सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

सकाळपासून ची सगळी काम आवरल्यावर दुपारी निवांतपणे ताजे वर्तमानपत्र वाचायला मी सुरुवात केली. नित्याप्रमाणे अपघाताचा फोटो, त्यातील मृतांची नावे, अपघाताचे कारण, त्यानंतर  कमीत कमी कपडे घातलेल्या अन झकास हास्य देणाऱ्या नट्यांचे फोटो, अगदी सगळं यथासांग निरखून झाल्यावर उरलेल्या बातम्या पेंगुळल्या डोळ्यांनी मी वाचायला लागले.

आतल्या पानावर महानगरपालिकेच्या निवडणुकांची बातमी ठळक अक्षरात होती प्रभाग त्यातील वाटप वगैरे वगैरे. सहज म्हणून आमच्या प्रभागातकाय आहे हे वाचायला गेले तर काय? अहो आश्चर्य!आमचा प्रभाग चक्क यावेळी महिलांसाठी राखीव होता.

एकदम मला काल संध्याकाळी आमच्या घरी जमलेल्या यांच्या चौकडीचे बोलणे आठवले. त्यांची ही याच विषयावर चर्चा सुरू होती. आपल्या प्रभागातील महिला उमेदवार कोण ?यावर चर्चा रंगली होती. हे एकूण चार जण मित्र आहेत म्हणून मी आपलं चौकडी म्हणते. तेही मनातल्या मनात बर का. त्या तिघांना सु दा मा. म्हणते. सुपर म्हणजे सुधीर,दा म्हणजे  दामोदर आणि तिसरे मा म्हणजे माधव. हे तिघेघरी आले ना की मला हमखास पोहे करायला लावतात. म्हणून मी मनातल्या मनात त्यांना सुदा मा म्हणते. तर काल यांची पोहे खाता-खाता जोरदार चर्चा सुरू होती. आपल्या प्रभागांमध्ये निवडणुकीला उभे राहण्यासाठी योग्य महिला उमेदवार कोण ?

आता मी तोच विचार करायला लागले. आपल्या प्रभागात कोण महिला उमेदवार होणार ?त्या रंजनाताई राहतील का उभ्या ?भारी बडबड बडबड बडबड करत असतात. पण बडबड करणं वेगळं आणि भाषण करणं वेगळं !मग कोण ?आपल्या डॉक्टरीण बाईनाच मला वाटते उभं करतील. त्यांची सगळ्यांशी ओळख आहे थोडाफार पैसाही खर्च करू शकतील. आपली प्रॅक्टीस सोडून त्या कशाला या फंदात पडतील ?मग कोण बरं ?ती नुकतीच बँकेतूननिवृत्ती घेतलेली मंजू. हो ती शिष्ट. कदाचित उभी राहील हं !तिला काय घरी काम हे कमी असतात आणि पैसाही भरपूर राखून आहे. शिवाय भाषणबाजी ही जमीन तिला. हिरवीच कशी ठसक्यात बोलत असते.

अरेच्या मग आपणच बर आहे का या इलेक्शनला आपल्या वॉर्ड मधून? काय हरकत आहे? माझे डोळ्यावर आलेली झोप एकदम खाडकन उडाली. खरंच काय मस्त कल्पना आहे. आपल्याला आता वेळही भरपूर आहे. दोन्ही मुलींची लग्न झाल्यामुळे आपण एकदम निवांत आहोत. हे सुद्धा आपल्या  व्यापात गुंग. बर दोघी मुली सुद्धा आपापल्या नवऱ्यांबरोबर अमेरिकेत गेल्यात. त्यामुळे त्यांचे सेवन करा वार करा हे द्या ते द्या काही म्हणजे काही नाही.

पण निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे जरा जास्तच होतय का ?काय हरकत आहे ?हल्ली सगळे सांगत असतात ना ?महिलांनी राजकारणात यायला पाहिजे,स्वच्छ कारभार करून दाखवायला पाहिजे, देशाला पुढे नेलं पाहिजे. वा वा आपल्यात ही क्षमता नक्कीच आहे.

       क्रमशः…

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments