सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ काना मात्रा वेलांटी….भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(ताराला मी मदत करु शकले नाही. ती गेली. आता पुढे)
आज एकदम आठवण झाली. मधूनच सुरुचीच्या निबंधाचा विषय डोक्यात घोळत होता., मी कोण होणार?, एखादी समाजसेविका?
डोळ्यासमोर एक चित्र आलं. ब्रिज खालची वस्ती. जवळ जवळ असलेल्या अनेक पत्र्याच्या झोपड्या. ओला चिखल .कचऱ्याचे ढीग. घणघणणाऱ्या माशा. वाहणारे नळ. उघडी नागडी पोरं. शेंबडी मळकट.. दारू पिऊन खाटेवर लोळणारी सुस्त माणसं. आणि फाटक्या लुगड्या खाली स्तन्य करणाऱ्या, विटलेल्या बायका.काही सरकारी वर्दी घातलेली, चष्मा लावलेली माणसं, एका झोपडी जवळ फुटकळ सामान बाहेर काढत आहेत. हातात स्टॅम्प पेपर. कोणीतरी तारा चा डावा हात उचलला. इंक पॅडवर अंगठा दाबला आणि ठसा घेतला. रडणारी तारा, तिला बिलगलेली तिची मुलं, झोपडीजवळ सारी गर्दी जमलेली, अगदी एखाद्या हिंदी पिक्चर मधला सीन. आणि इतक्यात… श्रीदेवी किंवा जयाप्रदा गर्दीतुन वाट काढत आली.
” ठहरो! ही बघा कोर्टाची ऑर्डर. थांबवा हे सारे. तिचं घर तिला परत द्या. दूर व्हा सा!रे या घरावर फक्त तिचाच हक्क आहे. मग ती तारा जवळ गेली. तिच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या मळकट मुलांचे पापे घेतले. मग म्युझिक गाणं वगैरे वगैरे… आणि सर्व आनंदी आनंद.
खरंच समाजसेविका होणच योग्य. बरंच काही लिहिता येईल. करू विचार. संध्याकाळपर्यंत पुष्कळ मुद्दे सुचतील.
तारा कामावर आल्यामुळे दिवसाचा कार्यक्रम बिघडला नव्हता. सारं काही वेळेस होणार होतं. रोज सकाळी काही वेळ येणार हे दडपण थोडं उतरलं. .अॉफिसची वेळ झालीच होती.
आता स्कूटर नीट सुरू झाली तर बरं! नाहीतर उगीचच उशीर व्हायचा. काल पेट्रोल भरायला हवं होतं. संजय नेहमी रागावतो.गाडी रीझर्वला येईपर्यंत तू पेट्रोल भरत नाहीस.
पण आज मी ऑफिसला वेळेवर पोहोचले.
घर आणि ऑफिस हे अंतर पार करताना जो वेळ लागतो. त्या वेळात, माझ्या व्यक्तित्वात बदल झालेला असतो. आता माझ्या डोक्यात ऑफिसचेच विचार. तारा, विस्मया ची टेस्ट, संजय चे टोमणे, सुरूची चा निबंध डोक्यात नाही.
कालचे डे बुक आऊट होतं. फारच फरक होता. आज प्रथम ते टॅली करावं लागेल. शिवाय इतर प्रॉब्लेम्सआहेतच. मिलवानीने हाऊसिंग लोन घेऊन घर बांधलं आणि विकलं. हेड ऑफिस मधून चौकशी चालू आहे. गेले सहा महिने तो विदाऊट पे रजेवर आहे. त्याच्यावर ॲक्शन अंडर डिसिप्लिन होणार.
आज एक व्यक्ती मला भेटायला येणार आहे रमीला काटदरे.
काटदरे आमच्याच बॅचला होता. त्याची ही बायको. दोन वर्षापूर्वी काटदरेची नागपूरला बदली झाली होती. सर्व नाद होते त्याला. चिक्कार प्यायचा अलीकडे .सस्पेंड केला होता त्याला. ऑफिसमध्ये पिऊन यायचा म्हणून. बायकोने डिवोर्स घेतला होता. एक मुलगी होती त्याला. शेवटी काही महिन्यांपूर्वीच संपला. लिवर सिरॉसिस! खोलीत तीन दिवस प्रेत पडले होते म्हणे! म्युनिसीपालीटीच्या गाडी वरून नेला त्याला. नागपुर ब्रांच मधल्या शिपायाला काय वाटले कोण जाणे ! रस्त्यावरून त्याचे प्रेत जात असताना धावत जाऊन त्याने पांढऱ्या ,सुकलेल्या फुलांचा हार त्याच्या प्रेतावर टाकला.
काटदरे चा कसा बेवारशी शेवट झाला. सगळे असूनअनाथ! स्वतःच्या जीवनाचे अशी लांच्छनास्पद अवस्था करून घेतल्यानंतर मरताना यांना काय वाटत असेल? मरणार्या माणसाच्या अंत: चक्षू समोरून स्वत:च्या जीवनाचा एक चित्रपट सरकून जातो अस म्हणतात. काटदरे ने या चित्रात स्वतःला कसं पाहिलं असेल? मरताना निदान त्याच्याच पेशीतून तयार झालेली त्याची निष्पाप बालिका त्याला दिसली असेल का? तिच्या उरलेल्या भविष्याबद्दल तरी त्याला खंत वाटली असेल का?
आज त्याची बायको मला भेटायला येणार आहे. प्रॉव्हिडंट फंडावर तिने मुलीच्या नावे क्लेम केला आहे. मॅटर तसं सरळ नाही. युनीअन सेक्रेटरी ही मिटींगला हजर राहणार आहेत. मॅनेजमेंट च्या वतीने मला हे प्रकरण हाताळायचे आहे. काटदरेचे ड्युज बरेच आहेत. पण तसा तो सिनिअर होता. सर्व्हिस बरीच वर्ष झाली होती.
कशी असेल त्याची बायको? कुठल्यातरी प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. माहेरीच असते. एक स्त्री म्हणून मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. एका पुरुषाच्या बेजबाबदार बेताल व्यसनाधीन पणामुळे बळी पडलेल्या जीवनाची, साक्षीदार म्हणून मला तिच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण नियमात बसेल तेवढीच मदत मी तिला करू शकणार होते.
आज फारच रेस्टलेस झाले होते मी. त्यातून सुरूचीने या निबंधाच्या विषयाचा किडा उगाचच माझ्या मनात वळवळत ठेवलाय.” मी कोण होणार?”
काहीतरी महत्वपूर्ण व्यक्ती बनून समाजाचे ऋण फेडावे असे लहानपणी मला फार वाटायचं. आपण डॉक्टर व्हावं डॉक्टरच्या गळ्यात अडकवलेल्या स्टेथॉस्कॉपची मला फार मजा वाटायची. पण आता वाटतं कशाला काही अर्थ उरला आहे का? पदवीपूर्व भ्रष्टाचार आणि पदवीनंतरही भ्रष्टाचार. त्यादिवशी राम स्वरूप ने मुलगा पास झाला म्हणून पार्टी दिली. एका हातात ड्रिंकचा ग्लास आणि दुसरा हात पोराच्या पाठीवर.
” बेटा पास हो गया हमको फिकर नही. हम कितना भी पैसा लगायेगा. कही ना कही इंजिनीयर को भेजही देंगे उसकोा.”
एका मार्गाने अॅडमीशन हुकली म्हणून विनु निराश झाला होता. रात्रीचा दिवस करून अभ्यास केला होता त्याने. मध्यमवर्गीय आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने कसून मेहनत केली होती. बऱ्याच वेळा माझ्याकडे डिफिकल्टी सोडवायला यायचा. मॅथ्स मध्ये मी त्याला खूप मदत केली होती. खरं म्हणजे मलाही फार उजळणी करावी लागायची. पण मजा वाटायची.
एक दिवस तो म्हणाला होता,” मावशी, तुम्ही टीचिंग लाईन घ्यायला हवी होती. खूप छान शिकवता तुम्ही.विनूने कॉम्प्लिमेंट्स दिल्या तेव्हा बरं वाटलं होतं पण आता तो स्वतः इतका हताश झालाय् की त्याची काळजी वाटते.
निबंध थोड्या निराळ्या कोनातून लिहावा. मी कोणीच होणार नाही. ध्येय, महत्त्वाकांक्षा याला काही अर्थ आहे का! मी चांगली होणार की वाईट होणार हेही ठरवू नये. मी वाईट झाले तर माझ्या विवेकबुद्धीला ते टोचत राहिल. आणि मी जर चांगली झाले तर? चांगली म्हणजे सत्यवादी, नीती प्रिय, स्वाभिमानी, तत्त्वांना महत्व देणारी वगैरे वगैरे…. त्यापेक्षा एक मातीचा गोळाच रहावे. जसा आकार मिळत जाईल तसं आकारत जावे. मनाशी कुठली आकांक्षा बाळगणं म्हणजे हवेला धोपटणं आहे. पण हा फारच निराशाजनक विचार झाला व्हेरी मच पेसिमिस्तिक. सुरुची अजून लहान आहे. तिच्यावर हे असे नकारात्मक संस्कार करणे योग्य नव्हे. जीवनाविषयीचा तिचा दृष्टीकोन गढूळ होईल. मी कोण होणार या विषयावर पारंपारिक निबंध लिहायला हवा. म्हणजे पिढ्या नी पिढ्या चालत आलेले आदर्श. उदात्त, ध्येयवादी.
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈