? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 4 ☆ मेहबूब जमादार ☆

अचानक तिला माणसाच्या ओरडण्याचा आवाज आला.हाय…!! हूर्रे….!! असा आवाज पुढे पुढे सरकत होता. तिच्या तिक्ष्ण डोळ्यानीं हे पाहिलं.तिनं क्षणात आपलं घरटं जवळ केलं.तो शिकारी हातात गलोरी घेवून पक्षांना व खारी नां टिपत होता.ती भ्याली.तिचं सारं अंग कंपित झालं.         

तिचं घरटं उंचावर होत.भोवती घनदाट फांद्या होत्या.त्यामूळे तिला भिती नव्हती.ती घरट्याबाहेर येवून हे सारं न्याहाळत होती. खाली पानांचा सळसळ असा आवाज अजूनही येत होता. शिकारी त्याच्या टप्प्यात आला होता.हातात असलेल्या गलोरीने खारीवर नेम धरत होता.सारं वन जागं होवून चित्कारत होतं.

सर्वानी आपआपली सुरक्षीत जागा पकडली होती.एरव्ही शांत असलेलं वन निरनिराळया आवाजांनी त्रस्त होऊन गेलं होतं.ती घरट्यातून पहात होती,शिका-याला दोन पारव्यांची फक्त शिकार करता आली होती.हळूहळू तो ओढ्याकडे सरकत निघून गेला होता.

एरव्ही शांत असणारं वन आज शहारून गेलं होतं. पण हल्ली फळांच्या,पक्षांच्या आशेपोटी शिका-यांचा राबता वाढू लागला होता. शिकारी वनांतून निघून जाईपर्यत वनांत स्मशान शांतता नांदायची.

पण वानरं शिका-याची छेड काढायचे.शिका-यानं दगड मारला की ते ऊजवीकडे वळत.ऊजवीकडून दगड आला की ते डावीकडे वळत.शिका-याचा दगड काय त्या वानरांना लागत नसे.

एखदा तर भलताच प्रसंग घडला.एका रागीट असलेल्या नर वानरांनं सरळ शिका-याच्या डोक्यावर झेप घेवून दूस-या झाडावर क्षणांत उडी घेतली.बिचारा शिकारी कांही कळण्याआधी खाली पडलां.तो कसाबसा धडपडत उठला.क्षणांत त्यानं ओढा जवळ केला.इकडे वानरानीं ते पाहील.आनंदात ते ख्यॅ ख्यॅ….. करत सगळ्या झाडांवर  नाचू लागले.झाडं डोलाय लागली.परत तो शिकारी या वनांत दिसला नाही.

एरव्ही ती वानरांना शिव्या घालायची.पणआज तिला खरच आनंद झाला होता.आज तिनं घडलेला सारा प्रसंग तिच्या सहका-यानां सांगितला.त्याही आनंदल्या.

बघता बघता महिना लोटला होता. आज तिच्या पिल्लांनी  डोळे उघडले होते. तिला फार मोठा आनंद झाला होता. आज पिल्लांनी त्यांची आई पाहिली होती.बाहेरचं जग ती पहाणार होती.अजूनही त्यानां स्वत:चं अन्न मिळविण्यास आठ-दहा आठवडे लागणार होते.तोवर आईच्या दुधावरच त्यांच संगोपन होणार होतं.

आज तिनं मनसोक्त पिल्लानां दूध पाजल. पिल्लांमूळे तिला सावध रहावं लागायचं. वनांत मोर, लांडोर असल्यामुळें तिला भिती नव्हती. चूकून कावळ्याचं,घारीचं लक्ष गेलं तर? हा विचार तिच्या मनांचा ठाव घेई. त्यामूळे सहसा ती झाडावरून खाली उतरत नसे.

तिच्या सहकारी खारीनीं बरेच घरटे बदलले, पण तिनं तिचं घरटं बदललं नव्हतं. एव्हढं तिला ते सुरक्षीत वाटायचं. त्यातूनही कांही गडबड झाली तर सगळ्या खारी चित्करायच्या. चिर्र…चिर्र…असा आवाज सगळ्या वनांत घूमायचा.

पावसाळा संपून थंडीची चाहूल अवघ्या वनाला लागली होती. तिनं वाळलेलं गवत आणून घरट्यात बिछानां केला होता.तिचं घरटं म्हणजे एक मोठं बीळंच होतं.पाऊस व वा-यापासून मुळांत ते सुरक्षीत होतं.       

पिल्लं हळूहळू बोलू लागली होती.तिला त्या हळूवार चित्कारण्याचा आनंद वाटू लागला.किमान तिला पिल्लानां भूक लागल्याचं कळू लागलं होतं.जरी ती दुस-या झाडांवर गेली तरी पिल्लांच्या आवाजामुळे ती झेप टाकून पिल्लांकडे येत होती. पिल्लानां पाजत होती.

ऊन डोक्यावर आलं की ती सरसर झाडावरून खाली उतरायची.बुंध्याजवळ दोन्ही पायांवर बसून ती अंग पुसायची.शेपटी दोन्ही बाजूस झुलवायची.कानोसा घेत ओढ्याकडे जायची.क्षणात ती पाणी पिवून घरट्याकडे सरकायची.         

ती ओढ्यावर फार वेळ थांबत नसे.जर थांबलीच तर पुढच्या दोन्ही हातानीं डोक्यावर पाणी घ्यायची.डोकं चोळायची.क्षणात निघून घरट्याकडे झेप घ्यायची.

सगळ्या वनांवर गारवा पसरला होता. दिवसा काय वाटत नसे पण रात्री वनांत थंडी वाजे.      

क्रमश:…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments