श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – त्याने एक निवेदनपत्रवजा जाहिरात आमच्या हातात ठेवली आणि आम्हाला आत जाऊन सुशीलाजींना भेटायला सांगितलं. इंटरकॉमवरून आमच्या येण्याची सूचनाही दिली. आता इथून पुढे )
आम्ही जाहिरात वाचली. त्यावर लिहिलं होतं, कोणत्याही प्रकारच्या उद्घाटन, समारोप, पुढाऱ्यांची भाषणे, साहित्य-विज्ञान-भूगोल-इतिहास, इ. विषयांमधील परिचर्चा, उद्बोधन वर्ग, काव्यगोष्टी इ. साठी सजग श्रोते भाड्याने मिळतील.
आम्ही आत सुशीलाजींकडे गेलो. तिला पाहताच वाटले, तिचे नाव सुशीलाऐवजी शिला असायला हवे होते. इतका दगडी नि निर्विकार चेहरा मी आजपर्यंत पाहिला नव्हता. आम्ही तिच्यासमोर खुर्चीवर बसलो. तिने विचारले, ‘‘कशा प्रकारच्या श्रोत्यांची आपल्याला अपेक्षा आहे?”
‘‘म्हणजे? त्यातही काही प्रकार आहेत?”
‘‘तर!”
‘‘म्हणजे?… कोणत्या प्रकारचे श्रोते आहेत आपल्याकडे?”
‘‘श्रोत्यांचे प्रकार म्हणजे… सामान्य श्रोते, खास, म्हणजे विशिष्ट श्रोते आणि अद्वितीय श्रोते!”
‘‘त्या सा-यांचे दर सारखेच…”
‘‘सारखेच कसे असतील?” शिला माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच म्हणाली, ‘‘प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत.” असं म्हणून ती उठली आणि कपाटातलं श्रोत्यांचं दरपत्रक काढून माझ्यापुढे ठेवलं.
दरपत्रकात प्रथम सूचना होती, ‘‘खालील दर प्रत्येकी तीन तासांसाठी आहेत.” त्याखाली श्रोत्यांचे दर दिलेले होते.
- सामान्य श्रोता – ३ तास थांबणे ५ रु. + २ वेळा स्पेशल चहा + एक नाश्ता + १ जेवण
टीप – ३ तासांपेक्षा जास्त थांबावे लागल्यास दुपारचे वा रात्रीचे (वेळेनुसार) जेवण द्यावे लागेल.
- खास श्रोता – ३ तासांसाठी ८ रु. + २ वेळा स्पेशल चहा + एक नाश्ता + १ जेवण
टीप – ३ तासांपेक्षा जास्त थांबावे लागल्यास प्रत्येक तासाला ४ रु.ओव्हर टाईम.
- अद्वितीय श्रोता – ३ तासांसाठी १२ रु. + २ वेळा स्पेशल चहा + २ कोल्ड्रिंक (याच्या ऐवजी देशी चालेल) + १ गोडाचे जेवण + एक नॉनव्हेज जेवण
अद्वितीय श्रोत्यांच्या दराच्या खाली टीप नव्हती. त्याबद्दल सुशीलाजींना विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अद्वितीय श्रोते असतील, तर कार्यक्रम तीन तासांपेक्षा जास्त लांबू शकत नाही.”
अद्वितीय श्रोते असतील, तर कार्यक्रम तीन तासातच संपतो, म्हणजे आहे काय हा प्रकार? एव्हाना सुशीलाजींनी ऑर्डर नोंदवण्याचा फॉर्म पुढे ठेवला. नाव, तारीख, वेळ, समारंभ, स्थळ या सगळ्या गोष्टी लिहून झाल्यावर खालती मुद्दा होता, श्रोत्यांचा प्रकार. आता त्यातला फरक कळल्याशिवाय श्रोते बुक कसे करायचे?
सुशीलाजींना त्याबद्दल विचारलं आणि दगड मनुष्यवाणीने बोलल्याचा भास झाला. दगड म्हणजे, सुशीलाजी म्हणाल्या, ‘‘आम किंवा सामान्य” श्रोते म्हणजे असे श्रोते, जे खुर्चीवर बसून खुर्च्यांची शान वाढवतात. ते अधून मधून जागे असतात. अधून मधून झोप काढण्याचीही सवलत त्यांना दिलेली असते. पण समारंभ पूर्णपणे संपून वंदे मातरम् किंवा पसायदान होईपर्यंत ते खुर्ची सोडत नाहीत, हे महत्त्वाचं.”
‘‘आणि खास श्रोते?”
‘‘खास श्रोते खुर्च्यांवर केवळ बसून खुर्च्यांची शोभा वाढवतात असं नाही. तर ते अधून मधून टाळी वाजवतात. वहावा ! क्या बात है ! असे प्रशंसोद्गार काढतात. यांना जाणकार श्रोते असंही म्हणता येईल. हे श्रोते समारंभ सुरू झाल्यापासून संपेपर्यंत जागे राहतात. झोपत नाहीत.”
‘‘आणि अद्वितीय श्रोते? ही काय चीज असते?”
‘‘अद्वितीय म्हणजे असे श्रोते, जे समारंभात वारंवार व्यत्यय आणतात. विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षाची आमदार मंडळी जसा अधिवेशनाचा विचका करतात, तसं काही मंडळी समारंभाचा विचका करतात. त्यांना विध्वंसक श्रोते असंही म्हणता येईल. ते मधून मधून टोमॅटो, अंडी, कागदाचे बोळे व्यासपीठाच्या दिशेने फेकत असतात. मधेच हाSS हूंSS करतात. मधेच आरडा ओरडा करतात. सभा उधळून लावतात.”
‘‘अं… काय?” मी इतका चक्रावून गेलो. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.
‘‘या श्रोत्यांना जास्त डिमांड आहे. म्हणून त्यांचे रेटस् जास्त आहेत.”
‘‘बोला !… आय मीन लिहा त्या फॉर्मवर … कोणत्या प्रकारचे किती श्रोते आपल्याला हवे आहेत.”
मी सुबोधला घेऊन चर्चा करण्यासाठी बाहेरच्या बाजूला आलो.
‘‘मला वाटतं ५० सामान्य श्रोते बुक करावेत.”
‘‘गाढव आहेस! ” तसा मला केव्हाही काहीही म्हणायचा अधिकार सुबोधला आहेच आणि तो केव्हाही, कुठेही गाजवायची सवय सुबोधला आहे.
‘‘आता काय झालं?”
क्रमश:…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈