श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ विटी-दाडू – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆
घड्याळात पाच वाजले तसे हातातले पुस्तक बाजूच्या टेबलवर ठेऊन रावसाहेब उठले आणि किचन मध्ये जाऊन बारीक गॅसवर चहाचे आदण ठेवले. बाथरूममध्ये जाऊन हात-पाय, तोंड धुतले आणि बेसिनवर अडकवलेला नॅपकिन घेऊन तोंड पुसत गॅसच्या कट्ट्याजवळ आले. चहाला उकळी फुटली होती. त्यांनी फ्रीज मधील दुधाच्या पातेल्यातून अर्धा कप दूध छोट्या पातेल्यात घेऊन दुधाचे पातेले परत फ्रीजमध्ये ठेवले आणि छोटे पातेले गॅसवर ठेवले. . दूध साधारण गरम झाल्यावर त्यात उकळी फुटलेल्या चहाच्या पातेल्यातील अर्धा कप कोरा चहा ओतला आणि चांगला उकळल्यावर कपात गाळून घेऊन ते बाल्कनीत आले. रोजच्याप्रमाणे बाल्कनीतल्या आरामखुर्चीत चहाचे घोट घेत बसून राहिले
नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या या बाल्कनीतून समोर, वर पाहिले की फक्त आभाळच दिसायचे. . मावळतीला कळलेला सूर्य दिसायचा. . ही बाल्कनी त्यांना खूप आवडायची पण ती मुलाच्या मास्टरबेडरूमची बाल्कनी असल्याने ते फक्त याच वेळी बाल्कनीत घडीभर बसायचे. या टू बीएचके फ्लॅट मधील त्यांच्या बेडरूमलाही छोटी बाल्कनी होती. त्यांच्या मुलाने तिथेही त्यांच्यासाठी छानशी आराम खुर्ची आणून ठेवली होती. पण ती बाल्कनी रस्त्याच्या दिशेला होती. समोर दुसरी इमारत झालेली होती अकरा मजल्याची. . त्या बाल्कनीतून खाली बघितले की रस्ता दिसायचा. . वर्दळ दिसायची आणि समोर, वर पाहिले की इमारत. आणखी वर पाहिल्यावर दिसणारे समोरच्या इमारतीच्या वरचे तुटपुंजं आकाश बघायला त्यांना आवडायचे नाही.
त्यांनी चहाचा आस्वाद घेतल्यावर काही वेळाने घड्याळात पाहिलं. सहा वाजत आले तसे ते कप घेऊन उठले. बाल्कनीचे काचेचे सरकते दार लावले. मास्टर बेडरूमचे दार ओढून घेतले. सिंकपाशी येऊन स्वतःचा कप, छोटे पातेले आणि गाळणे स्वच्छ धुवून कट्ट्यावर पालथे घातले. कोऱ्या चहाचे पातेले झाकल्याची, फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित लावल्याची खात्री केली. रुममध्ये जाऊन दरवाजामागे अडकवलेला विजार- सदरा घातला आणि पलंगाजवळच उभी टेकवून ठेवलेली काठी घेऊन बाहेर पडले. बाहेर पडताच फ्लॅटचे दार ओढून घेतले. . पुन्हा आत ठकलून लॅच लागल्याची खात्री करून घेतली आणि काठीचा हलकासा आधार घेत चालू लागले. साऱ्या गुळगुळीत फरशा. . काठीवर भार द्यावा तर काठीचा आधार मिळण्याऐवजी काठी घसरून पडण्याचीच भीती इमारतीतून चालताना नेहमीच त्यांच्या मनात तरळून जायची. . त्यामुळे ते सावध पावले टाकत चालायचे. . तशीच सावधानता बाळगत ते रोजच्या शिरस्त्यानुसार चालत, लिफ्टमधून खाली येऊन इमारतीबाहेर पडले आणि उजवीकडे वळून पदपथावरून चालू लागले.
रावसाहेब चालत चालत मैदानासमोर आले तसे पदपथावरून रस्त्यावर उतरून दोन्हीबाजूला पाहत रस्ता ओलांडून मैदानाच्या प्रवेशदारातून आत शिरले आणि त्यांनी नेहमीच्या बाकाकडे पाहिले. तिथे कोणीही बसलेले नाही हे पाहून त्यांच्याही नकळत त्यांना बरे वाटले आणि ते हळूहळू चालत येऊन त्या बाकावर बसले.
मुलांच्या खेळासाठी महानगरपालिकेने विकसित केलेले हे मैदान फ्लॅटपासून जवळच होते त्यामुळे ते रोज संध्याकाळी तिथं येऊन बसत. चार भिंतीबाहेरचा तो मोकळेपणा त्यांना हवाहवासा वाटे. मैदानात एकबाजूला बाग होती. . तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी जागा होती. . भोवतीने झाडे होती त्याच्या सावलीत बसण्यासाठी बाके होती त्या बागेमध्येच ज्येष्ठाना फिरण्यासाठी वेगळा पथ निर्माण केला होता. तर या बागेला लागूनच मोठ्या मुलांना खेळण्यासाठी मोठं मैदानही होते. तिथे बऱ्याचदा क्रिकेट च्या मॅच ही होत असत. तिथेच हॉलीबॉलचे ग्राउंड ही होते. बाग व मैदान याच्या दरम्यान झुडपांचेच सुंदर कुंपण ही होते. रोजच्यासारखाच मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या क्रिकेट पिच वर मोठ्या मुलांचा क्रिकेटचा खेळ अगदी उल्हासात, जोशात चालू होता. त्यांचे फोर, सिक्स, आऊट, क्लिनबोल्ड, रन. . रन असे वेगवेगळे आवाज कधी स्वतंत्र तर कधी संमिश्र ऐकू येत होते.
फ्लॅटच्या चार भिंतीत स्वतःचाही आवाज फारसा न ऐकलेल्या त्यांना मुलांचे ते आवाज ऐकून बरे वाटले. त्यांनी बाकावर बसतानाच हातातील काठी बाजूला टेकून ठेवली आणि अवतीभवती नजर टाकली. त्यांच्या समोरच काही अंतरावर एक मुलगा एकटाच बॉलने खेळत होता. . दुसऱ्या कोपऱ्यात त्याच्याच वयाची तीन चार मुले गवतावरच बसली होती. त्यांच्या काहीतरी गप्पा चालल्या असाव्यात. . त्या मुलांच्याच मागच्या बाजूला जवळच असणाऱ्या बाकांवर बहुदा त्या मुलांच्या पालक असणाऱ्या महिला बोलत बसल्या होत्या.. पण बोलत असतानाही अधून मधून त्या मुलांकडे लक्ष देत होत्या. . मधूनच कुणीतरी. . ‘ नो नो बेटा. . ‘ असे काहीतरी म्हणत, काहीतरी सुचवत सांगत होत्या.
हे सारे पाहताना त्यांच्या मनात आले ‘, पालकांच्या नजरेच्या पिंजऱ्यात खेळण्याचा किती आणि कसा आनंद मिळत असेल या मुलांना ? वारा पिलेल्या वासरासारखे मुक्त, मोकळे हुंदडणे या मुलांना माहीत तरी असेल का ? ” त्यांना गावाकडच्या मुलांचे खेळणे, हुंदडणे आठवले आणि त्यांच्या मनात गावाकडच्या आठवणी रुंजी घालू लागल्या.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈