जीवनरंग
☆ ॠणानुबंध….भाग 2 ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆
(काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या.. “खूप खूप मोठा हो..”) –इथून पुढे —-
काकांनी परत दरडावून हाक मारली आणि वेगळ्याच इर्षेने मला इस्त्री करायला बसवलं. मी घाबरत इस्त्री करायला लागलो, कारण हे श्रीमंताचं इस्त्री प्रकरण मला येत नव्हतं. आजोबांनी मला उशीखालची इस्त्री शिकवली होती. शर्ट उशीखाली घडी घालून ठेवला की सकाळी इस्त्री होतो… पण ही देशमुख इस्त्री चांगली जड होती.
भीतभीत फिरवायला लागलो. दोन पाच कपडे मस्त जमले, पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली. काकूंची साडी जळाली. मन घाबरं घुबरं झालं. तो जळका भाग घडीत लपवला. थरथरत्या हातांनी त्या घड्या नीट ठेवल्या. सगळ्यात खाली ती साडी घातली. त्यादिवशी न जेवताच तिथून पोबारा केला.
दोन दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती. डोळ्यासमोर ती साडी आणि देशमुख काका फिरायला लागले.. तिसऱ्या दिवशी निरोप आलाच… ‘काकूंनी बोलावलंय.. जावं तर लागणार. आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार’ या विचाराने गेलो.. मनात निश्चय केला ‘फारच रागावले तर जेवण बंद करून येऊ’..
दबकत घरात शिरलो तर सगळी मंडळी कुठे तरी निघण्याच्या बेतात.. प्रत्येकानेच आपण इस्त्री केलेले कपडे घातले होते.. तेवढ्यात देशमुख काकू बाहेर आल्या. तेव्हा काका ओरडले, “अहो ती चॉकलेटी साडी नसणार होत्या ना तुम्ही, खास इस्त्री केलेली..?”
माझं हृदय धडधडायला लागलं. सगळ्या अंगाला घाम फुटला. पण काकू म्हणाल्या, “मला त्याचे काठ खूप टोचतात. तशीही माझ्या माहेरची साडी ती. तुम्हाला जसं माझं माहेर टोचतं तशीच झाली ती साडी. त्यापेक्षा तुम्ही प्रेमाने घेतलेली ही जांभळी पैठणी छान, मऊसूत आहे.. उगाच नका त्या टोचक्या साडीची आठवण काढू, मला त्रास होतो..”
देशमुख अगदीच खुलले– आपली बायकोच खुद्द तिच्या माहेरावर असं बोलते म्हणून.. लगेच म्हणाले “नकाच नेसू ती टोचकी साडी.. आपण अश्याच साड्या घेऊ तुम्हाला मऊसूत….”
तेवढ्यात काकू माझ्या पाठीवर थाप देत म्हणाल्या, “महेश, छान थालपीठं केली आहेत. जेवून घे.. काही थालपीठं जळाली आहेत, त्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस..”
काकूंचं म्हणणं फक्त मला समजलं.. आज मला त्यांनी वाचवलं होतं.. जेवतांना कळलं थालपीठं जळाली नव्हतीच, पण ते वाक्य साडीवरून होतं ‘मनाला लावून घेऊ नकोस’..
पुढे काही महिनेच मी तिथे होतो, परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं. तिथे कोणी देशमुख नव्हते.
हळूहळू काळही बदलला. छोटी मोठी नोकरी करत शिक्षण झालं. जेवणाचे प्रश्न मिटले. पुढे नोकरी, लग्न आणि आता परत ह्या शहरातली बदली.. त्यात नेमकं ह्या अपार्टमेंटमध्ये ह्याच काकू पोळ्याला भेटणं..
काकूंनी तर तुझ्यासमोर सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं.. काका वारले, मुलगा दारूकडे वळला.. आता काकू पोळ्या करून उदरनिर्वाह करतात.. त्यात चिमीचं लग्न ठरलं.. आता ही माझ्यासाठी संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याची, मला प्लिज त्या संधीचा आंनद घेऊ दे..
खरंतर त्या माऊलीने तेव्हा प्रेमाने खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो.. तिचे ऋण कधी फिटणार नाही आणि उपकार केलेले तिलाही आवडणार नाही, मग ही संधी आहे.. मला त्याचा फायदा घेऊ दे..”
आसावरी अवाक् झाली,.. “किती वेगळं असतं रे प्रत्येकाचं आयुष्य.. आज तुझ्या यशामागे किती तरी अदृश्य हात आहेत..”
महेश हसला. म्हणाला, “हो, त्या हातांचे ऋण असतात म्हणूनच माणसं यशस्वी होतात.. त्यांच्या कायम ऋणात राहायचं, पण संधी आली तर त्या समोरच्याला आनंदी करायचं..”
तो उठून कॉफी बिल पे करायला गेला. आसावरी गाडीत येऊन बसली. तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती. ती म्हणाली, “छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना” म्हणत त्या साडीवर आसावरी हात फिरवू लागली.
महेश गाडी चालवत होता पण साईड मिररमध्ये त्याला आजोबा, देशमुख काका, काकू आणि इस्त्री दिसत होती.. शेवटी चेहऱ्यावर मायेने चॉकलेटी पदरही फिरत होता.. त्याचे डोळे भरून आले..आठवणींनी, मायेने की ऋणानुबंधामुळे, त्यालाच कळेना..
— समाप्त —
(वाचकहो, कथा कशी वाटली नक्की कळवा.. अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा. धन्यवाद.)
© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुंदर कहानी