? जीवनरंग ❤️

☆ ॠणानुबंध….भाग 1 ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆ 

“थोडी भारी दाखवा ना दोन हजारच्या पुढे पण चालेल, आणि गडद चॉकलेटी रंग दाखवा प्लिज..” ह्या महेशच्या म्हणण्यावर “बरं” म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हातांनी उचलत तो दुकानातला नोकर निघून गेला तेंव्हा असावरीने न राहवून महेशला मांडीला चिमटा काढत खुणावलं आणि हातानेच ‘काय’ असं विचारलं,..

महेश म्हणाला, “बोलू या नंतर, साड्या बघ आधी..”

ती नाक मुरडत म्हणाली, “मला चॉकलेटी साडी नको.”

त्यावर महेश हसत म्हणाला, “तुला नाही गं..?”

आसावरीने परत डोळे मोठे करत “मग, दोन्ही ताईंना तर नाहीच आवडत हा रंग..”

त्यावर महेश म्हणाला, “त्यांना पण नाही.. देशमुख काकूच्या मुलीचं लग्न ठरलंय ना..” 

त्याच्या ह्या वाक्यावर आसावरी जोरात ओरडली, “काय ? देशमुख काकूंना दोन हजाराची साडी..?” तिचं ओरडणं एवढं जोरात होतं की काउंटरवरचा मालक आणि आजूबाजूचे गिऱ्हाईक सगळे वळून बघत होते हिच्याकडे, अगदी समोरच्या पिलरमध्ये आरसा होता मोठा, त्यातही बऱ्याच माना हिच्या दिशेने वळाल्या. तिला ते जाणवलं. ती जराशी चपापली आणि खर्ज्यात आवाज लावत म्हणाली, “अरे पोळ्यावाली आहे ती आपली.. तिला कशाला एवढी महाग साडी..? घरात आहेरात आलेल्या पन्नास साड्या आहेत, त्यातली देऊ..”

तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता महेशला आठवणीत होती तशीच मोठया काठांची सोनेरी बुट्ट्या असलेली चॉकलेटी साडी या नवीन गठ्ठ्यात दिसली. त्याने ती साडी पटकन उचलली. किंमत तीन हजार सहाशे होती पण त्याने लगेच “ही साडी पॅक करा” असं सांगितलं आणि तो असावरीकडे न बघताच काऊंटर कडे चालू लागला.. 

आसावरी मनातून प्रचंड चिडली होती. तिथे न थांबता तणक्यात ती गाडीत येऊन बसली. महेशने साडीचं पार्सल मागे गाडीत टाकलं आणि सिट बेल्ट लावत म्हणाला, “छान आहे ना गं साडी.. अगदी मला हवी तशी मिळाली..”

आसावरीचा रागाचा भडकाच उडाला, “अरे, काय पायातली वाहाण छान म्हणून डोक्यावर नाही ठेवत आपण..”

महेश म्हणाला, “असावरी, तुला काही माहीत नाही. बोलू आपण निवांत..”

त्यावर चिडून आसावरी म्हणाली, “सगळं माहीत आहे मला, अण्णा बोलले होते मागे, ह्या देशमुखबाईचे फार उपकार आहेत आपल्यावर.. म्हणून काय एवढी महाग साडी..?”

महेशने कॉफी शॉप बघत गाडी थांबवली. आसावरी तणक्यानेच टेबलवर बसली. महेशने कॉफी ऑर्डर केली आणि आसावरीशी बोलू लागला, “माझे आई आणि बाबा पाठोपाठ वारले आणि आजोबांनी हिम्मत लावून मला या शहरात शिकायला ठेवलं. शेतीचं उत्पन्न कमी. आजोबा कसेबसे पैसे पुरवायचे मला, पण एकदा कळलं, गावातले देशमुख शहरात राहायला येणार. गावाकडे आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायचे, त्यामुळे रोजच्या उठण्या बसण्यातल्या ओळखी होत्या.

आजोबांनी शब्द टाकला, ‘पोराला एक वेळ जेवण मिळालं तर बरं होईल.. शिक्षणाचा खर्च पेलत नाही.. एक वेळ चहा नाष्टा धकवतो.. खरंतर रोज पूजेला आला असता, पण कॉलेजची वेळ सकाळची..”

आजोबांच्या बोलण्यावर देशमुख तयार झाले आणि माझं रात्रीचं जेवण पक्क झालं.. ही मायमाऊली तेव्हापासून माझी अन्नपूर्णा आहे.. मला छोटीमोठी काम़ त्या घरात सांगितली जायची.. कधी दळण आणायचं, कधी भाजी आणून द्यायची..

मला जेवू घालतात हे त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं. मला ते खुपायचं पण माझ्याकडे इलाज नव्हता. आजोबांची महिन्याची चक्कर हुकली की पोटात गोळा यायचा, कसं होईल आपलं..? खोलीचे भाडे, चहा, नाश्ता बिल जीव घाबरून जायचा. त्यादिवशी हमखास जेवणात लक्ष लागायचं नाही, तेंव्हा देशमुख काकु डोक्यावरून हात फिरवून शेजारी बसून आग्रहाने वाढायच्या. म्हणायच्या, ‘येतील आजोबा, नको काळजी करुस..’

जेवतांना डोळ्यातून अश्रू गालावर येऊन घासात मिसळायचे.. आईचा स्पर्श आठवायचा..असे ते दिवस होते,..

एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितल्या गेलं.. तश्या काकु बाहेर येऊन म्हणाल्या, “अहो असं रागावून का सांगता त्याला.. आणि त्याला सवय नसेल इस्त्री करण्याची..’ 

पण त्यादिवशी देशमुख काका रागातच होते.. त्यांचा माझ्यासोबत बारावीत शिकणारा मुलगा नापास झाला होता आणि त्यांच्या तुकड्यांवर जगणारा मी मात्र मेरिटमध्ये आलो होतो.. तो रागच होता.. उपकाराचा.. त्यादिवशी त्यांचा मुलगा.. ही आता लग्न ठरलेली चिमी तर आठच वर्षांची होती, ती सुद्धा वेगळ्याच तोऱ्यात होती. काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या..

“ खूप खूप मोठा हो..”

—क्रमशः..

© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments