श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ गा बेटी गा… भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिलं –‘आई, बाबा आले? सकाळीच येणार होते ना?’ साधनाच्या चेहऱ्याकडे बघता बघताच तिच्या लक्षात आलं. बाबा आले नाहीत. आता इथून पुढे)
‘शी:! नाहीच ना आले बाबा! कधी येणारेत?’ मधू निरंजनची अतिशय लाडकी. ‘माझं गाणं हीच पुढे नेणार…’ असं सारखा म्हणायचा. आईपेक्षा बाबांशीच तीचं गूळपीठ जास्त जमायचं.
साधनाने पत्र पुढे केलं. मधू दहावीत आहे. लहान नाही आता! आणि लपवणार तरी काय? आणि किती दिवस? नाहीतरी बाहेरच्या लोकांकडून काहीतरी कळण्यापेक्षा आपणच आपल्या मुलांच्या मनाची तयारी केलेली बरी.
पत्र वाचता वाचता मधूचे दात ओठात रूतले.
‘आम्ही इंदौरला रहायचं ठरवलंय. माझ्या प्रकृतीला मुख्य म्हणजे गळ्याला मुंबईपेक्षा इंदौरची हवा जास्त मानवेल. मी तिथे नाही. मधूच्या गाण्याकडे लक्ष दे. तू देशीलच. मी येईन तेव्हा तिला तालीम देईन. तू येऊ दिलंस तर… सुट्टीत मधू माझ्याकडे येईल. परीक्षा झाली की तिला गाणं शिकायला तुळजापूरकरांकडे जाऊ दे…’
पत्र वाचून मधू सैरभैर झाली.
‘शी:! आपले लाडके बाबा आपल्याला सोडून गेले… गाण्यासाठी… नकोच ते गाणं…’
हातातल्या पत्राचे तिने अगदी बारीक तुकडे करून टाकले. ‘हं! पत्राचे तुकडे केल्याने का वस्तुस्थिती बदलणार आहे.’ साधनाच्या मनात आलं. त्यानंतर मधूची मन:स्थिती खूपच बिघडली. एकीकडे तिला बाबांचा राग येत होता. तिरस्कार वाटत होता आणि त्याचवेळी तिला नको असताना बाबांच्या आठवणी भरभरून येत होत्या. त्यांचं हसणं… त्यांची थट्टा मस्करी… गाताना त्यांची लागणारी समाधी… त्यांनी लावलेला षडज्… त्यांच्या ताना… फिरक्या… आणि मग त्यांचं गाणंच फक्त तिच्या मनात गुंजत राह्यचं. या साऱ्याचा तिच्या मनावर खूप ताण पडला. तिला डिप्रेशन आलं. तिच्या बिघडलेल्या मन:स्थितीतून तिला सावरायल साधनाला खूप प्रयास पडले. पण, हळूहळू ती नॉर्मलला आली. यानंतर मात्र तिने गाणं सोडलं ते कायमचं. कुणाच्याही समजावणी, धमकावणीला तिने भीक घातली नाही.
साधनाने किती वेळा सांगितलं.
‘तू गाणाऱ्याचा राग गाण्यावर काढतीयस बेटा… तसं करू नको. गाणं आनंददायी आहे. हट्टाने या आनंदास पारखी होऊ नको.’
पण मधूने जणू आपले ओठ शिवून टाकले. गाणं म्हणणं सोडाच. ऐकणंही तिने सोडून दिलं. घरात रेडिओ, टी.व्ही.वर गाणं लागलं तरी खटकन् ती बटण बंद करायची.
अशी ही मधू… आज चक्क गात होती. कितीतरी वर्षांनी… मधूलाही आईची चाहूल लागली. आईच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे बघता बघता तिच्या लक्षात आलं, आज अघटित घडलं. आपण गातोय. आपल्याला गावसं वाटतंय. सकाळपासूनच. गाण्याची इतकी अनावर इच्छा आतून उफाळून आली की ती दाबून ठेवताच आली नाही. इतकी अनावर… आपल्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या पेशी थेट आजोबांच्या पेशीशी नातं सांगणार आहेत की काय? त्याच्या धमन्यातून रक्ताबरोबरच स्वरांचा प्रवाह वाहणार आहे की काय? आपण नाही, आपल्या गर्भातील प्रत्येक पेशी जणू गात आहे आणि तिचा स्वर आपण मुखरित करतोय. आता कुणाचा तिरस्कार करणार आपण? कुणाला टाळणार?
साधनाकडे लक्ष जाताच, मधू धावत तिच्याकडे गेली. तिच्या पायाशेजारी फरशीवर बसली आणि तिच्या मांडीत आपलं तोंड लपवलं. जणू तिनं काही गुन्हा केला होता आणि त्यासाठी ती लज्जित झाली होती.
साधनाने तिच्या डोक्यावरून ममतेने हात फिरवत म्हटलं,
‘गा बेटी गा! अगं, तुझ्या पोटात अंकुरणारं बाळ जसं ईश्वराचं देणं, तसं तुझ्या गळ्यातून उमटणारं गाणंही ईश्वराचं देणं, उतू नको, मातु नको, ईश्वरचं देणं अव्हेरू नको.’
मधूने मान वर उचलली. किती तरी दिवस तिच्या मनात तळात घोंघावणारं वादळ शमलं होतं. आपल्या पोटात अंकुरणाऱ्या त्या इवल्या गर्भानं काहीतरी नवीन जाणीव आपल्याला दिलीय असं तिला वाटत राह्यलं.
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈