☆ जीवनरंग ☆ गंधलहरी ☆ श्री आनंदहरी ☆ 

ऊन चांगलंच रणरणत होतं.. तो पाय ओढत चालत होता. पायात अंगठा तुटलेली जुनाट चप्पल.. तळ झिजलेला,अगदी आहे म्हणायला असणारा.. रस्ता म्हणजे मातीचा नुसता फुफाटा.. डोक्यावर मुंडासं आणि त्यावर घातलेली त्याच्यासारखीच म्हातारपणाच्या सुरकुत्या ल्यालेली मोरपिसांची टोपी..दोन्ही खांद्याला अडकवलेल्या दोन झोळ्या. एका  हातात आधारासाठी घेतलेली त्याच्या कानापेक्षा थोडीशी उंच अशी चिव्याची काठी. तिला वरच्या टोकाला बांधलेली घुंगरं कधी वाजायची तर कधी नाही. दुसऱ्या हातात शरीराचा जणू अवयवच असावा असं वाटाव्यात अशा दोन बोटांत अडकवलेल्या चिपळ्या. आधीच मंद झालेली चाल उन्हाच्या तकाट्यानं आणखी मंद झाली असली तरी त्याच्या मनाच्या चालण्याचा वेग मात्र तरुणाईलाही लाजवेल असा होता.. मनाने तो कधीच शिवेवरच्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत पोहोचला होता..

फोंडया माळावर असणारं ते एकमेव झाड.. बाकी नजरेच्या टप्प्यात चिटपाखरूही न दिसणारा तो माळ..

घशाला कोरड पडली होती पण तरीही घोटभर पाणी पिण्यासाठी तो थांबला नाही..रस्त्यावरुन वळून पायवाटेने तो माळावर निघाला आणि शेवटी आंब्याचं झाड दिसलं तसा सावलीत आल्यासारखा तो मनोमन सुखावला आणि त्याच्याही नकळत त्याच्या चालण्याचा वेग वाढला.

आंब्याच्या सावलीत तो पोहोचला. त्याने हातातल्या चिपळ्या, काठी ,खांद्याच्या दोन्ही झोळ्या खाली ठेवल्या आणि खाली बसता बसता घाम पुसत त्यानं झाडाच्या जरासे पलीकडे असणाऱ्या खोपटाकडे नजर टाकली..

“किस्ना ss !”

एका झोळीतून पाण्याची बाटली काढत त्यानं हाळी मारली. त्याच्या आवाजानं चित्तवृत्ती फुललेला किस्ना खुरडत खुरडत खोपटातनं बाहेर आला.  किस्नाला पाहताच त्याचा चेहरा खुलला. किस्ना तसाच त्याच्याजवळ आला. दोन घोट पाणी पिऊन त्यानं ती बाटली किस्नाकडे दिली. किस्नानं बोटं झडलेल्या हातात कशीबशी बाटली धरली आणि दोन-चार घोट पाणी पिऊन, त्याच्या येण्याने आधीच थंडावलेल्या जीवाला आणखी थंड केलं. त्यानं झोळीतून कुणी कुणी कागदात गुंडाळून दिलेला भाकरतुकडा बाहेर काढला.  त्यातील दोन गुंडाळ्या उलगडून पाहिल्या. एकात अर्धी भाकरी-चटणी होती, दुसऱ्यात झुणका भाकरी होती.. त्याने त्या किस्नापुढं ठेवल्या.

“खा..”

“देवा, तू ?”

भुकेली नजर भाकरीवरून त्याच्याकडं वळवत किस्नानं विचारलं.

त्यानं त्या झोळीतून कागदाच्या  आणखी काही गुंडाळ्या, पुड्या बाहेर काढल्या. त्यातली चटणी- भाकरी एका कागदावर घेतली. दोन तीन कागदातली भाकरी,चपाती,चटणी,भाजी काही शिळं काही ताजं.. जणू गोपाळ काला करावा तसं सारे एकत्र केले आणि एका पुडीत बांधून बाजूला ठेवत म्हणाला,

“सांच्याला खा. “

उरलेल्या पुड्या, गुंडाळ्या परत झोळीत टाकल्या.

“घ्ये देवाचं नाव. “

असे किस्नाला म्हणून त्यानं भाकरीचा तुकडा मोडला.

भाकरी खाऊन झाल्यावर तो किस्नासाठीची भाकरी आणि झोळीतून चारपाच पाण्याच्या बाटल्या काढून घेऊन खोपटात गेला. तिथं भाकरी ठेवून, पाण्याच्या बाटल्या तिथल्या  मटक्यात रिकाम्या करून परत आला. पारभर सावलीत किस्नासंगं बोलत बसला. काही वेळ गप्पांत गेल्यावर लेक,सून,नातवंडं असणाऱ्या गोकुळात परतायला पाहिजे..आधीच रोजच्या पेक्षा जरा जास्तच उशीर झालाय हे जाणवून निघण्यासाठी उठता उठता तो किस्नाला म्हणाला,

“भाकरी हाय खोपटात…सांच्याला खा बरं का ? घरला जाया पायजेल आता.”

त्यानं रिकाम्या बाटल्या झोळीत टाकल्या, मोरपिसांची टोपी मुंडाशावर ठेवली, दोन्ही झोळ्या खांद्याला अडकवून काठी हातात घेत ‘येतो रं किस्ना ‘ म्हणत तो काहीशा धीम्या गतीनं चालू लागला.

त्याला जाताना पाहून किस्नानं त्याच्याशी नकळत पाणावलेले डोळे आपल्या थोट्या हाताने पुसता पुसता किस्नाला आठवलं.

हाता-पायाची बोटं झडायला लागल्यावर पोटच्या पोरांनी, बायकोनं घराबाहेर हाकललं.. आणि कोण कुठला तो.. एकदा सावलीला म्हणून झाडाखाली आला.. आणि या शापित आयुष्याची सावली झाला.. त्यानंच नाव दिलं..’ किस्ना ‘

पाठमोऱ्या त्याच्याकडे पाहत असणाऱ्या किस्नाला ते सारे आठवलं आणि त्यानं ‘ देवाs !’ म्हणून आपले थोटे हात जोडून नमस्कार केला.

आपल्या मोहराला त्याच्या मनाचा गंध ल्यावा, यावा असे आंब्याच्या झाडालाही वाटू लागलं.

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shankar N Kulkarni

खुप छाान कथा.दुसर्‍याला अानंद देणाारी कृती काायम करीत राहणे हीच तर मनाची खरी श्रीमंती. “देव तेथेची जाणावा”.