सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

काना मात्रा वेलांटी….भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

तीन दिवस झाले. सुरुची रोज सांगते,

“मम्मी मला निबंध लिहून दे! विषय आहे “मी कोण  होणार?”

मी तिला रोज, आज नक्की सांगेन हं असं आश्वासन देते आणि कामाच्या पसाऱ्या पुढे मला तिचा निबंध लिहून देणं काही जमत नाहीय.

” मम्मी आजचा लास्ट डे आहे.  उद्या मिस बुक्स चेक करणार आहेत .मला इन कम्प्लीट रिमार्क नकोय. देशील ना लिहून? मराठीतून लिहाचं आहे म्हणून तुला मस्का नाहीतर मीच लिहिलं असतं .मला पटापट मराठी शब्द आठवत नाही.”

तुझं मराठी इतकं काही वाईट नाही. तू लिहून तर बघ. मी दुरुस्त करून देईन.

“ते काही नाही. तू टाळतेस हं मम्मी.तुला निबंध सांगायलाच हवा. मागच्या वेळेस मिसने माझा निबंध वर्गात वाचून दाखवला होता.”

“छान! म्हणजे मी लिहायचा आणि शाबासकी तुला!”

”  बरं. संध्याकाळी घरी आल्यावरआधी तुझा निबंध. मी कोण होणार. बस?”

” प्रॉमिस ?”

“प्रॉमिस.”

तेवढ्यात सुरूची ची रिक्षा आली. मी तिला टाटा करून घरात वळले. सुरुची शाळेत गेली.

मी कोण होणार? थोडा विचार करायला हवा. घड्याळात ठोके पडले. आणि विचार बदलले. सात ते दहा. तीन तास. त्यात कामाची तुडुंब गर्दी.  विस्मया ची पण आज टेस्ट आहे.  तिचा अभ्यास घ्यायलाच हवा. अगदी जवळ बसून, तोंडावर पांघरूण घेऊन झोपली आहे. तिला उचलून उठवावे लागणार. थोडं रडणं कुरकुर. पुन्हा गादीवर जाणं. डोळे धू. चुळ भर. घे हा ब्रश. घास दात. दूध पी. आंघोळ कर. लवकर अटप गं! मला उशीर होतोय. तुझं होमवर्क राहिलंय. घे ते दप्तर. काढ वही. रबर सापडत नाही. पेन्सिलीला टोक नाही. चल ग लवकर अटप. किती वेळ घालतेस. अजून तारा पण आली नाही.

शी बाई! मम्मी तुझी किती घाई! करते ना सर्व काही! आणि आज ते झाडावरचं ऑरेंज फुल  मी मिसला देणार आहे.”

” हो. ते नंतर बोलु.”

” नंतर कधी? मम्मी, तुला वेळच नसतो आमच्याशी बोलायला.”

” हे बघ आधी तू टेबल्स म्हण. वर्णमाला काढ. त वर अनुस्वार दे म्हणजे पतंग हा शब्द होईल.”

” मम्मी अनुस्वार म्हणजे काय?”

” अनुस्वार म्हणजे टिंब”

” म्हणजे शब्दाला कुंकू लावायचं ना?”

विस्मया चे विनोद आणि हसणे. पण आपल्या जवळ इतका वेळ नाही.

” तुझ्या कल्पना पुरे! आज टेस्ट आहे ना तुझी?”

ताराला आज उशीर झाला तिला किती वेळा सांगितलंय्, सकाळी उशीर करू नकोस. एखादे वेळेस ती येणारही नाही. सांगून कधी रजा घेतली आहे?वाट बघायची आणि कामाला लागायचे. अजून संजय चा ब्रेकफास्ट करायचाय्.तारा आली नाही तर विस्मयाला शीला कडे पाठवावे लागेल. विस्मया तयार होणारच नाही. तिची मनधरणी करताकरताच वेळ जायचा.

ती म्हणेलच,” मम्मी तू सुट्टी घे ना.मी शिलाआँटी कडे जाणार नाही. मला प्रेमच्या  रिक्षातून जायला आवडत नाही. तो चिडवतो मला.

आली तारा. उशीर केल्याबद्दल ओरडायला हवं होतं पण जाऊ दे उगीच सारा दिवस खराब जायचा.  आणि शिवाय कुणी मुद्दाम वागत नाहीअसं. तिच्या काही अडचणी असतील.

एकदा ती म्हणाली होती,”ताई एक विचारू का? रोजच ठरवते आज विचारीन, पण तुम्हाला टाईम भेटत नाय, म्हणून म्हणावं जाऊ दे. पण आता अगदी गळ्याशी आलया”

“काय झालं? बोल.” तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून अंदाज आला होता. पैसे वगैरे हवे असणार.

” बाई लेकीच्या  लग्नाला, महिला बँकेतून तीन हजार रुपये घेतले होते.ते काही फेडणं झालं नाही मजकडून. कुठे कुठे पुरी पडू? उधार उसनवारी करून दिवस निघत आहेत. बँकेने केस केली आहे. हा बघा कोर्टाचा कागद.”

तिनं साडीच्या पदरात बांधलेल्या पेपराची घडी माझ्या हातात ठेवली.

” माझी झोपडी तारण ठेवली होती. पैसे नाही भरले तर जप्ती येईल. माझ्यासाठी एवढं करा. तेवढे पैसे भरून द्या. माझ्या महिन्यातून कापुन घ्या. काय बी करा. आणि गरज भगवा. मी तुमचे उपकार जन्मात विसरणार नाही. लई कठीण झालंया बगा. झोपडी गेली तर राहू कुठे? दोन लहान लेकरं हायेत.  शिवाय एकटी बाई कपाळकरंटी. तुमच्याशिवाय हवाला तरी कुणाचा मला? “

बोलता-बोलता तारा रडू लागली. तसे हालच आहेत. शिवाय या बायकांचे नवरे असले काय नी नसले काय? त्यांच्या पीडा आहेतच. शिवाय ताराला माहेरचं कोणी नाही. तिचा भाऊ आहे. पण तोच हलाखीत. सासरी विचारत नाही कुणी.

तरीही मी म्हटलं,” का ग तुझे एवढे तीन-तीन दीर आहेत तुला काही मदत करत नाहीत?”

“कर्म त्यांचं !ही कापड गिरणी बंद पडली. आणि बेकार झालेत सर्व. कुठे मिळेल तिथे मजुरी करतात. असलं तर काम नाही तर असेच. त्यांच्यापासून काय मी अपेक्षा ठेवणार बाई? तुमची कंपनी देते ना कर्ज! तिथून काहीतरी करा ना??”

या बायकांच्या परिस्थितीची दया येते. पण मागे एकदा पारुच्या वडिलांना चहाची गाडी टाकण्यासाठी, एका बँकेतून, माझ्या ओळखीने कर्ज मिळवून दिलं. तर दुसऱ्याच महिन्यात त्यांनी पैसे मस्त वापरले. चैन केली. पुन्हा हातावर हात चोळत बसला. हफ्ते भरलेच नाहीत. मी मात्र विना कारण अडकले. गॅरंटी दिली होती मी. नकोच त्या भानगडीत पडायला.

“हे बघ! एक कर्ज फेडता आलं नाही. दुसरं कसं फेडशील ?इतके दिवस महिन्याच्या महिन्याला थोडेसे पैसे भरले असते तर फिटले नसते का कर्ज? शिवाय तू कामावर ही वेळेवर येत नाहीस. सारख्या रजा घेतेस. महिना तरी पुरा होतो का तुझा.  मला काही जमणार नाही बाई! तू तुझं बघ.

मग काही न बोलता तारा गेली. त्यानंतर ताराने कधी विषय काढला नाही. मीही कधी विचारले नाही.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments