरी दिवसांनी वर्षांनी तिची लाडकी लेक गात होती. मनमोकळी होऊन गात होती. पण, आज असं काय घडलं? कितीतरी वर्षांपूर्वी तिने गाणारे आपले ओठ मिटून घेतले होते. गोड गळ्यावर अत्याचार केला होता. शपथ घ्यावी तसं गाणं सोडून दिलं होतं.
मधुवंतीचा आवाज अति मधुर सुरेल. ताला-सुरांची पक्की जाण. शाळेत असताना शाळेतली, शाळेबाहेरची गाण्याबद्दलची कितीतरी बक्षिसे तिने मिळवली होती. तिला खूप मोठी गायिका बनवण्याचं स्वप्नं तिच्या जन्मापासूनच निरंजन आणि साधना बघत होते. ‘पहिली बेटी-सूरकी पेटी…’ तिच्या जन्मानंतर निरंजन म्हणाला होता. मधुवंती त्याची भारी लाडकी. निरंजन रियाजासाठी तिला घेऊन बसली की साऱ्या जगाचं भान विसरायचे. गातच राहायचे. धाकट्या अनूपला मात्र एका जागी मांडा ठोकून आलाप-ताना घोटायचा भारी कंटाळा. दहा मिनिटं एका जागी बसणं त्याला कठीण जायचं. गोड बोलून, चुचकारून, रागावून सगळं करून झालं. पण, तो भारी चंचल. मन एकाग्र करून एका जागी स्थिर बसणे त्याला मुळीच जमत नसे. शेवटी, निरंजनने त्याचा नाद सोडला. आपल्या मुलीवर मधुवंतीवरच त्या दोघांनी आपल्या आशा केंद्रित केल्या. तिला ख्यातनाम गायिका बनवायचं. आपल्या घराण्याचा वारसा अधिक संपन्न करून तिच्या हाती सोपवायचा.
पण एक दिवस… निरंजनच घरातून निघून गेला.
जाता जाता मधूचं गाणंही घेऊन गेला.
कोणार्कच्या सूर्यमंदिरात संगीत महोत्सव होता. त्यासाठी निरंजन घरातून बाहेर पडला. मुलांच्या शाळा, साधनाची बॅंक… कुणालाच जाणं शक्य नव्हतं. मधूचं तर १० वीचं महत्त्वाचं वर्ष. निरंजनचं गाणं खूप चांगलं झालं असणार. दुस-या दिवशीच्या वृत्तपत्रातून त्याचा विस्तृत रिव्ह्यू आलेला. जाणकार संगीत समीक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलेलं. मुरकती, मींड, लोच आणि मुख्य म्हणजे त्याच्या गाण्यातलं भावसौंदर्य, त्याची प्रयोगशीलता, नावीन्य, वाचताना साधना-मधूच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मधू तर दिवसभर आपल्या मन:चक्षूंपुढे निरंजनचं गाणं आठवत राहिली. त्याचा दमदार पुरिया… रंग कर रसिया आओ अब… तिच्या डोळ्यांपुढे शाळा नव्हतीच जणू. तिच्या डोळ्यापुढे आपल्या वडिलांची गाणारी मूर्ती… त्यांनी कुठे कोणते आलाप घेतले, ताना घेतल्या, मींड घेतली… हेच सारं तिला दिसू लागलं.
क्रमश:…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈