जीवनरंग
☆ हृदयस्पर्शी – स्वाभिमान ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆
मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो,वेळ संध्याकाळची
तरी सात वाजलेले
तेच हॉटेल, तोच कोपरा,
तोच चहा अणि मित्राची वाट पहात बसलो होतो…
चहाचा एक झुरका अणि एक सीप घेतला तेंव्हा माझ्या टेबलासमोरील
दुसर्या टेबलवर एक माणूस
आणि आठ दहा वर्षांची त्याची मुलगी ..
शर्ट ही फाटका…
अगदी त्याच्या सारखाच
वरची दोन बटनं गायब ,
मळकी पँट, थोडी फाटकी
मजुरी करणारा वेठबिगार असावा.
मुलीनी छान दोन वेण्या घातलेल्या साधारण फ्रॉक पण स्वच्छ…
धुतलेला वाटत होता..
तिच्या चेहर्यावर…
अतिशय आनंद आणि कुतूहल दिसत होते
ती हाॅटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठ्ठे करून फडफडत पाहात होती डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा …खाली बसायला गूबगूबीत सोफा
ती अगदी सूखावलीच …
वेटरने दोन स्वच्छ ग्लास,
थंडगार पाणी त्याच्या समोर ठेवलं …पोरी करता एक डोसा आना की
माणसाने वेटरला सांगितलं …
मुलीचा चेहरा अजून खुलला …
आणि तुम्हाला ….
नाय , मला काय नग …
डोसा आला…
चटणी सांबार वेगळं
गरमागरम मोठ्ठा फूललेला …
मुलगी डोसा खाण्यात गुंग
तो तिच्याकडे…
कौतुकाने पहात पहात
पाणी पीत होता ….
तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला
आजकालच्या भाषेत डब्बा फोन
तो मित्राला सांगत होता
आज पोरीचा वाढदिवस आहे …
तिला घेऊन हॉटेलात आलोय …
शाळेत तिचा पहीला नंबर आला तर…तुझ्या वाढदिवसाला मी …
हाॅटिलात मसालाडोसा खायला
घालीन म्हणालो होतो …
ती खातीय डोसा
थोडा पॉज ….घेऊन
नाय र दोगांना कुटलं परवडतयं!
घरी पिठलं भाकर हाये मला …
गरमागरम चहाच्या चटक्याने
मी भानावर आलो….
कसा ही असू दे …!!
श्रीमंत किंवा गरीब
बाप लेकीच्या चेहर्यावर हसू
बघण्यासाठी काही ही करेल …
मी काऊंटरवर चहाचे आणि
त्या दोन मसाला डोसाचे
पैसे भरलो आणि सांगितलं ..
अजून एक डोसा आणि चहा
तिथे पाठवा …
पैसे का नाही…
असं विचारलं तर सांगा
आज तुमच्या
मुलीचा वाढदिवस आहे ना ….
तुमची मूलगी
शाळेत पहिली आली नां ….
आम्ही ऐकलं तुमचं बोलणं …..
म्हणुन आमच्या हॉटेल तर्फे खास
असाच अभ्यास कर म्हणाव ….
ह्याचं बिल नाही …..
पण ……. पण …..
फुकट हा शब्द वापरु नका …
त्या वडीलांचा स्वाभिमान मला
दुखवायचा नव्हता ….!!
आणि अजून एक डोसा
त्या टेबलवर गेला ..
मी बाहेरून पाहात होते..
बाप कावराबावरा झाला
म्हणाला ….
येकचं म्हनालो होतो मी …
तेव्हा मॅनेजर म्हणाले …
अहो तुमची मूलगी
शाळेत पहिली आली …
आम्ही ऐकलं ते …
म्हणून हाॅटेल तर्फे,
आज दोघांना फ्री …
वडीलांच्या डोळयांत पाणी आलं
लेकीला म्हणाला …
बघ असाच अभ्यास केलास तर
काय काय मिळतया …
बाप वेटरला म्हणाला,
हा डोसा बांधून द्याल कां …
मी आणि माझी बायको
दोगं बी अर्धा-अर्धा खाऊ …
तीला कूटं आसं
खायाला मिळतयं …
आणि आता माझ्याही डोळयांत
खळ्ळकनं पाणी आलं ….
अतिशय गरीबीतही माणूसकी जपणारी माणसं आहेत अजून या जगात.
आनंद आनंद म्हणजे काय ते त्या पोरीच्या आणि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचाच……….
संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈