श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तो आणि ती – भाग -1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

वयाच्या विसाव्या वर्षी कॉलेजमध्ये भेटलेले तो आणि ती. पहिल्या नजरेत नाही पण जसजसे एकत्र दिवस गेले तेंव्हा  त्यांना कळून चुकले की ते एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत. चोरून भेटणे आणि चोरून प्रेम करण्याची एक वेगळी मजा असते ती दोघांनी चांगल्या प्रकारे अनुभवली. कॉलेजमधले प्रेमाचे ते सुवर्ण दिवस भराभर पुढे सरकले आणि दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेऊन स्वतःचं एक घरकुल  उभं केलं. लग्नाची पहिली २-३ वर्षे छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात,  हातात हात घालून गप्पा मारायची  असतात, नवनवीन स्वप्न रंगवायची असतात. त्यांचीही ती दोन तीन वर्षे तशीच गेली. थोडी हौस मौज झाली.  थोडे हिंडणे फिरणे झाले, एकमेकांना भेट वस्तू दिल्या गेल्या. तो आणि ती खूप खुषीत होते.

पण त्यांचे हे दिवस पटकन उडून गेले. त्याच काळात त्यांचे बँकेत जमवलेले शून्य थोडेसे कमी झाले. त्याचवेळी त्यांना हळूच चाहुल लागली बाळाची आणि वर्षभरातच त्यांच्या नवीन घरात एक पाळणा हलू लागला. आता तो आणि ती जरा गंभीर झाले. त्यांच्या वयापेक्षा ते जास्त जबाबदार झाले. त्या दोघांनी एकमेकांच्या खुषीचा विचार न करता त्यांचे सर्व लक्ष आता त्यांच्या बाळावर केंद्रीत केले. त्याचे खाणे पिणे, शू – शी,  त्याची खेळणी, त्याचे कपडे,  त्याचे लाड कौतुक वेळ कसा फटाफट निघून जात होता. सुरूवातीला  सगळे दोघे मिळून करत होते ॰नंतर तिच्यावर  बाळाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्या आणि तिचा हात नकळत त्याच्या हातून सूटत गेला. तो ही आता जास्त मेहनत घेऊन जास्तीत जास्त पैसा कमविण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याचा जास्त वेळ  घराबाहेर जाऊ लागला होता. त्यांचे गप्पा मारणे, हिंडणे, फिरणे केव्हाचं बंद झालेले होते आणि विशेष म्हणजे दोघांच्याही हे लक्षात आलेले नव्हते.

अशातच दोघांनी तिशीचा उंबरठा ओलांडलेला होता. बाळ मोठा होत होता.  तो आणि ती दोघेही स्वतःच्या  आवडी निवडी आणि गरजा बाजूला ठेऊन बाळाचे जमेल तसे लाड करत होते. . ती बाळात जास्त गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात जास्त गुरफटत जातो. घराचा हप्ता, बाईकचा हप्ता आणि त्यात बाळाची वाढत जाणारी जबाबदारी, त्याच्या  शिक्षणाची, भविष्याची सोय आणि महत्वाचे म्हणजे बँकेतल्या शिलकीचे शून्य वाढवायचा ताण. घरात  लहान  लहान  कारणांवरून  दोघांमध्ये  वाद  चालू  होऊन  त्याचे  रूपांतर  छोट्या  भांडणात  होऊ  लागले  तरीही  तो  पूर्णपणे  स्व:तला  कामामध्ये झोकून देतो. बाळाचे शाळेत जाणे चालू होते. बाळ  मोठा  होऊ लागतो. आता  तिचा  सगळा वेळ त्याच्या मागे मागे करण्यातच सरतो.

एव्हाना पस्तीशी आलेली असते. स्वतःचे  घर त्यांनी  चांगले सजविलेले असते.  हप्त्याने  दाराशी  चार  चाकी गाडी  आलेली  असते.  बैंकेत बऱ्यापैकी नाही पण पाच शून्य जमा झालेले असतात पण तरीही काही तरी कमी असते आणि ते म्हणजे समाधान.

रोजच्या धावपळीमुळे तिची चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा ही वैताग वाढलेला असतो. आणि तो मग दर वीकेंड ला आपल्या मित्रांबरोबर बैठका सुरु करतो. सुरवातीच्या एकच प्यालाने झालेली सुरवात पुढच्या पाच एक वर्षात एका क्वार्टर पर्यंत पोचते.

दिवसामागुन दिवस जात असतात. बाळ मोठे होते. आता त्याचे स्व:तचे एक विश्व तयार होते. त्याची दहावी येते आणि त्याची दहावी येईपर्यंत दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.

क्रमशः…

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments