सौ. वंदना अशोक हुळबत्ते
जीवनरंग
☆ सदमा.. . भाग 3 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
विजूचा केवीलवाणा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. बालपणीचे सुंदर दिवस पुन्हा पुन्हा फेर धरून नाचत होते. दिपाच्या मैत्रीणीची मोठी बहिण मानसोपचारतज्ज्ञ होती. तिची भेट घेतली. केस समजावताना म्हणाली” मी एक गोष्ट सांगणार आहे. ती अदम जमाण्याची नाही. ऐकवीसाव्या शतकातील आहे. आताची.. . अगदी आत्ताची.. . आहे. विश्वास बसणार नाही. पण सत्य आहे. माझ्या सखीची आहे . विजयाची गोष्ट. सगळे तिला विजूच म्हणतात. एका अल्लड पोरीची. ती अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धीची,सगळ्या क्षेत्रात आघाडी. सर्वाना हवीहवीशी वाटणारी,देखणी. तिची पॅशन नाटक. नाटकासाठी ठार वेडी.
बारवीत ही तिने राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला. यश मिळवलं. बारावी नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. तिने इथं महाविद्यालयात प्रवेश घेतला. तरी तिचे नाटक सुरू. तिच्या नाटकाचा हिरो अतुल. एका नाटकात ते दोघे काम करत. स्पर्धेच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या ठिकाणी जात, सतत प्राक्टीस, सतत सहवास, बरोबर हिंडणे फिरणे,अतुल तिला आवडू लागला. त्यांचे प्रेम फुलले. ऐके दिवशी तिने घरी जाहीर केले मी अतुलशी लग्न करणार. तिच्या बाबांचा नाटकात काम करण्यास विरोध नव्हता. पण आपल्या मर्जीने विजूने आपले लग्न ठरवावे?ते ही परक्या जातीतील मुलाशी?हे काही पटले नाही. घरात मोठे वादळ उठले. तिला विरोध झाला,तिने बंड केले. ते मोडून काढले. तिची आई मध्ये पडली तर तिला बाबा म्हणाले माझं ऐकायचे नसेल तर तू तुझ्या माहेरी जावू शकतेस. तिची अवस्था’ इकडे आड तिकडे विहीर ‘झाली. मी म्हणेन तसेच या घरात झाले पाहिजे. हा हेका धरला. विजूचे पंख कापले गेले. शिक्षण बंद झाले, बाहेर फिरणे बंद,मी सांगेन त्या मुलाशी लग्न करावे लागणार. असा वटहुकूम जाहीर झाला . वर संशोधन सुरू झाले. चार पाच मुले बघून गेली. सर्वांना तिने पसंती दर्शवली. माझ्या मना विरुद्ध लग्न आहे, मग तो काळा काय अन् गोरा काय? शिकलेला काय अन् न शिकलेला का ? फरक काय पडतो? आयुष्य उधळुणच द्यायचे तर पसंती हवी कशाला? ही तिची भावना. खरं तर अतुल सुसंस्कृत, शिकलेला, नोकरी करणारा. उमदा गडी होता. दोघांची जोडी जेव्हा रंगमंचावर येई तेव्हा प्रेक्षकांना ही त्यांचा क्षणभर हेवा वाटे. अशा अतुलला केवळ दुसऱ्या जातीचा म्हणून बाबा डावले. त्यांचे विजूवर प्रेम होते. विजू म्हणाली तसती तर एका मिनिटात तो पळून जावून लग्न करायला तयार होता. पण लग्न केले तर बाबांच्या आशीर्वादाने करावे असे तिला वाटे कारण विजूचे बाबांवर विलक्षण प्रेम होते. त्यांच्यासाठी तिने प्रेमाचा त्याग केला. बाबांचा अपमान होईल, त्यांची मान शरमेनं खाली जाईल असे मी करणार नाही. ते म्हणतील त्या मुलाशी मी डोळे झाकून लग्न करेन असे सांगून टाकले. अतुल लग्नात खोडा घालेल म्हणून एक सुरतचे श्रीमंत स्थळ आले होते. त्याला होकार कळवला. त्यांच्याशी बोलणी झाली. अगदी जवळचे आठ दहा नातेवाईक घेऊन ते सुरतला गेले आणि लग्न करुन आले. स्पष्ट शब्दात सांगायचे तर मुलीला जिवंत गाडून आले.
स्वप्न उध्दवस्त झालेले. विजू हसत तर होती, पण त्या हसण्यात प्राण नव्हता. तिच्या स्वागतासाठी सगळी हवेली सजवली होती. भानुदासच लग्न ठरता ठरत नव्हतं तीशी उलटलेली. घोड नवरा तो आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर मुलगी सुन म्हणुन मिळाली होती. जास्त खोलवर कोणीच कुणाची चौकशी केली नव्हती. नवऱ्याकडील मंडळी खुष होती. गुलाबाच्या पायघड्या घातल्या होत्या. जखमी मनाला त्या कुठे शांत करणार होत्या?सर्व भिंतींना सुवासिक फुलांच्या माळा सोडवल्या होत्या,हातात मिठाईचे तबक घेऊन माणसांची लगबग सुरू होती. सगळीकडे चैतन्य. हीचे मन मात्र उदास होते चेहऱ्यावर उसने हसु आणत होती. मनाला बजावत होती. आता माघार नाही. मी इथं मेले तरी सांगलीला जाणार नाही सजवलेल्या फुलदाणी प्रमाणे स्वत:ला त्या घरात फुलवत होती. सजवत होती. सजवलेल्या पलंगाकडे जाताना पायांना कंप सुटला. तरी सामोरी गेली. मनात कोणता ही आनंदाचा उमाळा नसताना मनाविरूद्ध नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. करत राहिली. घरच्यांनी ही ती लहान आहे म्हणून सांभाळून घेतले. ती हळूहळू घरात मिसळली. निसर्गाने तिला मातृत्व बहाल केले. ते तिने स्विकारले. ज्या विसाव्या वर्षी बहरायचे,फुलायचे,जीवनाला नवीन वळण द्यायचे, त्याच विसाव्यावर्षी ही मातृत्वाच्या ओझ्याने वाकून गली. बाळतंपणासाठी ही माहेरी जाणे टाळले तिने. तिला जुन्या आठवणी पुसायच्या होत्या. या दोन वर्षात कधी तर एकदाच बाबा घरी येऊन गेले.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈