श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ विटी-दाडू – भाग-7 ☆ श्री आनंदहरी ☆
रात्री जेवणे झाल्यानंतर रावसाहेब आपली मोठी ट्रंक काढून बसले.. या ट्रंकमध्ये राधाबाईंनी मुलाच्या लहानपणाच्या खूप साऱ्या गोष्टी जपून ठेवल्या होत्या.
रावसाहेबांनी ती ट्रंक उघडली आणि त्यातील वस्तू पाहून ते त्यात स्वतःला हरवूनच बसले. एकेक वस्तू म्हणजे अनंत आठवणींचे पोळंच होतं. बराच वेळ ते पेटी उघडून बसले होते. मुलाने जेवायला हाक मारली तेंव्हा ते त्यातून भानावर आले. ट्रंक मध्ये तळाशी असणारी विटी आणि दांडू काढला आणि ट्रंक बंद करून जास्तानी ठेवून जेवायला गेले.
एका पिशवीत विटी-दांडू घेऊन ते बागेत गेले तेंव्हा स्मार्त आणि अर्थला स्मार्तच्या चेंडूने एकत्र खेळताना पाहून त्यांना बरे वाटले.. ते जाऊन नेहमीच्या बाकावर बसले. स्मार्तचे लक्ष त्यांच्याकडे गेले तसे दोघेही रावसाहेबांकडे गेले..
” आजोबा तुम्ही चला न आमच्यासोबत खेळायला.. “
” मी? “
“हो.. तिघे मिळून चेंडूने खेळू.. आज मी टेनिसचा चेंडू आणलाय कॅचने खेळण्यासाठी.. “
“मी पण तुमच्यासाठी गंमत आणलीय “
“आमच्यासाठी गंम्मत? दाखवा बघू आधी. “
स्मार्त आणि अर्थ ला केंव्हा एकदा गंम्मत पाहतोय असे झाले होते.
“हो दाखवतो.. पण त्याआधी हे घ्या “
“खडीसाखर ss ! मला खूप आवडते. माझे आजोबा आले की नेहमी देतात मला.. ते म्हणतात, ‘ चॉकलेट नको खात जाऊस.. त्यापेक्षा ही देशी खडीसाखर खात जा.. खूप चांगली असते’ ते असताना मी कधीच चॉकलेट खात नाही.. पण ते गावी गेले की…”
“बरोबरच आहे आजोबांचं. आता मी आहे ना.. आता रोज खडीसाखर खायची. आणि ही बघा गंमत विटी-दांडू. “
“पण आजोबा, आम्हांला नाही खेळायला येत विटीदांडू “
दोघेही विटीदांडू पाहून खुश झाले पण दुसऱ्याच क्षणी उदास होत म्हणाले.
“अरे, उदास कशाला होताय.. मी शिकविन ना. “
रावसाहेबांच्या वाक्याने त्यांच्या चेहंऱ्यावरची उदासीनता एका क्षणात नाहीशी झाली. रावसाहेबांना त्यांचे बालपण आठवले. त्यांच्या धाकट्या चुलत्यांनी त्यांना पहिला विटी-दांडू आणून दिला होता आणि शिकवलाही होता. सुरवातीला त्यांना विट्टी टिपता यायची नाही, नंतर दूर जायची नाही.. पण पुन्हा पुन्हा ते चांगले खेळू लागले.. कधी कधी पोरांचा खेळ थांबवून चुलते आणि त्यांचे मित्र विटी-दांडू खेळायचे. चुलते म्हणायचे, ‘दांडू म्हणजे सुखाचे, धीराचे, आणि धाडसाचेच प्रतीक असते आणि विटी म्हणजे दुःखाचे, अडचणीचे, संकटाचेच प्रतीक असते.. सुखाने दुःखाला दूर कोलायचे असते.. विटी सतत दांडूला म्हणजे सुखाला टिपायचा प्रयत्न करीत असते.. तिने टिपू नये यासाठीच तिला तडाखा देऊन दूर पिटाळायचे.. हेच धीर आणि अडचणी, धाडस आणि संकट याबाबतही असते ‘
चुलत्यांचे सांगणे त्यावेळी रावसाहेब लहान असल्याने त्यांना उमजले नव्हते पण त्यांचे ते शब्द मात्र मनात पेरले गेले होते.. नंतर कळू लागल्यावर विटी-दांडूचा खरा खेळ त्यांना समजू लागला होता. विटी-दांडूचा खेळ स्मार्त आणि अर्थला शिकवताना. ताना त्यांनी तोच मुद्दा स्पोप्या शब्दांत सांगितला होता.
रावसाहेब, स्मार्त, अर्थ आणि विटीदांडू अशी एक टीमच झाली होती. रावसाहेब त्याच्याएवढे होऊन त्यांच्याशी खेळत होते.. दिवसभर त्यांचे मन संध्याकाळची वाट पहात होते, गावची आठवण येत होती, नाही असे नाही पण आताशा तिथं रमतही होते.
खेळ खेळून झाल्यावर खडीसाखर आणि मग स्मार्त-अर्थ च्या हट्टाखातर गावाकडच्या, लहानपणीच्या गोष्टी. ते तर स्मार्त, अर्थचे आजोबा- मित्र झाले होते. राधाबाईं गेल्यानंतर एकाकी झालेल्या त्यांच्या मनाला, जगण्याला, आयुष्यात आलेल्या या अनपेक्षित नव्या वळणाने सावरायला मदतच केली होती. खरेतर रावसाहेब, स्मार्त आणि अर्थ वेगवेगळ्या कारणाने, अर्थाने एकटेच होते, एकाकीच होते.. पण ते एकटेपण आता उरलं नव्हतं.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈