मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टीप – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री लक्ष्मण धरत ☆

?जीवनरंग ?

☆ टीप – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री लक्ष्मण धरत 

कितीही मोठे व्हा, मित्राला कधी विसरू नका…

टेबलवर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे बघून हबकून गेला… तब्बल २५ वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते किंवा ओळख दाखवत नव्हते…

चौघापैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते. आणि दुसरे दोघे लॅपटॉपमध्ये. कदाचित आत्ताच झालेल्या ‘deal’ ची आकडेमोड चालली होती…

शाळेतील मित्र खूप पुढे निघून गेले होते. तो स्वतः मात्र कॉलेज पर्यंतसुद्धा पोहचू शकला नव्हता…

नंतर दोन-तीन वेळा तो त्यांच्या टेबलवर गेला, पण सुखदेवने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले… चारी बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले.

‘आता परत कधी इकडे न आले तर बरं’, असा विचार त्याच्या मनात आला. स्वतःच्या सध्याच्या परिस्थितीमुळे ( वेटर असल्यामुळे) शाळेतील मित्रांना ओळख सुद्धा दाखवता आली नाही म्हणून सुखदेवला फार वाईट वाटले.

“सुखदेव, टेबल साफ कर.’

‘तीन हजारचे बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यानी…”

मॅनेजर वैतागून बोलला…

टेबल साफ करता करता सुखदेवने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला. त्या चार बिझनेसमेननी पेनानी कदाचित त्या नॅपकिनवर पण आकडेमोड केली होती. पेपर टाकता टाकता सहज सुखदेवचे त्याच्याकडे लक्ष गेले, त्यावर लिहिले होते…

‘सुखदेव, तुला टीप द्यायला आमचं मन झालं नाही. ह्या हॉटेलशेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतलीय, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील. तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढत होतास हे आम्हाला कसंसच  वाटलं? आपण तर शाळेत एकमेकांच्या डब्यातून खाणारे! आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस. फॅक्टरीमधलं कॅन्टीन कोणीतरी चालवलंच पाहिजे ना…???

– शाळेतील तुझेच मित्र….’

खाली कंपनीचे नाव आणि फोन नं. लिहिला होता.

आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या ‘टीप’ ला सुखदेवने ओठांना लावले आणि , तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला.

लेखक – अज्ञात 

संग्राहक – श्री लक्ष्मण घरत

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈