मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-6 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-6 ☆ श्री आनंदहरी

‘मssम्मी’ म्हणून छोट्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला तसे रावसाहेब विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. त्यांचे लक्ष रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले.. एक मुलगा चेंडूने खेळता खेळता पडला होता. ते बाकावरून झटकन उठले आणि त्या रडणाऱ्या मुलाकडे गेले. तोवर एक त्या पडलेल्या मुलाच्याच वयाचा एक मुलगा दुसरीकडून धावत आला होता.

“कसा पडलास? बघू कुठं लागलंय?”

त्या मुलाकडे अविश्वासाने, संशयाने पहात त्याने उठण्यासाठी पुढे केलेला हात न घेता पडलेला मुलगा आणखीनच रडू लागला होता. रावसाहेब त्याच्या जवळ गेले. गुडघ्याला थोडेसे खरचटले होते.

“अरे, एवढा मोठा शूरवीर  मुलगा तू.. आणि एवढंसं लागलंय आणि रडतोस?”

पडलेला मुलगा त्यांच्याकडेही अविश्वासाने आणि संशयाने पाहू लागला होता. 

“तुला सांगतो माझ्या आईला एक जादूचा मंत्र येत होता… “

रावसाहेबांच्या वाक्क्याने ती दोन्ही मुले त्यांच्याकडे आश्चर्याने आणि उत्सुकतेने पाहू लागली तसे ते म्हणाले,

“लहानपणी आम्ही भावंडे खेळताना धडपडलो, पडलो की आम्हीसुद्धा असेच रडत होतो.. मग आई धावत यायची आणि म्हणायची ‘ खूप दुखतंय ना? थांब हं.. मी जादूने दुखणे गायब करते…’अल्लामत्तीर कोल्लामत्तीर छु ss!’  हा जादूचा मंत्र म्हणून  लागलेल्या ठिकाणी हळुवार फुंकर मारायची…”

“मग.. ? “

रडणे विसरून  पडलेल्या मुलाने विचारले.

“मग काय.. आईच्या जादूच्या मंत्राने दुखणे छु मंतर व्हायचे.. “

“अशी कुठे जादू असते का? “

“असते.. आईजवळ असतेच…पण आपल्यावर माया करणाऱ्या प्रत्येकाजवळही असते. थांब हं!”

रावसाहेबांनी ‘अल्लामत्तीर कोल्लामत्तीर….’ म्हणून त्या मुलाच्या जखमेवर हळूच फुंकर मारली.  फुंकरीने त्याला बरं वाटले.

“आत्ता उठ आणि आपण हळूहळू चालत जाऊन बाकावर बसुया थोडावेळ.. आणखी बरं वाटेल “

“हो चल, मी ही येतो”

पडल्यावर मदतीसाठी धावत आलेला मुलगा उठण्यासाठी त्याच्यापुढं हात करत म्हणाला.

“नाही…”

पडलेला मुलगा अविश्वासाने, संशयाने रावसाहेबांकडे आणि दुसऱ्या मुलांकडे पहात म्हणाला.

“का रे? “

“आईने सांगितलंय अनोळखी माणसांशी बोलायचे नाही, त्यांच्याबरोबर कुठं जायचं नाही. अनोळखी मुलांबरोबर खेळायचे नाही. “

“आईचे बरोबरच आहे पण आपण अनोळखी कुठं आहोत? काही दिवस तर आपण पाहतोय ना एकमेकांना?”

त्याचे बोलणे ऐकून काहीसे आश्चर्य वाटलेले रावसाहेब म्हणाले.

“हो पाहतोय.. आजोबा, तुम्ही तिथं बाकावर बसलेले असता आणि मी इथं एकटा खेळत असतो. पण आपली ओळख कुठं आहे? “

“ते ही खरंच आहे म्हणा.. आयुष्यभर एकत्र राहूनही बऱ्याचदा आपण ओळखू शकत नाही मग चार दिवस पाहिल्याने कसे ओळखणार? “

रावसाहेब स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणाले.

“काय म्हणालात?  “

“काही नाही रे.. हुशार आहेस तू खूप.. तुझे नाव काय रे? “

“स्मार्त. “

“खूप छान आहे नाव… आणि तुझे रे? “

“अर्थ. “

“व्वा ! तुझेही चांगले आहे नाव. स्मार्त, तू आजोबा म्हणालास ना? मग आजोबांशी वेगळी ओळख कशाला लागते रे? चल, थोडा वेळ बाकावर बसूया. तुला बरं वाटेल.. मग पुन्हा खेळ. चल उठ बरं ! अर्थ, हात दे रे त्याला. “

रावसाहेब म्हणताच काहीशा द्विधा मनःस्थितीतच स्मार्त अर्थच्या हाताचा आधार घेत उठला आणि त्यांच्यासोबतच पण मनात काहीसा संशय बाळगून सावधसा बसला.

“अर्थ, तू का खेळत नव्हतास? “

“माझ्याकडे खेळायला काहीच नाही. “

“अरे मग स्मार्त बरोबर खेळायचे?”

“नाही.. माझ्या आईने अनोळखी मुलांबरोबर खेळायचे नाही म्हणून सांगितलंय.. “

स्वतःचा चेंडू पोटाशी घट्ट धरत स्मार्त म्हणाला.

रावसाहेब हसले.

“अरे पण अर्थ आता अनोळखी कुठं राहिलाय? तू पडलास तेंव्हा मदतीसाठी तो धावत आला. तुला उठायला हात दिला. तुझा हात हातात घेऊन तुझी काळजी घेत हळूहळू इथंपर्यंत घेऊन आला. मदतीला धावणारी, काळजी घेणारी अनोळखी कुठं असतात?  तुम्ही दोघे तर आता मित्रच झालात. “

“आजोबा, तुम्ही तर माझ्या आजोबांसारखेच बोलता. “

स्मार्त रावसाहेबांना म्हणाला.

“अरे आजोबाचं आहे मी तुमचा.. आणि काय रे तुझे आजोबा बागेत येत नाहीत.. ?

“ते गावी असतात. एकटे एकटेच राहतात. मला खूप आवडतात ते.. ते कधी कधी येतात.. माझ्याशी खेळतात, मला छान छान गोष्टी सांगतात.. मला तर ते इथंच राहावेत असे वाटतं..  पण ते आले कि थोड्याच दिवसात आई बाबांना म्हणते, ‘ त्यांना काहीही कळत नाही.. ते गावीच असलेले बरे.. माझ्या स्मार्त वर गावाकडचे संस्कार नकोत व्हायला.. ‘ मग एक-दोन दिवसातच ते गावी निघून जातात.. मला त्यांची खूप आठवण येते हो.. “

“बरं झालं मला आजोबा नाहीत ते.. नाहीतर माझ्याही आईने त्यांना असंच गावी पाठवलं असतं कदाचित.. “

रावसाहेब स्मार्त व अर्थला जवळ घेतात.. त्यांच्या केसांवरून हात फिरवतात. स्वतःशीच पुटपुटतात.

“इथं राहून दुर्लक्षित, एकटे एकटे राहण्यापेक्षा गावी एकटे राहिलेले बरेच की.. “

“आजोबा, काही म्हणालात काय? “

“अरे, काही नाही रे.. म्हणले मला शिकवशील का तुझे खेळ? “

“आजोsबा  ! तुम्हांला क्रिकेट नाही येत खेळायला? “

आश्चर्य वाटून स्मार्त व अर्थ एकाच वेळी म्हणाले.

“नाही रे येत ! “

“मग तुम्ही लहान असताना काय खेळत होता? “

“आम्ही विटीदांडू, आट्यापाट्या, कबड्डी, खो खो  असे खूप खेळ खेळत होतो.. तुम्हांला विटीदांडू येतो का रे खेळायला?

“नाही “

“अरे मी तर माझा मुलगा लहान असताना त्याच्यासाठी सुताराकडून तीन विट्या आणि दांडू करून घेतला होता.  दोन विट्या हरवल्या पण मी तो विटीदांडू त्याच्या बालपणाची आठवण म्हणून अजून जपून ठेवली आहे.. “

“आजोबा, माझे आजोबाही खूपदा सांगत असतात, विटीदांडू खेळबद्दल.. तुम्ही उद्या आणाल का तो विटीदांडू? “

“हो.. आणीनही आणि तुम्हाला शिकवीनही..

पण चला आता घरी आई वाट पाहत असेल. “

“आजोबा, किती वाजले? “

“सात.. का रे?”

“अरे बाप रे! सात?  आजोबा पळतो मी.. आईने सांगितलंय सात ला घरात आला नाहीस तर पुन्हा खेळायला जायला परवानगी देणार नाही.. जातो मी.. बाय आजोबा, बाय अर्थ.. “

“सावकाश जा रे.. ! अर्थ तू ही सावकाश जा घरी.. “

“हो आजोबा, बाय ! “

स्मार्त आणि अर्थ घरी गेले तरी रावसाहेब बराचवेळ बाकावरच बसून होते.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈