सौ. प्रियदर्शिनी तगारे

 ☆ जीवनरंग ☆ शिवा ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆ 

भर दुपारची टळटळीत वेळ ! वैशाखाचं ऊन रणरणत होतं. लॉकडाऊन मुळं रस्त्यांवर शुकशुकाट होता. उन्हाच्या झळा कमी व्हाव्यात म्हणून मी खिडक्यांचे पडदे ओढून घेत होते. तोच गेट बाहेरुन कुणाच्यातरी हाका ऐकू आल्या ,” काकू ,ओ, काकू ”

मी थोडं दुर्लक्ष केलं. करोनाच्या जीवघेण्या धास्तीमुळं कुणाचं स्वागत करायला मन धजावत नव्हतं. तरी बराच वेळ हाका ऐकू येत राहिल्या.नाईलाजानं मी दार उघडून बाहेर गेले. व्हरांड्यात उभी राहून सुरक्षित अंतरावरुन ओरडले ,”कोण आहे ?”

गेट उघडून एक तेराचौदा वर्षांचा मुलगा आत आला.”काय रे, का आला आहेस ?”

“काकू , काम आहे ?”

“म्हणजे ?”

“कायतर काम द्या ना. बाग साफ करू?”

खरंतर लॉकडाऊनमुळं कुणीच कामाला येत नव्हतं.बागेत खूप कचरा साठला होता.पालापाचोळा अस्ताव्यस्त उडला होता. तरीही कुठल्या परक्या मुलाला……… मी विचारात पडले.

तोच तो केविलवाण्या आवाजात म्हणाला,” सध्याच्याला वडलांचा  धंदा बंद हाय. कालपास्नं घरात काही नाही.”

“काय करतात वडील तुझे ?”

” भंगाराचा धंदा हाय. पन …….

म्हैन्यापास्नं समदं बंद हाय. पैलं होतं तंवर भागलं. पन आता….”

माझी मन:स्थिती द्विधा झाली.

” हे बघ कामाचं राहूदे, तुला मदत म्हणून तसेच थोडे पैसे देते.” माझ्या डोक्यात कोविड व्हायरस थैमान घालत होता. कधी एकदा याला बाहेर काढते असं झालेलं.

“नगं नगं ,काम न करता कायच नगं. मी बागंतलं लोटून काडतो ना ! जवळ येत न्हाई ”

त्याची काकुळती बघून मला दया आली.

“बागेत मागच्या बाजूला कचऱ्याची बादली आणि झाडू आहे तो घे आणि कर काम.”

मी दार लावून घेतलं. तो काम करताना खिडकीतून दिसत होता.

आमची जेवणाची वेळ झाली. बाहेर ते पोर उपाशी काम करतंय या विचारानं पोटात तुटलं.

“इकडं ये रे, थोडं खाऊन मग कर काम ” मी खिडकीतून ओरडले.

“नगं काकू. भूक न्हाई.”

त्याच्या आवाजातील ठामपणानं मी गप्प झाले.

तासाभरानं त्यानं बेल वाजवली.

“झालं बघा समदं ,काकू ,एक बार बघून घ्या.”

त्यानं खरंच सगळं स्वच्छ केलं होतं. न सांगताच गाडी सुध्दा लखलखीत पुसली होती.. मी खुष होऊन पैसे  घेऊन आले. ते बघून तो थबकला . केविलवाण्या सुरात म्हणाला ,” काकू, पैशापरीस डाळ -तांदळ देता? रातीपास्नं धाकली भन डाळ भातासाटी रडतीया. आन् आता दुकानं बंद झालीत ”

माझ्या काळजात कळ उमटली. पुढच्या काळजीनं मी हावरटपणानं चार सहा महिन्यांचा किराणा भरुन ठेवला होता. ते तुडुंब भरलेले डबे डोळ्यासमोर आले. अपराधी भावनेनं आत आले.

डाळ, तांदूळ ,साखर प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरलं.

पायरीवर ठेवलेल्या पिशव्या बघून त्यानं शर्टाच्या बाहीनं डोळे पुसले. कृतज्ञ नजरेनं  माझ्याकडं बघत म्हणाला ,” आंगन लोटाया  यिऊ रोज ? ”

नकळत माझ्या तोंडून गेलं, “ये.अरे,पण नाव काय तुझं ?”

“शिवा”

डाळ तांदूळाच्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडं बघताना मी नकळत डोळे पुसले.

 

© © सौ.प्रियदर्शिनी तगारे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments