श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ सुनू मामी… – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागत आपण पाहिले,- ‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’ ‘नको. गावाकडची दोघे-तिघे आहेत.’ आता इथून पुढे )
ती आनंदाला सोडून गेली. तिला यायला दुपारचे तीन वाजले होते. नंतर तिने आंघोळ केली. मी दिलेली साडी नेसली. तिला जेवायला वाढलं. त्याक्षणी जीवनातील तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्याप्रमाणे, ती एकेक घास मनापासून खाऊ लागली.
जेवण झाल्यावर तिला विचारलं, ‘असं कसं झालं?’
ती म्हणाली, ‘रात्री दारूच्या नशेत गवताच्या गंजीवर जाऊन झोपला. झोपेत कधी तरी साप चावला. ओरडलासुद्धा नाही. सकाळी बघितलं तर काळा-निळा पडलेला. झोपण्यासाठी खाट आणायला दोनदा पैसे साठवले होते. दोन्ही वेळा दारूत उडवले.’
मी म्हंटलं, ‘आता कसं करणार? डोंगराएवढं आयुष्य पुढे पडलय….’
‘मी कष्टांना घाबरत नाही.’ मग जरा घुटमळली मग म्हणाली, ‘मला थोडं बोलायचय. आनंदाचं शाळेत जायचं वय झालय. त्याला तुमच्याकडे ठेवू का? तुमच्याकडे राहिला, की चांगला शिकेल. फुकट ठेवणार नाही. त्याच्या खर्चाची पै न पै मी देईन. मुलाला पोसायला माझे हात समर्थ आहेत. शे-सव्वाशे तरी दुध्या कोहळ्याचेच होतील. शिवाय भाजीपाला आहे. एखादी गाय पाळीन. म्हणजे दुभतं होईल. थोडं घरात. थोडं विकायला. माझ्या आनंदानं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, असं वाटतय मला. तसंही तो असता, तरी मी आनंदाला इथेच ठेवायचं ठरवलं होतं. त्याच्या सावलीत मला माझ्या मुलाला मुळीच वाढू द्यायचं नव्हतं.’
मग पुढे म्हणाली, ‘गावात तूर मका उगवेन. पेरू, डाळिंबाची लागवड करेन. गावातील घर-शेत संभाळेन आणि इथे तुमचं अंगण, परसूही बघेन. साफ-सूफ करेन. फुला-फळांची रोपे लावेन.’
मी मुग्ध होऊन ऐकत राहिले. तिच्या बोलण्यातली जादू मला संमोहित करत होती. मला घरातले हंडे-कळशा झळझळलेल्या दिसू लागल्या. मागच्या बाजूच्या मुलूल पडलेल्या लिंबा-डाळिंबाच्या डहाळ्या टवटवित झाल्या. अंगणात चारी बाजूंनी पांढर्या पिवळ्या फुलांच्या वेलींवर फुलांचे झुबके झुलू लागले.
मी म्हंटलं, ‘हे घर तू आपलंच घर समज. तुझ्या मुलाला इथे कष्ट होणार नाहीत.’
ती थोडी थांबली. नंतर एखाद्या दु:स्वप्नातून मुक्त होत असल्यासारखी म्हणाली,
‘कुणाला आवडणारी लाजरी, नखरेल कटाक्ष टाकणारी सुंदर पत्नी होणं, माझ्या आवाक्यात नव्हतं. हा देह, हे रूप माझ्यासाठी सगळ्यात मोठी बाधा होती. पण चांगली आई होऊन दाखवणं, तर माझ्या हातात आहे ना? आई-मुलामध्ये कुरुप शरीर कधीच बाधा आणत नाही. हा मोठ्ठाच फरक आहे मर्द आणि मुलगा यात!’
तिचा सहा वर्षाचा मुलगा कधीपासून बावचळून आईच्या पदराला चिकटून उभा होता.
‘निघते….’ तिने मुलाचं बोट धरलं. ‘घराचं छप्पर मोडलय. ते दुरुस्त करायचय. दुसर्या् नांगराची व्यवस्था करायला हवी. ‘
ती गेली. दूरवर जात दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्या पाठमोर्याो आकृतीकडे पहात राहिले.
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈