जीवनरंग
☆ खरा आधार… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆
गेल्या आठवड्यात एका आजींच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळ्याला गेले होते. या आजींना दोन मुलगे, पैकी एक डाॅक्टर (अस्थीरोगतज्ञ) आणि दुसरा चार्टर्ड अॅकाउंटंट. दोन्ही मुलगे सुना व उच्चशिक्षित नातवंडे या सर्वांनी मिळून एका पंचतारांकित हाॅटेल मधे थाटात सोहळा आयोजित केला होता. आजींच्या दोन्ही मुलांनी अगदी थोडक्यात जी आजींची जीवनकहाणी आम्हा उपस्थितीतां समोर मांडली, आणि त्यातून ऋणानुबंध कसे असतात, ते ऐकून आमच्या अनेकांच्या डोळ्यांमधून पाणी वाहिले.
आजींचे हे दोन्ही मुलगे जुळे. हे मुलगे दोन वर्षांचे असताना आजींवर वैधव्याची कु-हाड कोसळली. एकत्र कुटुंबात या आजींना केवळ आश्रीत हा दर्जा मिळाला. “आम्ही तीन खाणारी तोंडे पोसतो” असे उद्गार ऐकवले जाऊ लागले.
सांगली जवळच्या छोट्या खेड्यात पंचवीस माणसांच्या कुटुंबा साठी राब-राब राबून पहाटे पाच ते रात्री आकरा वाजे पर्यंत कामे करून पण शिव्या खाणेच आजींच्या नशीबात आले.
एक दिवस मुले पाच वर्षांची झाल्यावर पहाटे अगदी चुपचापपणे आजी दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पडल्या आणि पुण्याला आल्या. दोन दिवस चुलतबहिणी कडे राहून लगेच त्यांनी सदाशिव पेठेत भाड्याची खोली एका वाड्यात घेतली. आजींनी पोळपाट लाटणे हाती घेऊन स्वैंपाकाची कामे मिळवली. हाताला अत्यंत चव होती त्यामुळे कामे भरपूर मिळू लागली. मुलांना नू. म. वि. शाळेत घातले.
मुले अत्यंत गुणी. परिस्थिती समजून कधीही आईजवळ कोणताच हट्ट केला नाही.
आजी डेक्कन वर डाॅ. बापट यांच्या घरी स्वैपाकाचे काम करायच्या. अत्यंत विश्वासू व सुगरण बाई बापट कुटुंबियांना भलतीच आवडली. त्यांची मुले पण आजींच्या मुलांच्या बरोबरीची होती व हे डाॅक्टर पतीपत्नी दिवसभर कामात असल्यामुळे त्यांना घर व मुलांकडे बघायला विश्वासू माणसाची गरज होती. म्हणून त्यांनी आजी व त्यांच्या मुलांना बंगल्यात आऊटहाऊस मधे रहायला जागा दिली. आजींच्या रहाण्याची सोय झाली सज्जन माणसांचा पाठिंबा मिळाला.
दोन्ही मुले अतिशय हुशार. चौथी व सातवीची पण शिष्यवृत्ती मिळवून पुढे गेली. आजींच्या कष्टाळू वृत्ती मुळे बापट कुटुंबियांना पण सोयीचे झाले. “माझी मुले उच्चशिक्षित झालीच पाहिजेत” हा आजींनी ध्यास घेतला होता. दहावीला मुलांनी मेरिटलिस्ट मधे नाव मिळवले आणि पेपर टाकणे, दुधाच्या पिशव्या टाकणे करत करत पुढील शिक्षण चालू केले. बापट कुटुंबियांनी पण दोन्ही मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावला.
मग आजींनी केलेल्या बचतीतून तसेच बापट मंडळी यांच्या मदतीने कोथरूडला अगदी छोटासा फ्लॅट घेतला, पण बापट यांचे काम मात्र त्या करतच होत्या. दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन गुणी सुना घरात आल्या. बापटांची मुले अमेरिकेत स्थायिक होऊन Greencard Holder झाली, आणि अमेरिकन पत्नी दोघांनी शोधली. बापट पती-पत्नी पण वृद्ध झाली आणि Problem म्हणजे त्यांच्या मुलांना भारतात येऊन आईवडील यांची काळजी घ्यायला पण वेळ नाही.
Knee-Replacement Operation, Spinal cord Operation सारखी मोठी Operations होऊनही मुलांनी साधी चौकशी पण केली नाही. मात्र आजींच्या डाॅक्टर मुलाने तर स्वतः ऑपरेशन होताना त्याच्या सहकार्यां बरोबर लक्ष घालून खूप काळजी घेतली आणि दुस-या मुलाने पण दर वेळी खूप मदत केली.
आजींच्या सोहळ्याला बापट पतीपत्नी आले होते पण स्वतः श्री. बापट तर Wheel Chair वरून आले होते.
आता शेवटी असे समजले की, आजींच्या दोन्ही मुलांनी मिळून जो कोथरूडला मोठ्ठा बंगला बांधला आहे, त्या मधे वरच्या दोन खोल्यां मधे त्या दोन्ही मुलांनी बापट पतीपत्नी यांना आणले. आणि आजींची दोन्ही मुले त्यांची उतकृष्ट काळजी घेतात. बंगल्यातील तळमजल्यावर आजींचे कुटुंब जणू गोकुळ नांदते आहे. आजींची नातवंडे बापट पतीपत्नी यांना पण “आजीआजोबा” असेच म्हणतात.
सकाळसंध्याकाळ वरती ताजा स्वैपाक जातो. बापट काकाकाकू पण आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगत आहेत.
“ऋणानुबंध
म्हणतात ते हेच असावेत ना ?
सत्य घटना… आपल्या पुण्यातली. डोळे भरून वाचावी अशी.
व ह्या आजी चे नाव आहे शोभना अभ्यंकर 🌹🙏
संग्राहिका – मृदुला अभंग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈